Sunday, 29 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.06.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 29 June 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

लहान-लहान सवयी जेव्हा सामुहिक निर्धाराचं रूप घेतात तेव्हा फार मोठं परिवर्तन घडणं निश्चित असतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज आकाशवाणीवरील आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून संवाद साधतांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा गावानं स्वच्छतेसाठी राबवलेल्या विविध उपाययोजनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नुकताच साजरा झालेल्या ‘जागतिक पर्यावरण दिनाबद्दल’ बोलतांना वसुंधरेसाठी योगदान दिलेल्यांबद्दल सांगतांना पुण्याच्या रमेश खरमाळे यांचा दाखला मोदी यांनी दिली. रमेश यांनी कुटुंबीयांसह जुन्नरच्या डोंगरात जाऊन माजलेली तण कापणी करत पाणी थांबवण्यासाठी फक्त दोन महिन्यांत सत्तर चर खणले, तसंच लहान तळी तयार करत, विविध बिया लावून शेकडो झाडे लावली आणि याद्वारे प्राणवायु उद्यानाची उभारणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरातच्या अहमदाबाद  नगरपालिकेनं ‘लाखो वृक्षांसाठी अभियान’ सुरु केलेल्या अभियानातून ऑपरेशन सिंदूरच्या स्मृतीप्रीत्यर्थ सिंदूरची रोपं लावण्याच्या उपक्रमाची माहितीही मोदी यांनी दिली. ‘एक पेड, माँ के नाम’ अभियानाचा पुनरुच्चार करत निसर्ग रक्षणातून येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सध्याच्या तीर्थयात्रांच्या हंगामाबाबत बोलतांना मोदी यांनी, यात्रा शरीराची शिस्त, मनाची शुद्धी, एकमेकांप्रती प्रेम आणि बंधुत्व, ईश्वराशी जोडले जाण्याचं माध्यम असून जनसेवेच्या संधींचं ते एक महाअनुष्ठान असल्याचं नमूद केलं. उत्तर ते दक्षिणेपर्यंत - पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या यात्रा 'एक भारत श्रेष्ठ भारत' भावनेचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी सांगितलं.

देशात जिवाणुंमुळं होणा-या ट्रॅकोमा अर्थात खुपऱ्या या डोळ्यांच्या आजारात दृष्टी गमावण्याचा धोका होता मात्र, भारतानं या आजाराचं प्रयत्नपुर्वक उच्चाटन केलं असून जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्रॅकोमा मुक्त घोषित केल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार आता भारतातील ६४ टक्क्यांहून जास्त लोकसंख्येला कोणत्यातरी एका सरकारी सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ नक्की  मिळत असल्याचं मोदी म्हणाले. आणीबाणीतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि लोकांना देण्यात आलेल्या त्रासाचा उल्लेख पंतप्रधांनी यावेळी केला. या संदर्भातले दिवंगत माजी पंतप्रधान मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे ध्वनीमुद्रित विचार त्यांनी ऐकवले. आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी सर्वात प्रथम तंदुरुस्ती-आरोग्य यांकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी जेवणात दहा टक्के तेल कमी वापरुन लठ्ठपणा कमी करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. नुकतेच झालेल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. पंतप्रधानांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा हा १२३ वा भाग होता.

****

नागपूरच्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उदघाटन आज करण्यात आलं. याप्रसंगी, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

****

ओडिशातील पुरी इथं श्री गुंडीचा मंदिराजवळ आज पहाटे चार वाजता चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सर्व तीनही मृत नजिकच्या खुर्दा जिल्ह्यातले असल्याचं मानल जात असून ते रथयात्रेसाठी पुरी इथं आले होते. दूर्घटनेत बारा पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत.

****

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळं पुढल्या २४ तासांसाठी चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर इथं भाविकांना थांबवण्याचे निर्देश पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

****

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत पन्नास टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु मृग नक्षत्रापासून पावसाला विलंब झाल्यानं अकोला जिल्ह्यातील पीक पेरणीची पद्धत बदलली असून मुग आणि उडीदाच्या फेऱ्यात घट झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: