Monday, 30 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.06.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 June 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन-छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा मन की बात मधून गौरव

·      विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन-त्रिभाषा सूत्राचा शासननिर्णय रद्द

·      बीड इथं विद्यार्थीनीच्या लैंगिक छळ प्रकरणी दोन फरार शिक्षकांना अटक

·      अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आयुष शेट्टी अजिंक्य तर तन्वी शर्माला उपविजेतेपद

आणि

·      मराठवाड्यात पुढचे तीन दिवस हवामान विभागाचा यलो अलर्ट

****

लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या १२३ व्या भागात बोलत होते.

आणीबाणीच्या आठवणींसह आंतरराष्ट्रीय योग दिन, टॅकोमा या डोळ्यांच्या आजाराचं निर्मुलन, दीर्घ काळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा, जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा, आगामी श्रावण महिना, भगवान जगन्नाथ रथयात्रा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आदी मुद्द्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले असून याबद्दल अनेक देशातून आभाराचे संदेश आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्वांनी आपापल्या राज्यातल्या बौद्ध स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातले रहिवासी रमेश खरमाळे हे वन संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची पंतप्रधानांनी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा या आदर्श गावाचा पंतप्रधानांनी गौरवाने उल्लेख केला. ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात पाटोदा ग्रामपंचायतीचा गौरव केल्याबद्दल गावच्या सरपंच जयश्री किशोर दिवेकर यांनी त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या...

बाईट - सरपंच जयश्री दिवेकर

 

गावचे उपसरपंच कपिंद्र पेरे पाटील यांनी लोकसहभागातून आपल्या गावाचा मन की बातमध्ये पंतप्रधानांनी समावेश केल्यावा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले...

बाईट - उपसरपंच कपिंद्र पेरे

****

नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश आणि या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी केलं आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं काल उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी बोलतांना, छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुंबई विद्यापीठाच्या उभारणीसाठी जागेची निवड करण्यात आल्याची माहिती दिली.

****

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. येत्या १८ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण १२ विधेयकं सादर होणार असून सहा अध्यादेश पटलावर ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, शालेय शिक्षणात तिसरी भाषेसंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी आणि इंग्रजी या भाषा पहिल्या वर्गापासून लागू करण्याबाबतचा अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबजावणीचा निर्णय घेतला होता, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. आपल्या सरकारने मात्र मराठी भाषा सक्तीची करून हिंदी ही ऐच्छिक भाषा म्हणून ठेवली असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत विरोधकांची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट करतांना, हे सर्व मुद्दे अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं सांगितलं.

****

दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी विषयाच्या मुद्द्यावर या संदर्भातल्या सरकारच्या आदेशाची काल अनेक ठिकाणी होळी केली. बीड तसंच हिंगोली इथं याबाबत शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्यात आलं.

****

बीड इथं विद्यार्थीनीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन फरार शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मांजरसुंबा इथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी २६ जून रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही शिक्षक फरार झाले होते.

दरम्यान, या प्रकरणी विशेष तपास पथक-एसआयटी मार्फत चौकशीची मागणी पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचं, आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं मराठा समाजबांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.

****

अहिल्यानगर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. २०० तसंच ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना प्रथम पोलिस पथकाने सापळा लावून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आला. आरोपी हे टेंभूर्णी इथं बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली, त्यानंतर पोलिसांनी टेंभुर्णी इथं छापा टाकून ६६ लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा आणि इतर साहित्य जप्त केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेची अतिक्रमण हटाओ मोहीम कालही सुरू होती. या मोहिमेत काल जालना रस्त्यावरची सुमारे साडे सहाशे अतिक्रमणं काढण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं तालुका न्यायालयाच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी काल पाहाणी केली. हे काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण होईल, याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना गुट्टे यांनी केली.

****

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने काल फलटण इथून प्रस्थान करत बरड पालखीतळावर रात्री मुक्काम केला. जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल इंदापूर इथं पार पडलं. तर संत एकनाथ महाराज यांचा पालखी सोहळा आज परंडा इथून सोलापूर जिल्ह्यात बिटरगाव इथं पोहोचणार आहे.

दरम्यान, जालना इथल्या प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवास कालपासून सुरुवात झाली.

****

छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीतले अधिकारी तसंच नैमित्तिक उद्घोषकांचा स्नेहमेळावा काल पार पडला. सातारा परिसरात आद्येश्वरी उपासना गृहात झालेल्या या मेळाव्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकाशवाणीतल्या आठवणींना उजाळा दिला.

****

भारताचा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीनं अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम फेरीत आयुषने कॅनडाच्या ब्रायन यांग याला २१-१८, २१-१३ असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत करत इतिहास घडवला.

महिला एकेरीत मात्र भारताच्या तन्वी शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, काल झालेल्या अंतिम फेरीत तन्वीला चीनच्या बेईवेन झांग हिच्याकडून ११-२१, २१-१६, १०-२१ असा पराभव स्वीकारावा लागला.

****

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तीन जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल साई टेकडी परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. वनविभागाने उपलब्ध करून दिलेल्या रोपट्याचं, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रोपण केलं.

****

No comments: