Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र सरकारनं व्यसनाधिनतेच्या
कृत्यांवर कठोर कारवाई सुरू केली असून व्यसनाधीन तरुणांना सहवेदना आणि संवेदनशीलतेने
पुन्हा सामान्य जीवनाकडं आणलं जात आहे, असं केंद्रीय गृह मंत्री
अमित शहा यांनी म्हटलं आहे. अंमलीपदार्थ हे युवकांसाठी सर्वात मोठं संकट आहे, असं
शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी
चालवलेल्या लढ्यात सहभागीतांना आणि सहकाऱ्यांना शहा यांनी आजच्या दिनानिमित्त
शुभेच्छा दिल्या.
****
ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत इराणमधून
आणखी २७२ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. आज सकाळी मशहादहून नवी
दिल्लीला पोहोचलेल्या विशेष विमानात तीन नेपाळी नागरिकही होते. परराष्ट्र
मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सामाजिक माध्यमावर या बाबत माहीती दिली.
ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत एकूण ३ हजार ४२६ भारतीय नागरिकांना इराणमधून
भारतात परत आणण्यात आलं आहे.
****
जोपर्यंत दहशतवाद आणि दहशतवाद्यांकडं
मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रं आहेत तोपर्यंत शांतता आणि समृद्धी पुनर्स्थापित
होऊ शकत नाही,
असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. आज सकाळी
चीनमधील किंगदाओ इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ते
बोलत होते. कट्टरतावाद,
अतिरेकीपणा आणि दहशतवादाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी
निर्णायक कारवाई करण्याचं आवाहन सिंह यांनी केलं. भारतानं दहशतवादापासून संरक्षण
मिळवण्याचा आणि दहशतवादी छावण्या नष्ट करण्याचा अधिकार वापरून सीमापार दहशतवादाला
आळा घालण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं, असंही सिंह यांनी सांगितलं.
****
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत
भारतानं पाकिस्तानच्या भारताविषयीच्या अपप्रचाराचा जोरदार
प्रतिवाद केला. पाकिस्तान स्वतःच्या मानवी हक्क
उल्लंघनांपासून आणि राज्य-पुरस्कृत सीमापार दहशतवादापासून लक्ष विचलित करण्याचा
प्रयत्न करत असल्याचा आरोप भारतानं केला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे
स्थायी प्रतिनिधी,
राजदूत पी. हरीश यांनी युएनएससीच्या च्या बालकं आणि सशस्त्र संघर्ष या विषयावरील खुल्या चर्चेदरम्यान
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या व्यासपीठाचा गैरवापर आणि परिषदेच्या अजेंडाचे उल्लंघन
केल्याबद्दल पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
****
पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाच्या
क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर आघाडीची भूमिका बजावत आहे, असं
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. कालपासून देहरादून
इथं होत असलेल्या भारतीय संवर्धन परिषदेत ते बोलत होते. २०१४ मध्ये भारतात ४७
व्याघ्र प्रकल्प होते,
आता त्यात ५८ पर्यंत वाढ झाली आहे. परंपरागत संवर्धन
ज्ञानाची नोंदणी आणि वैज्ञानिकदृष्ट्या वापर करण्याची गरज यावर यादव यांनी भर
दिला. या तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारत आणि परदेशातील शेकडो विद्यार्थी, संशोधक, वन
अधिकारी आणि संवर्धन तज्ञ सहभागी झाले आहेत.
****
राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील
कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षात अतितीव्र कुपोषित बालकांचे
प्रमाण 1 पूर्णांक 93 वरून 0 पूर्णांक 61 टक्क्यांवर आलं आहे. तर मध्यम कुपोषित बालकांचं प्रमाण 5
पूर्णांक 9 वरून 3 पूर्णांक 11 टक्क्यांवर आलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं
आहे.
****
सर्वांसाठी घर योजनेला राज्य सरकारचं
प्राधान्य असल्याचं प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. या
अनुषंगानं विदर्भातील झुडपी जंगल जमिनीवरील नागरिकांची १९९६ पूर्वीची घरं कायदेशीर
करुन त्यांना दिलासा देण्यात येईल, असं महसूलमंत्र्यांनी
सांगितलं. या क्षेत्रातील एकही कुटुंब पट्टा देण्यापासून वंचित राहणार नाही
यासंदर्भात प्रशासनानं तातडीनं प्रस्ताव सादर करुन तीन महिन्यात कार्यवाही करावी, असे
निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.
****
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची १५१ वी जयंती आज राज्यात साजरी केली जाणार आहे. यानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात
आजपासून १० जुलैपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आज विविध जिल्ह्यातल्या
सर्व शासकीय,
निम शासकीय कार्यालयांत, शैक्षणिक संस्थांमध्ये शाहू
महाराजांच्या प्रतिमेचं पूजन, कार्याचा गुणगौरव आणि त्यांनी जनहितार्थ
घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचं तसंच जाहीररनाम्याचं सामुदायिक वाचन केलं जाणार
आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडीचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment