Saturday, 28 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.06.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 28 June 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०२ सकाळी .०० वाजता

****

राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या महास्ट्राइड महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरील चर्चेचं उदघाटन नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होत आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केंद्र सरकारनं केला असून यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था येत्या २०२८पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत साडेतीन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या शक्तीस्थळानुसार, नैसर्गिक साधन संपत्तीनुसार, पर्यटनाच्या संधीनुसार विविध उद्योग व्यवसायांना नियोजनबद्ध आकार देण्यासाठी ही परिषद होत आहे.

यापार्श्वभूमीवर जवळपास बावीसशे कोटींहून अधिक रकमेच्या महास्ट्राईड प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीवर व्यापक चर्चा परिषदेत प्रस्तावित आहे. जिल्हास्तरीय विकासासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण होण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने महास्ट्राइड प्रकल्पाच्या आखणी, अंमलबजावणी आणि  प्रशासकीय पुर्ततेतून त्याच्या वित्तीय संरचनेस मान्यता आणि गतीमान अंमलबजावणीसाठीही परिषदेत विचारमंथन होत आहे.

****

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या महिलांना आरोग्यविषयक सोई-सुविधा मिळण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे आरोग्यवारी उपक्रम सुरू आहे.

वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बालकांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्ष, न्हाणीघर, शौचालय, स्वच्छतागृह, दामिनीपथक, प्राथमिक उपचार, रुग्णवाहिका आदी सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आषाढी यात्रेसाठी मध्य रेल्वेतर्फे मिरज-नागपूर; मिरज-लातूर आणि पुणे- मिरज या तीन विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, संत श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा आज फलटणकडे मार्गस्थ झाला.

****

नांदेड जिल्ह्यात, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत अनेक लाभार्थ्यांचं स्वप्न साकार होत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एक लाख, ४५ हजार, ६९८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून, एक लाख ३० हजार ५१ लाभार्थ्यांना निधीचा पहिला हप्ता, तर तीस हजार आठ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरीत झाला आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी, १७ लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, भीमाशंकर इथं मोठ्या संख्येने येणारे भाविक आणि पर्यटकांना केंद्रबिंदू ठेऊन दर्जेदार सुविधा विकसित करण्याची सूचना केली. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या ऊर्जा निर्मिती कंपन्यानी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात प्रत्येकी एक गाव सौर ग्राम बनवावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. दरम्यान, १९ जुलै रोजी जिल्ह्यात १५ लक्ष वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात येणार असून या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना केलं.

****

मोबाईलच्या ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. बिहारमध्ये आज सहा नगर पंचायतींसह इतर ३६ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे. मतदारांना आपल्या मोबाईलवर ई-वोटिंग ॲप डाऊनलोड करून, घरबसल्या मतदान करता येणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत ही सुविधा सुरू असेल. हा दिवस बिहारसाठी ऐतिहासिक ठरल्याचं, बिहारचे राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी म्हटलं आहे. मतदानासाठी उभारलेल्या मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

****

मन की बात कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.

****

भारतातलं साखर उत्पादन येत्या २०२६ वर्षातील हंगामात १५ टक्के वाढीसह साडेतीन कोटी टनांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं ही वाढ शक्य असल्याचं एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकात, उसाचं लागवडीखालचं क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठ्याची चिंता कमी होईल. धोरणात्मक परिस्थिती अनुकूल राहिल्यास इथेनॉल उत्पादनही वाढेल, असं अहवालात म्हटलं आहे.

****

राज्यात आज कोकणात काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस तर, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी आणि विदर्भात वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

विद्यार्थ्यांनी निश्चित उद्दीष्टासह कठोर परिश्रम, एकाग्रता आणि निराश न होता प्रयत्न करत राहिल्यास त्यांना भविष्यातील वाटचालीत यश संपादन करता येईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल पुण्यात केलं. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते.

****

No comments: