Regional Marathi Text Bulletin,
Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 June 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून २०२५ सायंकाळी ६.१०
****
· भारताने जगाला अहिंसेच्या शक्तीची जाणीव करून दिली - पंतप्रधान मोंदींचं
प्रतिपादन,
जैन मुनी आचार्य विद्यानंदजी महाराज जन्म शताब्दी समारंभाचं दिल्लीत उदघाटन
· संविधान उद्देशिका पार्कचे नागपुरात सरन्यायाधीश गवई, मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
आणि
· मोबाईल अँपद्वारे मतदान घेणारं बिहार ठरलं देशातलं पहिलं राज्य
****
भारताने जगाला अहिंसेच्या शक्तीची जाणीव करून दिली आहे.
भारत हजारो वर्षांपासून त्याच्या विचारांमुळे, तत्वज्ञानामुळे
आणि ज्ञानामुळे अमर आहे. भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत संस्कृती आहे आणि या
शाश्वत तत्वज्ञानाचा उगम देशातील ऋषी, संत आणि
आचार्यांमध्ये आहे. आचार्य विद्यानंद मुनी हे या प्राचीन भारतीय परंपरेचे आधुनिक
दीपस्तंभ आहेत. आचार्य विद्यानंदजींनी त्यांचे जीवन केवळ आध्यात्मिक साधनापुरते
मर्यादित ठेवले नाही तर ते समाज आणि संस्कृतीच्या पुनर्बांधणीचे एक शक्तिशाली
माध्यम बनवले,
असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
त्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत आचार्य विद्यानंदजी महाराज यांच्या जन्म शताब्दी
समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी
म्हणाले...
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
मन की बात या कार्यक्रमातून, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या
सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून उद्या सकाळी ११ वाजता या
कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि
भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून
उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील
नागरिकांनी करावा. त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे
सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग
मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी
ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधी व न्याय
राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संविधानाच्या अमृत महोत्सवी
वर्षात या पार्कची कार्यपूर्ती होवून जनतेसाठी खुला होत आहे ही महत्वाची बाब आहे.
भारतीय संविधानाने सक्षम लोकशाहीची रचना करुन येथील नागरिकांना अभिव्यक्ती
स्वातंत्र्य,
मुलभूत अधिकार, समान संधीचा अधिकार
व न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे.
****
केंद्र सरकारच्या पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएम
श्री आदर्श शाळा योजना राज्यात राबविण्यात येणार आहे. सीएम श्री शाळा योजने
अंतर्गत ५ हजार शाळा विकसित करण्यात येणार आहेत. तसेच १० हजार शाळांमध्ये "एक
वर्ग आदर्श वर्ग" संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं काल सांगितलं. शालेय
शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने डॉ. रफीक झकेरिया कॅम्पस येथे आयोजित
राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. १० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया
प्रगतीपथावर असून या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचंही ते
म्हणाले.
****
मोबाईलच्या ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवणारं बिहार हे
देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. बिहारमध्ये आज सहा नगर पंचायतींसह इतर ३६ स्थानिक
स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यात आली. मतदारांना आपल्या मोबाईलवर ई-वोटिंग ॲप डाऊनलोड करून, घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दुपारी एक
वाजेपर्यंत ही सुविधा होती. मतदानासाठी उभारलेल्या मतदान केंद्रांवर सायंकाळी पाच
वाजेपर्यंत मतदान करण्याची सोय होती. हा दिवस बिहारसाठी ऐतिहासिक ठरल्याचं, बिहारचे राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी म्हटलं आहे.
****
एका महिला कीर्तनकाराची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात
आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरच्या चिंचडगाव शिवारात शनिवारी सकाळी
साडे सहावाजेच्या सुमारास घडली. संगीताताई अण्णासाहेब पवार असं या कीर्तनकार
महिलेचे नाव आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संगीताताई पवार
या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे वास्तव्यास होत्या.
त्यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने वार केले.
****
छत्रपती संभाजीनगर शहराच्या सौंदर्यात आणि वाहतूक व्यवस्थेत
अडथळा ठरणाऱ्या तब्बल ३ हजार अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाई होणार
आहे. जालना रोड,
जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड आणि पडेगाव या प्रमुख मार्गांवर अतिक्रमण हटवून दोन्ही बाजूंनी ६०
मीटर रुंदीचा रस्ता आणि सर्व्हिस रोड तयार केला जाणार आहे. या मोहिमेमुळे शहराचे
मुख्य प्रवेशद्वार मोकळे होतील आणि वाहतुकीला दिलासा मिळेल, अशी माहिती आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली. मुकुंदवाडी ते चिकलठाणा दरम्यान
काही दिवसांपूर्वी थांबवण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली
आहे. अतिक्रमण हटवताना कोणालाही सवलत दिली जाणार नाही, असे
आयुक्त श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे.
****
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाच्या तसेच
राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
त्यानुसार उद्या २९ जून रोजी पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची घोषणा करण्यात येणार
आहे. तसेच राष्ट्रीय परिषद सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. ३०
जून रोजी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता
येतील. दुपारी ३ ते ५ या वेळात हे अर्ज दाखल करता येतील. १ जुलै रोजी सकाळी १०
वाजता प्रदेश अध्यक्षांच्या व राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात
येईल,
अशी माहिती प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती
यांनी दिली आहे.
****
परभणी जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत, तर नगदी पीक म्हणून असलेले कापूस आणि हळद पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. या
पार्वश्वभूमीवर जिल्ह्यात १५ दिवस विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात आले होते.
९० गावांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठाच्या कृषी शास्त्रज्ञांनी
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पेरणी मार्गदर्शन करून सुधारित बियाण्याची निवड, उगवण क्षमता चाचणी, बीज प्रकिया, पेरणीच्या पद्धती तसेच खत व्यवस्थापन यासह नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
केलं.
****
विदर्भात जलपर्यटनाला वाव असून भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा
कोरंबी येथील जलपर्यटन प्रकल्पाचं काम दर्जेदार व्हावं, अशी
अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त
केली. शिंदे यांनी आज या प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र भौंडेकर, अतिरीक्त जिल्हाधिकारी
राजेंद्रकुमार जाधव यांचीही उपस्थिती होती. या प्रकल्पात जागतिक दर्जाचे जल पर्यटन
केंद्र विकसित केले जाणार आहे.
****
शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकीय पक्षांनी राजकारण
न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असं आवाहन इंडिया अगेन्स्ट
करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी आज केलं. राज्य
सरकारने कुठल्याही भाषेची सक्ती केलेली नाही. सर्व भाषांचा आदर राखत राज्याच्या
सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना सरकार विविध पर्याय देत आहे. परंतु, विरोधकांकडून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दात पाटील यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
****
आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या महिलांना आरोग्यविषयक
सोई-सुविधा मिळण्यासाठी राज्य महिला आयोगातर्फे आरोग्यवारी उपक्रम सुरू आहे.
वारकरी महिलांना सॅनिटरी नॅपकिन, बालकांना स्तनपानाकरिता
हिरकणी कक्ष,
न्हाणीघर, शौचालय, स्वच्छतागृह, दामिनीपथक, प्राथमिक
उपचार,
रुग्णवाहिका आदी सुविधा याद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या
आहेत.
****
विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या कौंडण्यपूर इथं वर्धा
नदीला २११ मीटरची साडी-चोळी अर्पण करण्याचा सोहळा संपन्न झाला. भगवान श्रीकृष्णाचे
सासर अर्थात माता रुक्मिणीचं माहेर म्हणून या भागाची पौराणिक ख्याती आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून ही अखंड साडी वर्धा
नदीला अर्पण करण्यात आली. असंख्य वारकरी - भाविक याप्रसंगी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment