Friday, 27 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 June 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      हेजिंग डेस्क’ हे कृषी विकासाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      ६१ वे राज्य मराठी चित्रपट तांत्रिक तसंच बालकलाकार पुरस्कार जाहीर

·      उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी शासन कटीबद्ध-मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

·      ओडिशात जगन्नाथ पुरी इथल्या रथयात्रेला प्रारंभ-ठिकठिकाणी रथयात्रांचं आयोजन 

आणि

·      हॉकी इंडिया मास्टर्स चषक स्पर्धेत पुरुष गटात तमिळनाडू अजिंक्य-महाराष्ट्राला उपविजेतेपद

****

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी भविष्यात त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. या अंतर्गत शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मका, कापूस आणि हळदीसाठी ॲन्युअल कमोडिटी प्राईस रिस्क असेसमेंट रिपोर्टस तयार करून यामध्ये पिकाची सद्यस्थिती, भविष्यकालीन अंदाज आणि धोरणविषयक उपाय सुचवले जातील.

हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना म्हटलं आहे.

****

सात्यपूर्ण प्रयत्न, समर्पित भावना आणि निश्चित उद्दीष्ट या त्रिसूत्रीच्या आधारे पदवीधरांनी जीवनात यश संपादन करावं, असं आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुणे इथं सिम्बायोसिस विद्यापीठात पदवी प्रदान समारंभात राज्यपाल बोलत होते. कठोर परिश्रम, एकाग्रतेची जोड दिल्यास आणि निराश न होता प्रयत्नरत राहिल्यास निश्चितपणे यश संपादन करता येईल, असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. यावेळी विद्यापीठाचे कुलपती. डॉ. एस. बी. मुजुमदार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून अमेय भालेराव, उत्कृष्ट छाया लेखन प्रवीण सोनावणे, उत्कृष्ट संकलन अक्षय शिंदे, उत्कृष्ट ध्वनिमुद्रण कुणाल लोळसुरे, उत्कृष्ट ध्वनी संयोजन विकास खंदारे, उत्कृष्ट वेशभूषा मानसी अत्तरदे, उत्कृष्ट रंगभूषा हमीद शेख, मनाली भोसले यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्य सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे.

६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत. २०२३ या वर्षातल्या पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्मपॅम्प्लेट, जिप्सी, नाळ २, रौंदळ, तेरवं, जग्गु आणि ज्युलिएट, भेरा, आशा, झिम्मा २, अलिबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना विविध श्रेणीत नामांकनं मिळाली आहेत.

****

दरम्यान, राज्याच्या शैक्षणिक धोरणात फक्त मराठी भाषा सक्तीची असून, हिंदी भाषा ऐच्छिक आणि पर्यायी भाषा असल्याचं, मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केलं आहे. वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले...

बाईट - मंत्री आशिष शेलार

****

उद्योगांना आवश्यक असणारं मनुष्यबळ आणि उपलब्ध प्रशिक्षण यातील तफावत दूर करत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उद्योजकांशी संवाद या कार्यक्रमात लोढा बोलत होते. शासनाच्या ४२७ आणि खाजगी ५५० औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधे उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं.

दरम्यान, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात लोढा यांच्या उपस्थितीत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. आपल्या कौशल्य आणि प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधीचा युवक युवतींनी लाभ घ्यावा, असं आवाहन लोढा यांनी केलं. राज्यात छोटे छोटे रोजगार मेळावे घेण्यावर सरकार भर देणार असल्याचं, लोढा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मंत्री मंगलप्रभात लोढा

****

बीड इथं विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. उमाकिरण शैक्षणिक संकुलात दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग करत तिचे अश्लील फोटो काढण्याचा प्रकार समोर आला होता, या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संकुल परिसरात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

****

ओडिशात जगन्नाथ पुरी इथल्या प्रसिद्ध रथयात्रेला आजपासून प्रारंभ झाला. या रथयात्रेसाठी लाखो भाविक पुरी नगरीत दाखल झाले आहेत. पुरीच्या मंदिरात विरामान असलेली भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा ही तीनही भावंडं, आजच्या दिवशी लाकडी रथात बसून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडिचा मंदिरात आपल्या मावशीकडे मुक्कामी जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नऊ दिवस ही रथयात्रा चालते, त्यानंतर हे सर्व देव आपल्या मंदिरात परत येतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रथयात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विविध ठिकाणी आज रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही शहर परिसरातून रथयात्रा काढली जात आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमातून २९ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना पंतप्रधानांसोबत काही कल्पना अथवा सूचना सामायिक करायच्या असतील तर आज सायंकाळपर्यंत १८०० ११ ७८०० या क्रमांकावर संपर्क साधावा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन मन की बात कार्यक्रम प्रसारीत केला जातो.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर विधानसभा मतदारसंघात विकासकामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिदेत ते बोलत होते. कोट्यवधी रुपयांची कामं कागदोपत्री पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं, मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम सुरूही झालेलं नाही, याकडे बंब यांनी लक्ष वेधलं, ते म्हणाले...

बाईट - आमदार प्रशांत बंब

 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात विद्युत सेवा देणाऱ्या संस्था बिलासाठी काम करतात, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेडने विद्युत पोल उभारण्यासाठी, रोहित्र बदलण्यासाठी आणि विद्युत तारा लावण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्था काडीमात्र काम करत नाहीत, शेतकरी आपल्या पातळीवर या कामासाठी खाजगी व्यवसायिकांना पैसे देऊन हे काम करून घेतात, अशी माहिती दानवे यांनी दिली.

****

हॉकी इंडिया मास्टर्स चषक स्पर्धेत पुरुष गटात तमिळनाडू संघ अजिंक्य ठरला आहे. आज चेन्नईत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत तमिळनाडूने महाराष्ट्र संघाचा पाच विरुद्ध शून्य असा पराभव केला. तमिळनाडूच्या संघाने प्रारंभापासून सामन्यावर वर्चस्व मिळवलं, त्यामुळे महाराष्ट्र संघाला या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

****

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नांदेड जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचं स्वप्न साकार होत आहे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात १ लाख ५० हजार ७८५ घरकुलांचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं, यापैकी १ लाख ४५ हजार ६९८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून, १ लाख ३० हजार ५१ लाभार्थ्यांना निधीचा पहिला हप्ता, तर ३० हजार ८ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरीत झाला आहे,‌ असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात लाडकी बहीण पतसंस्था  सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांनी ७०० रुपयांचे रोखे आणि १०० रुपये सभासद शुल्क भरल्यानंतर त्या पतसंस्थेच्या सदस्य बनतील.

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्हाभरात आज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...