Monday, 30 June 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 30.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 30 June 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात-५७ हजार ५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी सादर

·      शालेय शिक्षणात भाषेच्या मुद्यावरून महाविकास आघाडीची घोषणाबाजी

·      एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय

·      पंढरपूर इथं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व्हीआयपी दर्शन सेवेवर निर्बंध लागू

आणि

·      महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा छत्रपती संभाजीनगर विभागात पाच लाखांचा टप्पा पार

****

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. विधान भवनाच्या प्रांगणातील ‌छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच, मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांचा सदनाला परिचय करून दिला. त्यानंतर विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. सदस्य अमित साटम, किशोर पाटील, सुलभा खोडके, चेतन तुपे, नितीन देशमुख, संजय मेश्राम, अभिजित पाटील, समीर कुनावार आणि समाधान आवताडे यांची तालिका सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विविध खात्याच्या मंत्र्यांनी विविध शासकीय विधेयकं सभागृहासमोर ठेवली.

दिवंगत डॉ. जयंत नारळीकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते लहानू कोम, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. श्रध्दा टापरे आणि माजी आमदार रोहिदास देशमुख यांच्या निधनाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

विधान परिषदेत अरुणकाका जगताप आणि डॉ.रामदास आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्ताव संमत झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने रस्तेविकास, मेट्रो सेवा आणि सिंचनासारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बल, वंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

****

महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारतीय संविधानाला उत्तरदायी असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत पत्रकारांशी बोलतांना, मुख्यमंत्र्यांनी ही बाब स्पष्ट केली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाषेच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. त्यानंतर या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.

****

मातृभाषेवरचं प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असायला हव, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, शिक्षणाच्या समितीवर अर्थतज्ज्ञाची नियुक्ती करुन सरकार थट्टा करत असल्याची टीका ठाकरे यांनी केली. ते म्हणाले...

बाईट – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

****

वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसंच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत आहेत, राजेश कुमार यांनी सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला.

****

राज्य मार्ग परिवहन- एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांना प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसंच ॲपवर आगाऊ आरक्षण करता येईल. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचा गर्दीचा काळ सोडता वर्षभर ही योजना सुरू राहील. मात्र, कोणत्याही सवलतीचा लाभ न घेणाऱ्या प्रवाशांनाच या योजनेचा फायदा घेता येईल. तसंच जादा बससाठी ही सवलत लागू नसेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आय पी एस दर्जाच्या अनुभवी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालच्या विशेष तपास पथकाद्वारे स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी विचार करून योग्य निर्णय घेण्याची सूचना केल्याचं, मुख्यमंत्र्यांनी  माध्यमांना सांगितलं.

****

पंढरपूर आषाढी वारी निमित्त पांडूरंगाच्या दर्शनासाठी येणारे सर्वसामान्य वारकरी आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी व्हीआयपी दर्शन सेवेला जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही अंशी प्रतिबंध घालण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत काही सक्त सूचना केल्या असून यामध्ये, मंदिरापर्यंत व्हीआयपींच्या गाड्यांना प्रतिबंध घातला आहे, याशिवाय महापूजेदरम्यान मोजक्याच लोकांना गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, आषाढी वारी सोहळ्यासाठी आळंदीहून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं दाखल झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचं स्वागत करून माऊलीच्या पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं. लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यात बिटरगाव मुक्कामावर दाखल होत आहे. या पालखी सोहळ्यातलं चौथं रिंगण उद्या कव्हेदंड इथं साजरं होणार आहे.

****

बीड इथं वेठबिगारी, मानव तस्करी आणि नालसा योजना यासंदर्भात कार्यशाळा पार पडली. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तसंच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. न्यायमूर्ती यावलकर यांनी यावेळी केलेल्या भाषणात वेठबिगारी सारख्या प्रथा संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त करत, प्राधिकरणाने स्पेशल सेलच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात २८ वेठबिगारांची मुक्तता केल्याचं, तसंच त्यांच्या पुनर्वसनाचं काम सुरू असल्याची माहिती दिली.

****

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत सहायक अभियंता अरुणसिंह ठाकूर आज सुमारे ३६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. ठाकूर यांनी या प्रदीर्घ कालावधीत मुंबई, दमण तसंच छत्रपती संभाजीनगर इथं सेवा दिली आहे. ठाकूर यांच्यासह प्रकाश वेळंजकर तसंच विजय सोनवणे हे कर्मचारीही आज आकाशवाणीच्या सेवेतून निवृत्त झाले, छत्रपती संभाजीनगर केंद्रात झालेल्या छोटेखानी समारंभात या सर्वांना निरोप देण्यात आला.

****

लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून अमोल तांबे यांनी पदभार स्वीकारला. नव्या पोलीस अधीक्षकांचं पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आलं. मावळते पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अमोल तांबे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

****

वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करत केवळ 'इमेल' आणि 'लघुसंदेश अर्थात-एसएमएस' या पर्यायांची निवड करणाऱ्या ग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेमध्ये ५ लाखांचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर विभागाकडून ही माहिती देण्यात आली. या योजनेत सहभागी ग्राहकांना वीज देयकात प्रति महिना १० रुपये सूट देण्यात येते. या सर्व ५ लाख ३ हजार ७९५ वीजग्राहकांना, वार्षिक ६ कोटी ४ लाख ५५ हजार रुपयांचा एकूण लाभ होत आहे.

****

नाशिक इथं एका बांधकामस्थळावर खोदलेल्या खड्ड्यात बुडून तिघा अल्पवयीन शाळकरी मित्रांचा मृत्यू झाला. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर परीसरातल्या नागरीकांनी संबंधीत विकासकाच्या विरोधात कारवाईसाठी रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान, संबंधित विकासकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

धुळे तालुक्यातील आर्वी गावाजवळ नाकाबंदी करीत धुळे तालुका पोलिसांनी आतिक रफिक शेख नामक इसमाला गावठी पिस्तुलासह रंगेहाथ पकडून ३७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. हा इसम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर इथला रहिवासी आहे.

****

No comments: