Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27
June 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जून
२०२५ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि चीन यांच्यात २०२०
पासून सीमावादामुळं निर्माण झालेला तणाव आणि परस्पर अविश्वास दूर करण्यासाठी तसंच सीमारेषेवर
कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे. चीनमध्ये शांघाय सहकार्य
संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे
संरक्षण मंत्री अॅडमिरल डोंग जून यांच्याशी एक विशेष बैठक घेत दोन्ही देशातला तणाव
कमी करण्यासंदर्भात चर्चा केली. सीमा-संबंधित विविध मुद्द्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी
संवाद सुरू ठेवण्यास दोन्ही देशांच्या नेत्यांनी सहमती दर्शविल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी
सुलभता वाढवण्यासाठी सरकारनं सुगम्य भारत अॅप विकसित केला आहे. यात नुकत्याच प्रभावी
सुधारणा करत वापरकर्त्यांसाठी अॅप अधिक सुलभ केला आहे. तसंच एआय-संचालित चॅटबॉट सुविधा
देण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या
निवेदनात ही माहिती दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला
सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विविध
निकषांवरील कामगिरीसंदर्भातील आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री
पंकज चौधरी, वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापकीय
संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
****
२०२६ च्या साखर हंगामात देशातील
साखर उत्पादन १५ टक्क्यांनी वाढून सुमारे ३५ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा
आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि
कर्नाटकमध्ये उसाचे उत्पादन आणि लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज क्रेडिट रेटिंग एजन्सीनं
प्रकाशित केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. जास्त उत्पादनामुळं देशांतर्गत
पुरवठ्याच्या चिंता कमी होतील. धोरणात्मक परिस्थिती अनुकूल असल्यास, इथेनॉल निर्यातीस
परवानगी मिळेल, असं या अहवालात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या निमित्तानं देशवासीयांना
शुभेच्छा दिल्या आहेत. भव्य रथांवर विराजमान भगवान बलभद्र, भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा
आणि चक्रराज सुदर्शन यांच्या मूर्तींचं दर्शन घेऊन लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळेल, असं राष्ट्रपतींनी
आपल्या सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन
की बात कार्यक्रमातून २९ जून रोजी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना पंतप्रधानांसोबत
काही कल्पना अथवा सूचना सामायिक करायच्या असतील तर आज सायंकाळपर्यंत १८०० ११ ७८०० या
क्रमांकावर संपर्क साधावा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
मन की बात कार्यक्रम प्रसारीत केला जातो.
****
१९७५ मध्ये लादलेली आणीबाणी
ही देश आणि समाजाचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी होती, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री
एस जयशंकर यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात संबोधित करत होते.
स्वातंत्र्य कधीच गृहित धरलं जाऊ नये, याची आणीबाणीमुळे प्रचिती
आल्याचं, जयशंकर म्हणाले.
****
आणीबाणीच्या ५० व्या वर्षानिमित्त, केंद्रीय सांस्कृतिक
मंत्रालयानं दिल्ली सरकारच्या सहकार्यानं 'संविधान हत्या दिवस' हा कार्यक्रम
नुकताच आयोजित केला होता. आणीबाणीच्या काळ्या दिवसांना केवळ इतिहासातील एक प्रसंग म्हणून
नाही तर लोकशाही आदर्शांच्या संरक्षणाचा एक कायमचा धडा म्हणून लक्षात ठेवणं महत्त्वाचं
असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याप्रसंगी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या सर्व
बँकांनी वर्ष २०२५-२६ च्या खरीप पीक कर्जाचं जास्तीत-जास्त वितरण करुन वेळेत उद्दिष्ट
पूर्ण करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली
नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात
बँकनिहाय पीक कर्ज वितरणाचा तपशील, पीक कर्जाचा केलेला परतावा, पीक कर्ज नूतनीकरण प्रकरणं
याची तपशीलवार माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही गुप्ता यांनी
दिले आहेत.
****
भारत आणि अमेरिका यांच्यातील
व्यापार कराराची शक्यता पाहता, आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स
१५० अंकांनी वाढून ८३ हजार ९०६ वर पोहोचला, तर निफ्टी ५५ अंकांनी वाढून
२५ हजार ६०३ वर पोहोचला. सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि आयटी क्षेत्रात
खरेदी दिसून आली. आशियाई बाजारपेठांमध्ये, चीन, बँकॉक, सोल आणि हाँगकाँगच्या
शेअर बाजारात घसरण दिसून आली, तर जपानच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली.
****
महिला हॉकी इंडिया मास्टर्स
करंडक स्पर्धेची अंतिम लढत आज ओडिशा आणि पंजाब यांच्यात होणार आहे. चेन्नई इथं होणारा
हा सामना दुपारी २ वाजता होणार आहे. दरम्यान, पुरुषांच्या अंतिम फेरीत यजमान
तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्यात आज ४ वाजता चेन्नई इथंच अंतिम सामना होणार आहे.
****
No comments:
Post a Comment