Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 30 June 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जून २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
कैलास मानसरोवर यात्रा आजपासून
सुरू होत आहे. यंदा सिक्कीममधील नाथुला खिंड आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंड मार्गे
आयोजित केली जात असलेली ही यात्रा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यात्रेकरूंची सुरक्षा
आणि इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात सिक्कीम सरकारनं पायाभूत सुविधांसह इतर व्यवस्थापन
केलं आहे. २०२० मध्ये कोविड प्रादुर्भावामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
आजपासून मुंबईत सुरु होत आहे. येत्या १८ जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात
एकूण १२ विधेयकं सादर होणार असून असून प्रलंबित असलेलं एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील
एक विधेयकावर देखील चर्चा होईल. त्याचबरोबर सहा अध्यादेश पटलावर ठेवले जातील.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल पत्रकार
परिषदेत या अधिवेशनातल्या कामकाजाबाबत माहिती दिली. शालेय शिक्षणात तिसरी भाषा समावेशासंदर्भात
शिफारशी करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातले
दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या
हप्त्यासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी यावेळी दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर आजपासून हा निधी
जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा ३६ वा वर्धापन दिन उद्या १ जुलै रोजी साजरा होत आहे.
प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर
यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ मुख्यालयात आयोजित या सोहळ्यात विद्यापीठाचे संस्थापक
कुलगुरू दिवंगत राम ताकवले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण, विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘यश जीवनगौरव’ पुरस्कार, पाच माजी कुलगुरुंचा सत्कार सोहळा, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार तसंच सर्वाधिक नोंदणी असलेले विभागीय केंद्र यांचा
सन्मान या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
अहमदाबाद विमान अपघाताची, विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल, असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं
आहे. काल पुण्यात एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे
घातपाताची शक्यता सध्यातरी आढळून आलेली नाही, असं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
****
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची
अंमलबजावणी करताना बाधित शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. या पार्श्वभूमीवर
'मित्र'चे उपाध्यक्ष आमदार
राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या १९ गावांतील शेतकऱ्यांसोबत सविस्तर
संवाद साधला. या महामार्गासाठी सध्या सुरू असलेली जमिनीची मोजणी अतिरिक्त जिल्हाधिकारी
यांच्या आदेशानुसार तात्काळ थांबवण्यात आली असून, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महायुती शासन कोणताही पुढील निर्णय घेणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जामा
मशिदीच्या परिसरात काल भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आलं. बुढी लेन सोशल ग्रूपच्या वतीने
घेण्यात आलेल्या या शिबीरात सुमारे सातशे नागरिकांनी रक्तदान केलं. शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय रुग्णालय घाटीच्या रक्तपेढीनं रक्त संकलन केलं. रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ शिवाजी सुक्रे यांनी या शिबीराला भेट देऊन रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
****
रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी
टप्प्याटप्प्याने आरक्षण यादी तयार करण्याची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश रेल्वे
मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षा
यादीतील तिकिटं असलेल्या प्रवाशांची अनिश्चितता कमी होईल तसेच प्रतीक्षा यादीतील तिकिटे
निश्चित न झाल्यास प्रवाशांना पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, आदल्या दिवशी रात्री ९ वाजता यादी तयार करण्यात यावी, असं वैष्णव यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नवी आरक्षण प्रणाली प्रति मिनिट एक लाख पन्नास हजारांहून अधिक
रेल्वे तिकिटं तयार करण्यास सक्षम आहे. या वर्षाच्या अखेरीस नवीन प्रवासी आरक्षण प्रणाली
तयार होईल, तसेच तिकीट तपासणी क्षमता प्रति मिनिट चार लाखांवरून
चाळीस लाखांपर्यंत वाढेल, असं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
टेनिस जगतातल्या प्रतिष्ठित
विम्बल्डन स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. १३ जुलैपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत
विद्यमान विजेता कार्लोस अल्कराज, नोवाक जोकोविच, या खेळाडूंसह चार भारतीय टेनिसपटू सहभागी होत आहे. यामध्ये रोहन
बोपण्णा, युकी भांबरी, ऋत्विक बोलिपल्ली, आणि श्रीराम बालाजी यांचा समावेश आहे. हे सर्वजण
आपापल्या परदेशी जोडीदारांसोबत पुरुष दुहेरीत खेळणार आहेत.
****
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर
आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी
केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तीन जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम
स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment