Sunday, 26 June 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ जून २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 June 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जून २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणालाही वापरता येणार नाही, बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई करण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुखांना देण्याचा राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय

·      एकनाथ शिंदे गटातल्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस, ४८ तासांत उत्तर देण्याची विधानसभा उपाध्यक्षांची सूचना

·      अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड आणि १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीस संदर्भात न्यायालयात जाण्याचा बंडखोर गटाचा निर्णय

·      बंडखोर आमदारांचे समर्थक तसंच विरोधकांमध्ये राज्यात विविध ठिकाणी निदर्शनं

·      राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश दिलेले नाहीत- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

·      सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात दहशतवाद विरोधी विभागाकडून अटक

आणि

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ७२८ रुग्ण, मराठवाड्यात ५७ बाधित

****

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणालाही वापरता येणार नाही, असा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत यासह विविध सहा ठराव संमत करण्यात आले. बंडखोर आमदारांवर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, मात्र कारवाईचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचा निर्णयही कार्यकारिणीने काल घेतला.

****

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे गटातल्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. ४८ तासांत म्हणजेच सोमवारी २७ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याची सूचना बंडखोर आमदारांना करण्यात आली आहे. उत्तर न दिल्यास या नोटिसनुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड आणि १६ आमदारांना नोटीस यासंदर्भात न्यायालयात जाणार असल्याचं, बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते काल गुवाहाटीहून ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते. नैसर्गिक न्यायाप्रमाणं विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीस देताना आम्हाला ७ दिवसांची मुदत द्यायला हवी होती. तसंच संख्याबळ आमच्याकडे असल्याने आम्हाला आमचा गट स्थापन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. घटनात्मक अधिकार मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ, असं दीपक केसरकर म्हणाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे, त्यामुळे त्यांना अपात्रतेची नोटीस बजावण्याचा अधिकार नसल्याचा मुद्दा शिंदे गटाने उपस्थित केला आहे. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव फेटाळला, तर विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी करू, असं केसरकर यांनी सांगितलं.

आपला गट शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आघाडीत राहण्यास आमचा विरोध असल्याचं, शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून सांगण्यात आलं आहे. आपल्यापैकी कोणीही शिवसेनेतून बाहेर पडलेलं नाही, आपल्या गटाचं नाव शिवसेना बाळासाहेब गट असं असेल, मात्र निवडणूक आयोगानं नकार दिला, तर विचार करू, असं केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

 

खासदार श्रीकांत शिंदे यांनीही काल ठाण्यात शिवसैनिकांशी संवाद साधताना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासकामांबाबत होणारी अडवणूक आणि त्यामुळे होणारी घुसमट कथन केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये पक्ष बघून निधी दिला जात असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. शिवसंपर्क अभियानातून अनेक आमदारांनी ही खदखद व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

****

राज्यात काल बंडखोर आमदारांविरोधात अनेक ठिकाणी समर्थक तसंच विरोधकांनी निदर्शनं केली.

नाशिक इथंले शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थनात शिवसैनिकांनी नाशिकमध्ये संपर्क कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. मतदारसंघाला विकासकामांसाठी निधी मिळालेला नाही, त्यामुळे आमदार कांदे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून आपण त्यांच्या पाठीशी राहू असं यावेळी त्यांच्या समर्थकांनी माध्यमांना सांगितलं.

बुलडाणा इथं शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनात काल निदर्शनं केली. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं आवाहन या समर्थकांनी केलं.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात निदर्शनं करत,तोडफोडही केली. पुण्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या फलकाला शिवसैनिकांनी काळं फासलं. पुण्यातच शिवसेना नेते आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली. मुंबईत आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेरच्या नामफलकाची शिवसैनिकांनी तोडफोड केली. या प्रकरणी शिवसेनेचे शाखाप्रमुख दिलीप मोरे आणि एकोणीस आंदोलकांना, पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी शिवसैनिकांनी मोर्चा काढून कल्याणकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. आमदारांनी २४ तासात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेत परत येण्याचं आवाहन माजी जिल्हा प्रमुख भुजंग पाटील डक यांनी केलं आहे. तर नांदेड तालुका शिवसेना पक्ष प्रमुख जयंत कदम यांनी कल्याणकर यांना मतदार संघात फिरू दिलं जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

औरंगाबाद इथं संदिपान भुमरे यांच्या कार्यालयाबाहेरच्या फलकावर भुमरे यांच्या छायाचित्राला काळं   फासण्यात आलं, पैठण इथं मात्र भुमरे यांच्या समर्थनात फलक झळकावले जात आहेत.

परभणीशिवसैनिकांनी आमदार एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध आंदोलन केलं. उस्मानाबादमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत सावंत यांच्या पोस्टरला काळं फासलं. तर बीडमध्ये मुंडन करुन शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा निषेध केला.

****

मुंबई पोलिसांनी मुंबईत येत्या दहा जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या अंतर्गत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, कुठल्याही व्यक्तींच्या कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका, ध्वनिक्षेपक आणि संगीत वादकांचा संच आणि कुठल्याही प्रकारच्या मिरवणूकीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विवाह आणि तत्संबंधित इतर सोहळे, अंत्ययात्रा, चित्रपट-नाट्यगृह,  सहकारी संस्थांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, उद्योग-व्यापार विषयक व्यवहार, सरकारी कार्यक्रम यांना यातून वगळलं आहे.

****

राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं त्यांनी सांगितलं. ठाकरे सरकारनं बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्यावर गृहमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

 

गुजरात दहशतवाद विरोधी विभाग - एटीएसच्या दोन पथकांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना काल मुंबईहून ताब्यात घेतलं. गुजरात २००२ च्या गुजरात दंगलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने परवा झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावताना तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संस्थेची चौकशीची सूचना केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथक - एसआयटीने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ६२ राजकारणी आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या क्लीन चिटविरोधात झाकिया जाफरी यांनी याचिका दाखल केली होती.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ७२८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ५६ हजार १७३ झाली आहे. काल या संसर्गानं चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७  हजार ९०० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ७०८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ८३ हजार ९४० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार  ३३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २२, उस्मानाबाद १७, लातूर ११ जालना ६, तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

राज्यात पहिल्यांदाच बीए ५ व्हेरीयंट १७  आणि बीए ४ व्हेरीयंटचे सात रुग्ण आढळले आहेत.  या रुग्णांमध्ये ११ पुरूष आणि १२ महिला आहेत. राज्यात आतापर्यंत आढळलेलल्या बी ए ५ आणि बी ए. ४ रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. यात १५ रुग्ण पुण्यातील, २८ मुंबईतील, ४ नागपूरमधील तर दोन ठाण्यातील रुग्ण आहेत

****

 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या भैरवनाथ शुगर या खाजगी साखर कारखान्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प उभारला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिला सीएनजी निर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प ग्रामीण शेती पूरक व्यवसाय देशाच्या प्रगतीला हातभार लावून आत्मनिर्भरतेकडे नेणारा ठरेल, असा विश्वास या कारखान्याचे संचालक भैरवनाथ ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

Byte…

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी वेस्ट टू वेल मधून संपत्ती निर्मिती आणि पर्यावरण संतुलित उद्योग निर्मिती या संकल्पनेनुसार केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यावरण संतुलन राखत भैरवनाथ साखर उद्योगानं साखर उद्योगातील सांडपाण्यावर बायोगॅस निर्मितीपासून सी एन जी निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या कारखान्यात उत्पादित होत असलेल्या इथेनॉल निर्मितीनंतरच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज पन्नास हजार घनमीटर बायोगॅस इथं तयार होतो. त्यातून दररोज पाच टन बायो सी एन जी इथं निर्मिती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक असणारा हा शेतीपूरक व्यवसाय देशाच्या प्रगतीला हातभार लावून आत्मनिर्भरतेकडे नेणारा ठरेल असा विश्वासही ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

****

हिंगोली इथं सुसज्ज असं ग्रंथालय भवन उभारण्यात येणार असल्याचं, जिल्ह्याच्या पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या.  हिंगोली इथं २०१० मध्ये शासकीय ग्रंथालय सुरु करण्यात आलं असून ते सध्या भाड्याच्या जागेत सुरू आहे. या ग्रंथालयाच्या इमारतीसाठी २० गुंठे जागा अधिग्रहीत करण्यात आली असून या जागेवर सुसज्ज असं ग्रंथभवन उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सहा कोटी ७२ लाखाचा प्रस्ताव सादर केला असल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरात आज सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत राज्यातल्या सामाजिक अन्याय, अत्याचाराच्या घटना आणि जातीय तणावासंदर्भात चर्चा होईल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड या परिषदेला उपस्थित असतील. या परिषदेत परभणीचे राधाजी शेळके आणि जिजाबाई शेळके या सामाजिक कार्यकर्त्यांना तर नागपूर इथल्या जनसंघर्ष समितीचे सामाजिक कार्यकर्ते गिरीश चव्हाण यांना राजर्षी धाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातल्या बारवाचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. १६ बारवा असलेल्या रेणापूर शहरापासून या मोहिमेला जिल्हा नगरपरिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. जल संवर्धनाबरोबर संस्कृतीचे जतन होणारी ही चळवळ लातूरचा आणखी एक नवा पॅटर्न तयार करील अशी अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

****

बीड जिल्ह्यात मागील दोन दिवसात पडलेल्या पावसानंतर साडे तेरा टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात पेरणी योग्य असे साडे सात लाखापेक्षा जास्त क्षेत्र असून आतापर्यंत एक लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन हे दोन प्रमुख पिकं असून, कपाशीची २१ टक्के तर सोयाबीनची ९ टक्के पेरणी झाली आहे. जोपर्यंत शंभर मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

****

औरंगाबाद इथंल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या छोट्या पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दर्शन सुरळीत व्हावं, त्यांचं आरोग्य तसंच विविध उपाय योजना राबवण्या संदर्भात काल पंढरपूर इथल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीला ग्रामपंचायत, महावितरण, अग्निशामन विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****

श्रीलंकेत डम्बुला इथं भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या दुसऱ्या महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात काल भारतानं सलग दुसरा विजय मिळवला. श्रीलंकेनं विजयासाठी ठेवलेलं १२६ धावांचं आव्हान भारतानं ५ गड्यांच्या मोबदल्यात १९ षटकं आणि एका चेंडूत पार करत हा विजय प्राप्त केला.

****

 

 

No comments: