Saturday, 25 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय सुडातून झाले असल्याचं, केंद्रीय गृहंमत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी, दंगली प्रकरणी अनेक खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या, असं सांगितलं. मोदींवर झालेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं सिद्ध झालं असून, त्यांचं नेतृत्व हे सोन्यासारखं झळाळून निघालं असल्याचं ते म्हणाले. २००२ मध्ये झालेले दंगे रोखण्यासाठी लष्कर बोलावण्यात कोणतीही दिरंगाई करण्यात आली नव्हती, मात्र, याप्रकरणी मोदींवर चुकीचे आरेप करण्यात आले होते, त्यावेळी झालेल्या गोळीबारात फक्त मुस्लिमांचा मृत्यू झाल्याची बाब न्यायालयानं देखील अमान्य केली असल्याचं शहा यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असं गृहमंत्री दीलिप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे सरकारनं बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्यावर गृहमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं. आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 बैठकीत भाग घेण्यासाठी उद्या जर्मनी दौऱ्यावर जाणार आहेत. भारताव्यतिरिक्त जर्मनीनं अर्जेन्टिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका यांनाही या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे, असं परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितलं. हवामान, उर्जा आणि आरोग्य हे एक सत्र, तसंच अन्न सुरक्षा आणि स्त्री-पुरुष समानता विषयीचं दुसरं अशा दोन सत्रात पंतप्रधान सहभागी होणार असल्याचं क्वात्रा यांनी सांगितलं.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या पंतप्रधान नागरी आवास योजनेला आज सात वर्ष पूर्ण झाली. या योजनेअंतर्गत सुमारे एकशे तेवीस लाख घरं मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत एक कोटींहून अधिक घरं उभारण्यात आली असून, ६१ लाखांहून अधिक घरं लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.

****

केंद्र सरकारनं केंद्रीय गुप्तचर विभागाचे नवे संचालक म्हणून, भारतीय पोलीस सेवेतले वरीष्ठ अधिकारी तपन कुमार डेका यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असेल. १९८८ च्या तुकडीतले अधिकारी असलेले डेका यांच्याकडे गुप्तचर विभागाच्याच विशेष संचालकपदाची जबाबदारी आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी वेळेत कर्ज पुरवठा करुन, शासनाच्या विविध लाभाच्या योजनेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन कर्ज पुरवठा करावा, अशी सूचना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल जिल्हा अग्रणी बँक समितीच्या आढावा बैठकीत दिली. औरंगाबाद जिल्हा खरीप हंगामातल्या कृषी उत्पन्नावर आधारित असणारा जिल्हा असल्यानं, शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी लागणारी कर्जप्रकरणं बँकांनी प्राधान्यानं मंजूर करावीत, असंही ते यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित न्यू हॉरिजन इन मटेरियल सायन्स ॲण्ड नॅनोटेक्नॉलॉजी या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन काल झालं. पोर्तुगाल इथले भौतिकशास्त्राचे प्राध्यापक फिलिप वाझ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आज या परिषदेचा समारोप होणार आहे.

****

नांदेड - वाघाळा शहर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नव्यानं प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात आला असून, या आराखड्यात ९१ सदस्यांसाठी एकूण ३० प्रभाग प्रकाशित करण्यात आले आहेत. प्रभाग रचना प्रारुप आराखड्यावर आक्षेप नोंदवण्यासाठीच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत ५९ आक्षेप दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अमेझिंग औरंगाबादतर्फे उद्या रविवारी शहरातल्या हिमायतबाग परिसरात हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी इतिहासतज्ञ डॉ.दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी हे स्थानिक इतिहास आणि वारसा जतन चळवळीवर प्रकाश टाकणार आहेत. या वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लोकांनी रविवारी सकाळी साडे सात वाजता हिमायतबागेच्या प्रवेशद्वारावर जमावं, असं आवाहन संयोजकांनी केलं आहे.

****

फ्रान्स इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी मिश्र सांघिक प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत ज्योती सुरेखाचा सामना आज फ्रान्सच्या डोडमोंट सोबत होणार आहे.

****

No comments: