Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 June 2022
Time - 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जून २०२२ सायंकाळी
६.१०
****
· राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी साडे सात वाजता शपथ
घेणार.
· अडीच वर्षांत चालू कामांना स्थगिती, विकास काम नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार बघायला
मिळाला- देवेंद्र फडणवीस यांची टीका.
· फडणविसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकासाठी मनाचा मोठेपणा दाखवला - एकनाथ शिंदे
यांची भावना.
आणि
· देशात कोरोना विषाणू संसर्ग मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ५५ शतांश टक्के.
****
बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी साडे सात वाजता राज्याचे विसावे
मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी
आज शिंदे यांच्यासह मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातली घोषणा केली. शिंदे
आज एकटेच शपथ घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. फडणवीस म्हणाले –
कुठल्यातरी मुख्यमंत्री
पदाकरता आम्ही करत नाही आहोत. ही तत्वांची लढाई आहे. ही हिंदुत्वाची लढाई आहे. ही विचारांची
लढाई आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब
यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल. आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील.
मग आम्ही एक्सपँशन करू. शिवसेनेचे, शिंदे साहेबांसोबत असलेले, अपक्षामधले आणि भारतीय
जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपँशनमध्ये या मंत्रीमंडळात येतील. मी स्वत: बाहेर
असेल पण हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे. पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी
देणार.
नवं सरकार इतर मागास वर्गाचं तसंच मराठा आरक्षण आणि अन्य सगळे असे विषय एका टप्प्यापर्यंत
नेईल. सर्वांना न्याय देण्याचा हे सरकार प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं. मावळत्या
मंत्रिमंडळानं शेवटच्या दिवशी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशीव
केलं, नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं, याला आपलं समर्थन असेल,
असंही फडणवीस म्हणाले. त्या आधी फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते
प्रवीण दरेकर, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह
विविध नेते उपस्थित होते.
****
महाविकास आघाडी अस्तित्वात आली हा जनमताचा अपमान होता, अशी टीका फडणवीस यांनी या
पत्रकार परिषदेत केली. २०१९मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि अन्य लहान पक्ष,
अपक्ष मिळून आपल्या १७० जागा निवडून आल्या होत्या. सहाजिकच ही अपेक्षा होती की भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार येईल. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं
नावही जाहीर केलं होतं, असं फडणवीस म्हणाले. गेल्या अडीच वर्षांत चालू कामांना स्थगिती,
विकास काम नाही आणि प्रचंड भ्रष्टाचार बघायला मिळाला, असा आरोप त्यांनी केला. या मंत्रिमंडळातले
दोन मंत्री तुरुंगात गेले. या सरकारच्या कार्यकाळात रोज स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्त्वाचा
अपमान होत होता. या शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबना झाली. त्यामुळे त्यांनी काँग्रेस,
राष्ट्रवादीशी आघाडी तोडायचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी या आमदारांऐवजी काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त प्राधान्य दिल्याचं फडणवीस म्हणाले. सरकार पडलं तर पर्यायी
सरकार देऊ, लोकांवर आता निवडणुका लादणार नाही, असं आपण म्हटलं होतं, याकडे फडणवीस यांनी
लक्ष वेधलं. सोळा अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार आपल्या सोबत आले आहेत. अजुन काही
लोक येत आहेत. सगळ्याचं पत्र राज्यपालांना दिलं आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
****
देवेंद्र फडणवीस स्वतःही मुख्यमंत्रीपद घेऊ शकले असते पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे
यांच्या शिवसैनिकासाठी मनाचा मोठेपणा दाखवला, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी या निमित्त
पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. फडणवीस यांच्याकडे भारतीय जनता पक्ष आणि इतर मिळून
सुमारे १२० आमदारांचं संख्याबळ असल्याचं ते म्हणाले. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जात
असल्याबद्दल त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि फडणवीस
यांचे आभार मानले. आपल्या सोबत पन्नास आमदार हे एक वैचारिक भूमिका, राज्याचा विकास
या मुद्द्यावर एकत्र आले आहेत. सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र
प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ही ऐतिहासिक घटना आहे. आपल्या कोणालाही पद पाहिजे असं नाही. फडणवीस मंत्रिमंडळात नसले
तरी ते सोबत आहेत, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.
****
आज अतिशय वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे दुपारी गोव्याहून मुंबईत दाखल
झाले. त्यांनी प्रथम देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर
अवघ्या काही मिनिटांमध्ये ते राज्यपालांना भेटण्यासाठी रवाना झाले.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर
काँग्रेस नेते आणि आमदारांनी आज मातोश्री इथं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास
आघाडीच्या माध्यमातून आपण राज्याला सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं असं काँग्रेस
नेते अशोक चव्हाण यांनी त्या आधी एका संदेशाद्वारे नमुद केलं आहे. या सरकारला राज्याच्या
सर्व घटकातल्या नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण
महाराष्ट्राला असल्याचंही चव्हाण यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. एखादा
माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे
प्रवास सुरू होतो, असं राज ठाकरे यांनी आपल्या या संदेशात नमुद केलं आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ५५ शतांश टक्के
झाला आहे. काल तेरा हजार ८२७ रुग्ण बरे झाले आहेत. या संसर्गातून बरे झालेल्या एकूण
रुग्णांची संख्या चार कोटी २८ लाख २२ हजार ४९३ झाली आहे. सध्या या संसर्गाच्या एक लाख
चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७
कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात आज कोरोनाविषाणू बाधीत
नवे नऊ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या १ लाख २ हजार ८९३ एवढी
झाली असून, सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गानं
दगावलेल्या रुग्णांची संख्या २ हजार ६९२ एवढी झाली आहे.
****
वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम
आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११
ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणा आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा
त्यांना `रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज` देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि
स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात येत आहेत.
****
शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद इथं आगमन झालं. उस्मानाबाद
शहर आणि परिसरातल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा
आज उस्मानाबाद इथं मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूर कडे
मार्गस्थ होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहोळा दीड दिवसांचा
सातारा जिल्ह्यात लोणंद इथल्या मुक्कामानंतर आज तरडगावकडे मार्गस्थ झाला. मार्गावर
पहिलं उभं रिंगण चांदोबाचा माळ इथं झालं. यासाठी हजारोंची गर्दी जमली होती. तरडगाव
इथं मुक्काम आटोपून पालखी सोहोळा उद्या दोन दिवस मुक्कामासाठी फलटणकडे मार्गस्थ होणार
आहे.
****
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि जागतिक क्रमवारीत एकवीसाव्या क्रमांकावर
असलेल्या एचएस प्रणॉय यांनी मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत
प्रवेश केला आहे. सिंधूनं आज क्वालालंपूर इथं थायलंडची प्रतिस्पर्धी फिट्टायापोर्न
चायवानचा १९-२१, २१-९, २१-१४ असा पराभव केला. आता सिंधूचा उपांत्य पूर्व फेरीतला सामना
चिनी तैपेईच्या ताई त्झू यिंगशी होणार आहे.
****
No comments:
Post a Comment