Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 June 2022
Time - 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून २०२२ सायंकाळी
६.१०
****
· शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं बंडखोर शिवसेना आमदारांना परतण्याचं आवाहन.
· राज्य सरकारनं २२ ते २४ जून या कालावधीत काढलेले शासन निर्णय आणि परिपत्रकांबद्दल
माहिती देण्याचे राज्यपालांचे निर्देश.
· कुर्ला इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ११; राज्य सरकारसह शिंदे गटाकडूनही
मदत जाहीर.
· आणि
· औरंगाबादच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी १९३ कोटी रुपये निधीचा
प्रकल्प अहवाल राज्य शासनाला सादर.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी इथं गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांना
परतण्याचं आवाहन केलं आहे. एकत्र बसून यातून मार्ग काढू, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या
मनातील संभ्रम दूर करु या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोणाच्याही कोणत्याही
भूल थापांना बळी पडू नका,असं सांगून पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला
तुमची काळजी वाटत आहे,असं ठाकरे यांनी म्हटलं
आहे.
दरम्यान, ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची आज शिवसेनेतून हकालपट्टी
करण्यात आली. शिंदे समर्थकांमध्ये सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली
आहे. पक्ष विरोधी कारवाया वाढू लागल्याने शिवसेनेकडून ही पावले उचलण्यात येत आहेत.
****
एकनाथ शिंदे गटातील २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते अनिल
देसाई यांनी केला आहे. त्याला एकनाथ शिंदें यांनी आज गुवाहाटीहून प्रत्युत्तर दिलं.
आमच्यापैकी कुणीही मुंबईच्या संपर्कात नाही, असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्या
आमदारांची नावं सांगावीत असं आव्हान शिंदे यांनी दिलं आहे.
****
राज्य सरकारनं २२ ते २४ जून या कालावधीत काढलेले शासन निर्णय आणि परिपत्रकांबद्दल
माहिती द्यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. शिवसेना आमदारांच्या
बंडखोरीनंतर अनेक फाईल्स आणि शासन निर्णय हे मंत्रालयात घाईघाईत मंजूर करण्यात आल्याचा
आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. अल्पमतात दिसणाऱ्या
उद्धव ठाकरे सरकारकडून बिनदिक्कतपणे जारी करण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन त्यावर
बंदी घालण्याची मागणी, दरेकर यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर
राज्यपालांनी शासन निर्णयांचा तपशील मागवला आहे.
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्याचं एकमतानं निश्चित
झालं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज 'मातोश्री' निवासस्थानी
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव
द्यावं असा प्रस्ताव पुढं आला होता. त्यावरून स्थानिक आणि विविध समाज घटकांमध्ये नाराजीचा
सूर होता. आज आगरी, कोळी, कुणबी आदी समाजातील
नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव
देण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
****
मुंबईत कुर्ला इथं काल रात्री उशिरा झालेल्या इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्यांची
संख्या ११ झाली आहे, तर १२ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं
ही माहिती दिली आहे. जखमींपैकी ९ जणांना उपचारानंतर घरी सोडलं आहे.
मृतांच्या कुटूंबाला राज्य सरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली. जखमींवर मोफत उपचार केले जातील,
दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं देसाई यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या बंडखोर आमदार गटाने या दुर्घटनेतल्या मृत नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येकी
पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे
यांच्या सूचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीनं ही मदत करण्यात येणार
आहे.
****
संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आज सातारा जिल्ह्यातल्या पाडेगाव इथं पोहचली.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं. पालखीचा मुक्काम आज लोणंद
इथं होणार आहे.
****
देशाची कोविड लसीकरणाची व्याप्ती १९७ कोटीहून अधिक झाली आहे. दोन कोटी ५६ लाख ३०
हजारावर लसीकरण सत्रांमधून १९७ कोटी ३१ लाख, ४३ हजार, १९६ जणांना कोविड प्रतिबंधात्मक
लस देण्यात आली आहे. आतापर्यंत तीन कोटी ६४ लाख ५८ हजाराहून मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक
लसीची मात्रा देण्यात आली आहे.
****
रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा
राजीनामा दिला आहे. आज रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात
आली आहे.
****
शापूरजी पालोनजी उद्योग समूहाचे अध्यक्ष पालोनजी मिस्त्री यांचं मुंबईत निधन झालं.
ते ९३ वर्षांचे होते. शापूरजी पालोनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड आणि फोर्ब्स टेक्सटाइल्सचे
मालक असलेले पालोनजी यांचा टाटा समूहामध्ये १८ पूर्णांक चार दशांश टक्के हिस्सा आहे.
१८६५ मध्ये स्थापन झालेल्या त्यांच्या समूहाचा कारभार ५० देशात पसरलेला असून, बांधकाम
क्षेत्रातील दिग्गज असलेल्या या समूहाने मुंबईतील मलबार हिल जलाशय, रिझर्व्ह बँकेची,
मुंबई शेअर बाजाराची इमारत, यासह अनेक भव्य इमारती या बांधल्या आहेत. व्यापार आणि उद्योग
क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पालोनजी यांना २०१६ साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं आहे.
****
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान - पीएम-कुसूम योजनेला राज्यात
गती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही योजना राज्यातल्या ३४ ग्रामीण जिल्ह्यात
राबवण्यात येणार आहे. पीएम-कुसूम योजने अंतर्गत सद्य:स्थितीत ५२ हजार ७५० लाभार्थी
निश्चित झाले असून यापैकी पात्र ३५ हजार ५७८ लाभार्थ्याना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी
संदेश पाठवण्यात आले आहेत. यापैकी २७ हजार २६ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा जमा केला
आहे. एकूण १८ हजार ३५७ ठिकाणी सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झालं असून सुमारे चार हजार
सौर कृषीपंप आस्थापित झाले आहेत. मराठवाड्यातल्या औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर,
उस्मानाबाद, नांदेड, परभणी, या सर्व आठ जिल्ह्यांसह राज्यातल्या १८ जिल्ह्यात पीएम
कुसूम योजनेचं उद्दिष्टं पूर्ण झालं आहे.
****
औरंगाबाद शहराच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र
जीवन प्राधिकरणाच्यावतीनं १९३ कोटी रुपये निधीचा एकत्रित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार
करण्यात आला आहे. हा प्रकल्प अहवाल राज्य शासनाला निधी उपलब्धतेसाठी सादर करण्यात आला
असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. यामध्ये
४० किलोमीटर लांबीची ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी बदलून ती ९०० मि.मी. व्यासाची टाकण्यात
येणार आहे. तसंच जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, उच्च पातळीवरील संतुलन जलकुंभ, अस्तित्वातील
पंप आणि त्यांची दुरुस्ती आदि कामं करण्यात येणार आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०२२ साठी
पदवीधर मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, ३० जून पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सध्या
विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सुरू असल्यानं मतदार नोंदणीला मुदतवाढ
देण्याची मागणी, विद्यापीठ विकास मंच च्या वतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्याकडे
करण्यात आली आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मंदाताई देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार अमर हबीब यांना, प्राचार्य डॉ. शैलाताई लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार प्रा. डॉ. अलका सरोदे - वालचाळे यांना तर प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पुरस्कार प्रा. देविदास खोडेवाड यांना जाहीर झाला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात १० व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरित केले जातील.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात
आले आहेत. मंदाताई देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार अमर हबीब यांना, प्राचार्य डॉ.
शैलाताई लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार प्रा. डॉ. अलका सरोदे - वालचाळे यांना तर प्राचार्य
डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पुरस्कार प्रा. देविदास खोडेवाड यांना जाहीर झाला
आहे. हे पुरस्कार
अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे दिवंगत संमेलनाध्यक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जातात.
येत्या ऑगस्ट महिन्यात १० व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार
वितरित केले जातील.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात
असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या
नेतृत्वात आज औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत एक निवेदन
देण्यात आलं. शाळांनी शालेय शुल्कात भरमसाट वाढ केली तसंच शाळेने ठरवलेल्या दुकानातूनच
पुस्तकं आणि गणवेश खरेदी करण्याची जबरदस्ती शाळांकडून केली जात असल्याचं आम आदमी पक्षानं
म्हटलं आहे. अशा तक्रारींची दखल घेऊन कठोर उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून
करण्यात आली आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आणि सेनेच्या बंडखोर आमदारांचा निषेध
करण्यासाठी आज जालना इथं शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत
खैरे, माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात मामा
चौक ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येनं
सहभागी झाले होते.
****
No comments:
Post a Comment