आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० जून २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभेचं आज बोलावलेलं विशेष अधिवेशन
संस्थगित करण्यात आलं आहे. अधिवेशन ज्या प्रयोजनासाठी बोलावण्यात आलं होतं ते प्रयोजन
आता राहिलेलं नाही त्यामुळे हे विशेष अधिवेशन संस्थगित केल्याचं विधानसभेचे प्रधान
सचिव राजेंद्र भागवत यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम
आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११
ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा
त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या
सुविधा पुरवण्यात येत आहेत.
****
देशातच उत्पादन झालेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीवरचं नियंत्रण पूर्णपणे काढून
टाकण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे
तेल उत्पादक कंपन्यांना उत्खनन आणि उत्पादनासाठी अधिक मोकळीक मिळेल असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
एलईडी दिवे, त्यासाठी लागणारं सर्किट, सोलर हीटर, पाणी उपसा करायच्या मोटारी, शाई,
टेट्रा पॅक आणि हिरे यावरच्या जीएसटीचा दर वाढवण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत
घेण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारांकडून देण्यात येणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या
कंत्राटांसाठी १२ ऐवजी १८ टक्के दराने वस्तू आणि सेवा कर द्यावा लागेल. १८ जुलैपासून
हे नवे दर लागू होणार आहेत.
****
दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात नवापोरा इथं काल संध्याकाळी सुरक्षा दल
आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. या भागातल्या दहशतवाद्यांबाबत
गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी ही संयुक्त कारवाई केली.
****
चित्रपट निर्मिती अनुदान महामंडळामार्फत २७ चित्रपटांकरता प्राथमिक टप्प्यात आठ
कोटी ६५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री तथा महामंडळाचे
अध्यक्ष अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. दादासाहेब फाळके चित्रनगरीत काल झालेल्या
संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment