Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 June 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून
२०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्य सरकारनं
२२ ते २४ जून या कालावधीत काढलेले शासन निर्णय आणि परिपत्रकांबद्दल माहिती द्यावी,
असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर
अनेक फाईल्स आणि शासन निर्णय हे मंत्रालयात घाईघाईत मंजूर करण्यात आल्याचा आरोप, विधान
परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता. अल्पमतात दिसणाऱ्या उद्धव
ठाकरे सरकारकडून बिनदिक्कतपणे जारी करण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन त्यावर बंदी
घालण्याची मागणी, दरेकर यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर
राज्यपालांनी शासन निर्णयांचा तपशील मागवला आहे.
****
२०२२-२३
या वर्षासाठी रब्बी हंगामामध्ये केंद्र सरकारने आत्तापर्यंत १८७ लाख ८६ हजार मेट्रीक
टन गव्हाची खरेदी केली आहे. ३७ हजार ८५२ कोटीपेक्षा अधिक किमान आधारभूत मूल्य असलेल्या,
सुमारे १७ लाख ८५ हजार शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. ७५५ लाख मेट्रीक टनापेक्षा
अधिक खरीप पीक आणि १०५ लाख मेट्रीक टन रब्बी पिकांसह सुमारे ८६० लाख मेट्रीक टन पेक्षा
अधिक धान्याची खरेदी आत्तापर्यंत करण्यात आली आहे. याचा फायदा १२५ लाख शेतकऱ्यांना
१६८ कोटी किमान आधारभूत किंमतींसह झाला आहे.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १९ लाख २१ हजार
८११ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ३१ लाख ४३ हजार १९६
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या ११ हजार ७९३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नऊ हजार ४८६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९६ हजार ७००
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
शालेय शिक्षण
आणि साक्षरता विभागानं काल सर्व जिल्ह्यांसाठी २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठी
परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जाहीर केला आहे. या निर्देशांकामुळे राज्याच्या शिक्षण
विभागाला जिल्हास्तरीय शिक्षणातील तफावत ओळखण्यास आणि त्यांच्या कामगिरीत विकेंद्रीत
पद्धतीने सुधारणा करण्यात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जुलै - ऑगस्ट २०२२ मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात
येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह येत्या ३० जूनपर्यंत तर विलंब शुल्कासह
चार जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०२२ साठी पदवीधर मतदार नोंदणी
मोहीम सुरू असून, ३० जून पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सध्या विद्यापीठाच्या पदवी
आणि पदव्युत्तर परिक्षा सुरू असल्यानं मतदार नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी, विद्यापीठ
विकास मंच च्या वतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.
****
राज्य शासनाच्या
“सर्वंकष माहितीकोश २०२१” या पुरस्कारासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, औरंगाबाद
पोलीस उप आयुक्त अपर्णा गिते यांचा उद्या, सांख्यिकी दिनी गौरव करण्यात येणार आहे.
गिते यांनी नियत प्रशासन शाखा, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, शहर वाहतूक शाखा,
महिला तक्रार निवारण शाखा, अशा लहान मोठ्या ४० जबाबदाऱ्या पार पाडताना, अतिरिक्त जिल्हा
समादेशक, होमगार्ड औरंगाबाद ही सुद्धा जबाबदारी तितक्याच ताकदीने आणि सक्षमपणे सांभाळून
केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, त्यांना गौरवण्यात येणार आहे.
****
कृषी संजीवनी
मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातल्या मौजे वानेवाडी इथं शेतकर्यांना मार्गदर्शन
करण्यात आलं. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सत्यजित देशमुख यांनी शेतकऱ्यांना पंतप्रधान
सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेविषयी माहिती दिली. तालुका तंत्रज्ञान समन्वयक नागेश उगलमुगले
यांनी यावेळी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या औजार बँक
आणि गोदाम योजना तसंच आत्मा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन
केलं.
****
मध्य रेल्वेकडून
आषाढी वारीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, यामध्ये लातूर - पंढरपूर रेल्वे
गाडीचा समावेश आहे. ही गाडी पाच, सहा, आठ, ११, १२ आणि १३ जुलै रोजी लातूर रेल्वे स्थानकावरून
सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पंढरपूरला
पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी याच दिवशी पंढरपूर इथून दुपारी दोन वाजून ३२ मिनिटांनी
सुटेल आणि लातूरला त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
****
किरगिस्तानच्या
विश्केक इथं सुरू असलेल्या तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ८६ किलो फ्रीस्टाईल
वजनी गटात, टोकियो ऑलिम्पिक विजेत्या दीपक पुनिया यानं मकसात सॅटीबाल्डी याला मात देत
कास्य पदक पटकावलं आहे. भारताने या स्पर्धेत दहा सुवर्ण पदकांसह २५ पदकं मिळवली आहेत.
****
No comments:
Post a Comment