Wednesday, 29 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.06.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राज्य सरकारनं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचा बंडखोर गट उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार आहे. त्यात सर्व आमदार सहभागी होतील, अशी माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. गुवाहाटी इथं आज कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यावर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

****

राज्यपालांच्या या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कायद्याचं पालन झालं तर आमचा नक्की विजय होईल, असं ते म्हणाले. बंडखोर आमदार आमचे निकटचे सहकारी आहेत, त्यामुळे त्यांनी अजुनही आमच्यासोबत परत यावं, असं आवाहन त्यांनी केलं. विधान परिषदेतल्या १२ आमदारांची फाईल प्रलंबित आहे, मात्र अविश्वास दर्शक ठरावाच्या मागणीवर लगेच निर्णय घेतला जातो, असं राऊत म्हणाले.

****

गेल्या काही आठवड्यात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता, केंद्र सरकारनं सर्व राज्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल रुग्णसंख्या जास्त असलेल्या १४ राज्यांमधल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. ज्या राज्यांमधे रुग्णसंख्या वाढत आहे, त्यांनी स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवावं असं त्यांनी सांगितलं.

****

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या प्रीमियर इंटरमिडीएट्स या केमिकल कंपनीत काल मध्यरात्री स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या लागलेल्या आगी दरम्यान कंपनीत अनेक स्फोट झाले. आठ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नाही.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत निमगुळ इथं पिकांवर फवारणी केल्या जाणाऱ्या नॅनो लिक्विड युरियाची माहिती देण्यात आली.

****

No comments: