Monday, 27 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

शिवसेनेतल्या ३८ बंडखोर आमदारांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटानं १६ आमदारांविरुद्ध अपात्रतेची कारवाई आणि गटनेता बदल या दोन्ही निर्णयाविरोधात, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्या याचिकेत पाठिंबा काढल्याचं नमूद केलं असल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी, तसंच महाविकास आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग सुरू असल्याचा दावा आमदारांनी या याचिकेत केला आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

****

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ठाणे इथं शिवसेना किसननगर शाखेच्या वतीनं माजी नगरसेवक तसंच एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी समर्थकांना उपस्थित राहण्याची हाक दिली होती. शिंदे समर्थक येण्यापूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला. यावेळी, टेंभीनाक्याकडून तलावपाळीकडे जाणारा रस्ता बंद केल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बहुतांश नागरिकांना पायी जावं लागत होतं. पोलीस बंदोबस्त पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला गर्दी केली होती. यावेळी, दंगल नियंत्रण पथकासह ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी या परिसराचा ताबा घेतला होता.

****

राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसंदर्भात विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. येत्या १८ जुलैला ही निवडणूक होणार असून, २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

****

जी-7 देशांच्या नेत्यांसोबत उर्जा, अन्न सुरक्षितता, दहशतवाद या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चर्चा करणार आहेत. विकसनशील देशांना हवामान बदलाचा सामना करण्यास मदतीसाठी जी-7 देशांद्वारे ६०० बिलियन डॉलर्सच्या पायाभूत सुविधा उपक्रमाचा प्रारंभ यावेळी होणार आहे.

दरम्यान, जी-7 परिषदेसाठी पंतप्रधान काल म्युनिक इथं पोहोचले. तीथे त्यांचं जर्मनीस्थित भारतीयांनी स्वागत केलं. यावेळी स्वागतासाठी जमलेल्या लहानमोठ्या भारतीयांशी त्यांनी संवाद साधला.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दोन लाख ४९ हजार ६४६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ११ लाख ९१ हजार ३२९ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १७ हजार ७३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १५ हजार २०८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ९४ हजार ४२० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा - नेटच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा आठ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत घेतल्या जाणार असल्याचं युजीसीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

कृषी संजीवनी मोहीमेअंतर्गत काल नांदेड तालुक्यात कासारखेडा इथं राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते, बी बी एफ यंत्र, बैलजोडी आणि तिफण या औजारांची पूजा करून, सोयाबीन पेरणीचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी आयुक्त धीरजकुमार यांनी, शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून रुंद वरंबा सरी किंवा टोकण पद्धतीनं सोयाबीनची पेरणी करावी, त्यामुळे बी, बियाणे, खतं आणि निविष्ठा यामध्ये बचत होत असल्याचं सांगितलं.

****

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं, यंदा पंढरपूरच्या वारीत महिला संतांची माहिती सांगणारे दोन चित्ररथ सहभागी झाले आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. या चित्ररथावरील रंगमंचावर दररोज नाटिका, अभंग, गवळणी, लोककला आणि इतर सादरीकरणांच्या माध्यमातून, महिला संतांचा जागर प्रथमच वारीमध्ये पहावयास मिळत आहे. त्या माध्यमातून राज्यातल्या महिला संतांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं देशमुख म्हणाले.

****

हवामान

येत्या दोन दिवसात कोकणात तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, उत्तर मध्य महाराष्ट्रात तसंच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वीजांसह जोराचे वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आकाशातून पडणाऱ्या वीजेची पूर्वसूचना मिळून वेळीच सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी दामिनी या मोबाईल ऍपचा वापर करावा, झाडाखाली आश्रयाला थांबू नये असं आवाहन विभागानं केलं आहे.

****

No comments: