Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 June 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जून २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, अपात्रतेची
नोटीस बजावलेल्या १६ बंडखोर आमदारांना, उत्तर देण्यासाठी, ११ जुलैपर्यंत मुदत
· भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचं बंडखोर गटाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना खुल्या पत्राद्वारे आवाहन
· बंडखोर पाच मंत्री आणि चार राज्यमंत्र्यांची खाती काढण्याचा मुख्यमंत्र्यांचा
निर्णय
· खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स
· राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज
दाखल
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३६९ रुग्ण, मराठवाड्यात १७ बाधित, औरंगाबाद
जिल्ह्यात एकाचा मृत्यू
आणि
· प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावरच्या बंदीविरोधातली याचिका, मुंबई उच्च
न्यायालयानं फेटाळली
****
सविस्तर बातम्या
शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला
आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावलेल्या १६ बंडखोर
आमदारांना, या नोटीसला उत्तर देण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयानं ११ जुलैपर्यंत मुदत
दिली आहे. १२ जुलैपर्यंत या आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही. झिरवाळ यांनी
या आमदारांना दिलेली मुदत काल संपणार होती. दरम्यान, झिरवाळ यांच्याविरोधात दाखल अविश्वास
प्रस्तावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावत, पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र
सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
१६ आमदारांना अपात्रतेची नोटीस, तसंच गटनेता आणि प्रतोद नियुक्तीला आव्हान देणाऱ्या
याचिका, बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत, त्यासंदर्भात
काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नवनियुक्त गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू
यांनाही नोटीस बजावत, पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत बहुमत गमावल्याचा दावाही, एकनाथ शिंदे यांनी
या याचिकेत केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५५ पैकी,
आपल्या गटात असलेल्या ३८ आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचं, शिंदे यांनी
या याचिकेत स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात आपली घरं आणि इतर मालमत्तांचं नुकसान करण्याची
धमकी मिळत असल्याचंही, त्यांनी या याचिकेतून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.
त्यावर हे सर्व आमदार, त्यांचे कुटुंबीय आणि मालमत्ता यांची हानी होणार नाही
याची काळजी घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्या आहेत. या प्रकरणी
पुढची सुनावणी ११ जुलै ला होणार आहे.
****
दरम्यान, बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना एक खुलं पत्र लिहून, भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याचं आवाहन
केलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नाराज आमदारांमध्ये
दुरावा निर्माण केल्याचा आरोपही, केसरकर यांनी केला. ही पक्षाविरोधात बंडखोरी नसून,
स्वाभिमानाची लढाई असल्याचं, त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्य सरकारमधले सध्या अनुपस्थित असलेले पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील
खाती इतर मंत्र्यांना सोपवण्याचा निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
त्यामुळे आता सर्व बंडखोर मंत्री बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडची
नगर विकास, सार्वजनिक बांधकाम तसंच सार्वजनिक उपक्रम खाती, सुभाष देसाई यांच्याकडे,
गुलाबराव पाटील यांच्याकडचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग अनिल परब यांच्याकडे, दादाजी
भुसे यांच्याकडचं कृषी आणि माजी सैनिक कल्याण खातं तसंच संदिपान भुमरे यांच्याकडील
रोजगार हमी, फलोत्पादन खातं शंकरराव गडाख यांच्याकडे, तर उदय सामंत यांच्याकडील उच्च
आणि तंत्र शिक्षण खातं आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
राज्यमंत्री शंभूराज देसाई, राजेंद्र पाटील यड्रावकर, अब्दुल सत्तार आणि बच्चू
कडू या चार मंत्र्यांकडील खाती, संजय बनसोडे, विश्वजित कदम, प्राजक्त तनपूरे, सतेज
पाटील, आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, यांच्याकडे विभागून देण्यात आली आहेत.
****
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयनं समन्स बजावलं
आहे. राऊत यांना आज मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबईतल्या
एक हजार ३९ कोटी रूपयांच्या कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले प्रविण राऊत
यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे हे समन्स बजावण्यात आलं.
****
राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी काल उमेदवारी अर्ज
दाखल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह
विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. येत्या १८ जुलैला ही निवडणूक होणार असून,
२१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
****
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणी संदर्भातल्या शैक्षणिक आणि
प्रशासकीय बाबींवर कार्यवाही करण्यासाठी, राज्य शासनानं शालेय शिक्षण आयुक्तांच्या
अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात
आल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल सांगितलं. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील
अंतिम करण्यात आलेली २९७ कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी, आणि कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी,
ही समिती स्थापन करण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, यंदाचं शैक्षणिक वर्ष हे ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरं करण्यात येणार
असल्याचं, वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. या उपक्रमाअंतर्गत शाळाबाह्य मुलांना शाळेत
दाखल करणं, सर्व विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणं, राज्यस्तरावरून शैक्षणिक
उपक्रमांचं नियोजन करून अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणं, शासकीय शाळेतून यशस्वी झालेल्या
विद्यार्थ्यांचा जिल्ह्याचे ‘शिक्षण दूत’ म्हणून गौरव करणं, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना
कोविड संसर्ग झाला आहे. आपली प्रकृती उत्तम असून, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी
घ्यावी, आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन या दोन्ही
मंत्र्यांनी केलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३६९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ६५ हजार ३५ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४७ हजार ९१० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल एक हजार
४०२ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९१ हजार ५५५ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
२५ हजार ५७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात नऊ, लातूर चार, बीड तीन,
तर नांदेड जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
****
प्लास्टर ऑफ पॅरिस -पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर, हरित लवाद
तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बंदीविरोधात दाखल याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं
काल फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयानेही हरित लवादाचा निर्णय योग्य ठरवलेला आहे,
त्यामुळे आपण हे प्रकरण नव्याने ऐकू शकत नाही, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं २०१० मध्ये पीओपीचा वापर न करण्याबाबत मार्गदर्शक
तत्त्वं जाहीर केली होती. २०२० मध्ये सुधारित मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करत गणेशोत्सव
आणि नवरात्रोत्सवात पीओपीच्या मूर्ती बनवण्यावर आणि त्या वापरण्यावर बंदी घालण्यात
आली आहे.
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात
११ ते १७ ऑगस्ट पर्यंत, “हर घर झेंडा” हा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भात
काल झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी
आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर, आणि नागरिकांनी
स्वत:च्या घरावर, स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याचे निर्देश देण्यात
आले आहेत. या उपक्रमासाठी लवकरच स्वतंत्र ॲप विकसित करण्यात येणार असल्याचं इटनकर यांनी
सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात भूम इथं काल शिवसेनेचे परंडा मतदार संघाचे बंडखोर आमदार
तानाजीराव सावंत यांना समर्थन देण्यासाठी, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी
करत पदयात्रा काढली. भूमचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे मित्र परिवाराच्या वतीनं शक्तीप्रदर्शन
करण्यात आलं. यामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी कृषि
सभापती दत्ता साळुंके, अण्णासाहेब देशमुख यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते.
****
औरंगाबाद इथं काल बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्या विरोधात
शिवसेनेनं निषेध मेळावा घेतला.
वैजापूर इथं काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी सरकारने
विकासासाठी दिलेला निधी आकडेवारीसह मांडून बंडखोर आमदारांचा दावा खोडून काढत, शिवसेनेशी
एकनिष्ठ राहण्याचा संकल्प करण्याचं आवाहन, आमदार अंबादास दानवे यांनी केलं. औरंगाबाद
इथं कालही बंडखोर आमदारांविरोधात निदर्शनं करण्यात आली. शिवसैनिकांनी टीव्ही सेंटर
इथं शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे फलक फाडले तसंच त्यांच्या छायाचित्रांना जोडे मारले.
****
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे,
सातारा आणि नाशिक घाट परिसरात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं
वर्तवला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त
केली आहे.
दरम्यान, औरंगाबाद शहर परिसरातही काल दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. भोकरदन,
जालना, बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागातले नदी, नाले दुथडी
भरून वाहत आहे. नांदेड, बीड तसंच हिंगोली जिल्ह्यातही काल हलका ते मध्यम स्वरुपाचा
पाऊस झाला.
****
भारत श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-ट्वेंटी महिला क्रिकेट मालिकेतला तिसरा
आणि अंतिम सामना श्रीलंकेनं सात गडी राखून जिंकला. भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकात
१३८ धावा केल्या. श्रीलंकेच्या संघानं १७ षटकांत ३ गडी बाद करत १४१ धावा केल्या. काल
झालेल्या या तिसऱ्या सामन्यापूर्वीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं ही मालिका २-१ अशी
जिंकली आहे. या दौऱ्यातल्या पुढील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला १ जुलै पासून
सुरूवात होणार आहे.
****
बीड जिल्ह्यात वडवणी, धारूर, माजलगाव, बीड, परळी, अंबाजोगाई तालुक्यात शिवसैनिकांनी
बंडखोर आमदारांचा निषेध करत आंदोलन केलं. शिवसैनिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात
काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती
लगेच नियंत्रणात आणली.
****
औरंगाबाद इथल्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम करणार्या जीव्हीपीआर कंपनीला
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं नोटीस बजावली आहे. या कंपनीला कामाच्या दिरंगाईबद्दल
दररोज एक लाख २० हजार रुपये दंडही आकारला जात आहे. योजनेच्या कामाची गती वाढवा अन्यथा
निविदेतल्या अटी शर्थीनुसार कारवाई करण्याचा इशारा या कंपनीला देण्यात आला आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज या दोघांनी सत्तेचा
उपयोग समाजहितासाठी केला असल्याचं मत, प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केलं
आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं, शिवशाहूंचा वारसा, या विषयावर व्याख्यान
देतांना ते काल बोलत होते. राजर्षी शाहू महाराजांनी जात, धर्म, संप्रदायाच्या पलीकडे
जाऊन गुणवत्तेला महत्त्व देत बहुजन समाजाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणलं. प्रचलित असणारी
राज्यसत्ता अभिजन केंद्री होती, मात्र, शिवशाहूंनी सत्तेचं विकेंद्रीकरण करत बहुजनीकरण
केलं असल्याचं, भालेराव यावेळी म्हणाले.
****
नांदेड-परळी दरम्यान धावणारी पूर्णा-परळी-पूर्णा ही विशेष रेल्वे तीन जुलैपासून
पुन्हा प्रवाशांच्या सेवेत सुरु होत असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयाकडून कळवण्यात
आलं आहे. ही विशेष रेल्वे पूर्णा इथून दुपारी सव्वा चार वाजता सुटणार असून, परभणी मार्गे
परळी इथं सायंकाळी पावणे सात वाजता पोहोचेल. तसंच परळी इथून रात्री पावणे नऊ वाजता
निघून, परभणी मार्गे पूर्णां इथं रात्री अकरा वाजता पोहोचेल, अशी माहिती, दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment