Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 June 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ जून
२०२२ दुपारी १.०० वा.
****
राज्य
सरकारनं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले
आहेत. यासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधीमंडळ सविचालयाला पत्र लिहिलं
आहे.
उद्या
सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं आणि बहुमत चाचणीची प्रक्रिया
संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं
आहे. काही नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य पाहता विधानभवनात आणि विधानभवनाबाहेर
कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, जेणेकरून बहुमत चाचणीची प्रक्रिया सुरळीत
पार पडेल, सभागृहाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, आमदारांना त्यांच्या
जागेवर उभं राहून शिरगणतीद्वारे मतदानाची प्रक्रिया पार पाडावी, कोणत्याही
कारणास्तव बहुमत चाचणीची प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही, बहुमत चाचणीच्या
प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावं आणि त्याचा अहवाल आपल्याकडे
सोपवण्यात यावा, अशा सूचना राज्यपालांनी दिल्या आहेत.
****
बंडखोर
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना विश्वासदर्शक ठरावासाठी
अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य असल्याचं सांगत शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव
घेतली आहे. पक्षाचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या
याचिकेवर संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी घेतली जाणार आहे.
कायद्याचं
पालन झालं तर आमचा नक्की विजय होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
विधान परिषदेतल्या १२ आमदारांची फाईल प्रलंबित आहे, मात्र अविश्वास दर्शक
ठरावाच्या मागणीवर लगेच निर्णय घेतला जातो, असा आरोप राऊत यांनी केला.
****
दरम्यान,
शिवसेनेचा बंडखोर गट उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार आहे. त्यात सर्व आमदार
सहभागी होतील, अशी माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली. सगळ्या आमदारांनी
आज गुवाहाटी मध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते गोव्याला जाणार असून,
उद्या सकाळी सगळे आमदार मुंबईत दाखल होणार आहेत.
****
वार्षिक
अमरनाथ यात्रा उद्यापासून सुरु होत असून, त्यासाठी काश्मीर खोऱ्यात सर्व व्यवस्था
करण्यात आली आहे. श्रीनगरच्या उपायुक्तांनी पंथ चौकातल्या यात्रेकरुंसाठीच्या
छावणीला काल भेट देऊन तिथल्या तयारीचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी आरोग्य
शिबीर, दळणवळणाची साधनं, पाण्याचं व्यवस्थापन, स्थानिकांची दुकानं आदींचीही तपासणी
केली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात
सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम
उद्योगां’ची कामगिरी आणि गती, निर्यातदारांची क्षमता वाढवणाऱ्या तसंच पंतप्रधान
रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या योजनांचा शुभारंभ करणार आहेत. उद्यमी भारत हे
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या सरकारच्या
वचनबद्धतेचं प्रतीक आहे.
****
इयत्ता
११वीच्या प्रवेशावेळी शाळेतल्या भौतिक सुविधा आणि इतर संबंधित बाबींची पडताळणी
करण्यात येईल, त्यानंतर प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश क्षमता निश्चित
करून देणार असल्याचं, औरंगाबादचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांनी सांगितलं आहे.
ते काल औरंगाबाद इथं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं घेण्यात आलेल्या,
मुख्याध्यापक सहविचार सभेत बोलत होते. अशी प्रवेश क्षमता निश्चित झाल्याशिवाय
कनिष्ठ महाविद्यालयांना, ११वी प्रवेश प्रक्रिया राबवता येणार नसल्याचं, त्यांनी
स्पष्ट केलं.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या मार्च - एप्रिल मध्ये
झालेल्या परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचं
वाटप माध्यमिक शाळांना येत्या चार जुलै रोजी मंडळाकडून केलं जाणार आहेत. शाळांनी
त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटप करायचं आहे.
****
नांदेड
जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत १६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२२
साठी अंतिम प्रभाग रचनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर
करण्यात आले होते. या प्रस्तावास विभागीय आायुक्तांकडून यांच्याकडून मान्यता
मिळाली आहे. त्यासंदर्भातल्या अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हा तसंच तालुका
मुख्यालयी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन
जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केलं आहे.
****
पालघर
जिल्ह्यातल्या बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या प्रीमियर इंटरमिडीएट्स या
केमिकल कंपनीत काल मध्यरात्री स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या लागलेल्या आगी दरम्यान
कंपनीत अनेक स्फोट झाले. आठ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या
जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत कोणत्याही प्रकारच्या
जीवितहानीचं वृत्त नाही.
****
No comments:
Post a Comment