Tuesday, 28 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.06.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारताचं आपल्या हवामान वचनबद्धतेचं समर्पण देशाच्या कामगिरीवरून दिसून येतं, असं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जर्मनीतल्या श्लोस एलमाऊ इथं आयोजित जी-7 शिखर परिषदेत ते काल बोलत होते. ऊर्जा मिळणं हा केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा आणि एका गरीब कुटुंबाचा ऊर्जेवर समान हक्क असायला हवा, यावरही त्यांनी भर दिला. हरित वाढ, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत जीवनशैली आणि जागतिक आरोग्यासाठी भारताच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचा सर्वांगीण विकास, आणि स्वावलंबनाची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी, स्थानिक समुदायांना उदरनिर्वाहासाठी या उद्योगांच्या माध्यमातून संधी उपलब्ध करुन दिली जात असल्याचं सांगितलं.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी महसूल सेवेतले वरिष्ठ अधिकारी नितीन गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. नितीन गुप्ता १९८६ च्या तुकडीतले अधिकारी असून, ते सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य आहेत. 

****

अग्निपथ योजनेला देशभरातून तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत वायुसेनेसाठी आतापर्यंत एक लाख ११ हजारांहून जास्त अर्ज प्राप्त झाले असल्याचं वृत्त आहे.

****

राज्यातल्या विविध १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू-व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.  

****

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथल्या एकाच कुटुंबातल्या नऊ जणांची आत्महत्या, ही गुप्तधनासाठी झालेली हत्या असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सोलापूर इथल्या धीरज सुरवसे आणि अब्बास मोहम्मद अली बागवान या दोन मांत्रिकांना अटक करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलं.

****

No comments: