Thursday, 30 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जून २०२ दुपारी १.०० वा.

****

भारताची निर्यात सतत वाढवण्यासाठी आणि भारताची उत्पादनं नवीन बाजारपेठेत पोहोचण्यासाठी, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र मजबूत असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास एक तृतीयांश वाटा या क्षेत्राचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.

सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती, निर्यातदारांची क्षमता वाढवणाऱ्या तसंच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या योजनांचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. उद्यमी भारत हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.

****

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज मुंबईत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी, पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.

****

नवीन सरकार आणि मंत्रिपदाच्या याद्या याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या चुकीच्या असून, यावर विश्वास ठेवू नका, असं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी ट्वीट संदेशात नमूद केलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातली विकास कामं यालाच आमचं प्राधान्य असल्याचं शिंदे म्हणाले.

****

महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातल्या नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला असल्याचं चव्हाण यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सिंगापूरचे तीन उपग्रह पी एस एल वी - सी 53 वाहनाद्वारे अवकाशात पाठवण्यासाठी सज्ज आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ही मोहिम मार्गस्थ होईल. या मोहिमेची उलटगणना व्यवस्थित सुरू आहे. भारताच्या दोन खासगी अंतराळ स्टार्ट-अप्सचे सहा लघु-उपग्रह देखील याच मोहिमेतून अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख १७ हजार २१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ६१ लाख ९१ हजार ५५४ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १८ हजार ८१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १३ हजार ८२७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद इथं आगमन झालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा आज उस्मानाबाद इथं मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.

****

नांदेड-पुणे ही जलदगती रेल्वे गाडी येत्या चार जुलैपासून दररोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे.

****

कझाकिस्तानमध्ये सुरु झालेल्या एल्डोरा करंडक मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू सिम्रनजीत कौर आणि अनंत चोपडे यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अनंतनं ५४ किलो वजनी गटात मंगोलियाच्या खेळाडूचा तीन - दोन असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कझाकस्तानच्या खेळाडूसोबत होणार आहे. या स्पर्धेत ३३ भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी झाला आहे.

****

No comments: