Sunday, 26 June 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.06.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 June 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात अंतराळ क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप्सची संख्या सध्या शंभराहून जास्त झाली असून हे सर्व स्टार्ट-अप्स नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून देशवासियांधी संवाद साधताना आज ते बोलत होते. चेन्नई आणि हैद्राबादचे दोन स्टार्ट- अप्स अग्निकुल आणि स्काय रुटचं उदाहरण पंतप्रधानांनी यावेळी दिलं. जवळपास साडेसातशे शालेय विद्यार्थी, अमृत महोत्सवामध्ये ७५ उपग्रहांवर काम करत आहेत, यातील बहुतांश विद्यार्थी लहान-लहान शहरांतले असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

 ज्या खेळाचा जन्म आपल्याच देशामध्ये झाला, त्या बुद्धीबळाच्या ऑलिंपियाड चं आयोजन २८ जुलैपासून भारतात करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा जगतात भारतीय क्रीडापटूंचा दबदबा वाढत असून भारतीय क्रीडा प्रकारांनाही नवीन ओळख मिळत आहे असं ते म्हणाले. युवा क्रीडापटूंनी या वर्षात मिळवलेल्या पदकांचा आणि त्यांच्या दैदीप्यमान कामगिरीचा उल्लेख करुन प्रत्येक क्रीडापटूचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी कौतुक केलं. भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा, दक्षिण भारतातली भगवान अय्यप्पा यांची शाबरीमाला यात्रा आणि महाराष्ट्रातली वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वारी या अध्यात्मिक पदयात्रांचाही मोदी यांनी उल्लेख करत या उत्सवांबद्दल नागरिकांना शुभेच्छा दिल्या. आपण कोविड प्रतिबंधात्मक २०० कोटी मात्रा देण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो आहोत. देशात सावधगिरीची मात्रा देण्याचं काम देखील वेगात सुरु आहे. पात्र नागरिकांनी ही तिसरी मात्रा अवश्य घ्यावी आणि त्याचबरोबर, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजूबाजूला पसरलेल्या घाणीमुळे जे रोग होऊ शकतात त्यापासून देखील सावध रहावं असं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १२ लाख ७२ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या सुमारे ११ हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सुमारे ११ हजार रुग्ण बरे झाले. देशात सध्या सुमारे ९२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि कोविडमुक्तीचा दर ९८ पूर्णांक ५८ शतांश टक्के झाला आहे.

****

सोलापूर इथले शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी मनिष काळजे यांना पदावरून काढण्यात आलं असून आता बालाजी चौगुले यांच्याकडे सोलापूर शहर, अक्कलकोट आणि सोलापूर दक्षिणचा पदभार देण्यात आला आहे.

****

विश्वविद्यालय अनुदान आयोग-यु जी सी नं राष्ट्रीय पात्रता परीक्षा नेट च्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर २०२१ची परीक्षा ८, ९, ११, १२ जुलै ला तर जून २०२२ सत्राची परीक्षा १२, १३ आणि १४ ऑगस्टला होईल.

****

२६ जून हा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जयंती दिवस राज्यात सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर इथं सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं समता रॅली काढण्यात आली. औरंगाबादमध्ये शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यवतमाळमध्ये जिल्हा प्रशासनानं धावण्याची स्पर्धा घेतली.

****

पुरेशा प्रमाणात वीज मीटर उपलब्ध असल्यानं ग्राहकांनी बाजारातून वीज मीटर खरेदी करु नयेत असं आवाहन महावितरणनं केलं आहे. वीजमीटरचा तुटवडा आहे असा संभ्रम वीजग्राहकांमध्ये निर्माण केला जात आहे. वीज ग्राहकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. नवीन वीज जोडणी तसंच नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणचे संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधण्याचं आवाहनही महावितरण कार्यालयानं केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात काल कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. खरीप हंगाम २०२२ यशस्वी करण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ, कृषि मित्र शेतकऱ्यांना बांधावर जावून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

****

No comments: