Wednesday, 29 June 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.06.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 June 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      ाज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्याची भारतीय जनता पक्षाची राज्यपालांकडे मागणी

·      गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना पक्षात पुन्हा परत येण्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन

·      १४ दिवसांची मुदत नाकारत एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे सक्तवसुली संचालनालयाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना आदेश

·      औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा होण्याची शक्यता

·      पोलिसांची सात हजार २३१ रिक्त पदं भरण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

·      मुंबईत इमारत दुर्घटनेत जणांचा तर हेलिकॉप्टर दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे तीन हजार ४८२ रुग्ण, मराठवाड्यात ५८ बाधित

आणि

·      लेबल केलेलं दही, लस्सी, पफ केलेला तांदूळ आणि गव्हाच्या पीठावर पाच टक्के कर आकारण्यास वस्तु आणि सेवा कर परिषदेची मंजुरी  

****


सविस्तर बातम्या

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्यानं सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षानं राज्यपाल भततसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन रात्री मुंबईत परतले. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं रात्री राज्यपालांची भेट घेऊन या मागणीचं पत्र दिलं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकारमध्ये राहण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले,

Byte

शिवसेनेचे ३९ आमदार हे बाहेर आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्हाला राहायचं नाही असा पवित्रा त्यंनी घेतलेला आहे. अशा या सगळ्या परीस्थिती मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत शिल्लक राहीलेलं नाही त्यामुळे त्यांना बहुमत  सिध्द करायला सांगावं, अशा प्रकारची विनंती करणारं पत्र हे आज आम्ही राज्यपालांना दीलं आहे. आता त्या संर्दभात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विविध निर्णय जे आहेत त्या निर्णयाचा काही उल्लेख आम्ही केलेला आहे. आणि त्याचा आधारावर माननीय राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि मेजोरेटी सिद्ध करण्याकरता येग्य तो  निर्णय देतील अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा आहे.

.भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व आमदारांना पुढील दोन दिवस मुंबईतच राहण्याचे आदेश दिले आहेत.

****

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुवाहाटी इथं गेलेल्या बंडखोर शिवसेना आमदारांना परतण्याचं आवाहन केलं आहे. एकत्र बसून यातून मार्ग काढू, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करु या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, असं सांगून पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

****

एकनाथ शिंदे गटातले २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा, शिवसेना नेते अनिल देसाई यांनी केला आहे. दरम्यान, आमच्यापैकी कुणीही मुंबईच्या संपर्कात नाही, असा दावा कोणी करत असेल तर त्यांनी त्या आमदारांची नावं सांगावीत असं आव्हान शिंदे यांनी दिलं आहे.

****

सक्तवसुली संचालनालयासमोर उपस्थित राहण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांनी मागितलेली १४ दिवसांची मुदत ईडीनं फेटाळली असून, त्यांना एक जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. राऊत यांना काल ईडी कार्यालयात हजर होण्यास सांगितलं होतं, मात्र त्यांच्या वकिलांनी ईडीसमोर काही दस्तऐवज सादर करत चौकशीसाठी मुदतवाढ मागितली होती.

****

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चा होण्याची शक्यता आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांनी, औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला. काही महत्त्वाच्या विषयावर आज पुन्हा मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यावेळी या विषयावर चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

दरम्यान, राज्य शासनानं वर्ष २०२० ची पोलीस शिपाई संवर्गातले सात हजार २३१ रिक्त पदं भरायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. शासनानं पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून, पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतल्या उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे.

****

मुंबईत कुर्ला इथं मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या १ झाली आहे, तर १ जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकानं ही माहिती दिली. जखमींपैकी ९ जणांना उपचारानंतर घरी सोडलं.

मृतांच्या कुटूंबाला राज्य सरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली असल्याचं, नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. जखमींवर मोफत उपचार केले जातील, दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

शिवसेनेच्या बंडखोर आमदार गटाने या दुर्घटनेतल्या मृत नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या वतीनं ही मदत करण्यात येणार आहे.

रम्यान, मुंबईजवळच्या समुद्रात ओएनजीसी कंपनीच्या हेलिकॉप्टरला काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात यश आलं. ओएनजीसी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला काल अरबी समुद्रात इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. हेलिकॉप्टरच्या तरंगण्याच्या क्षमतेनुसार ते काही मिनिटं पाण्यावर तरंगत राहीलं, त्यानंतर मात्र ते समुद्रात बुडालं. तटरक्षक दल, नौदल आणि ओएनजीसीच्या जहाजांनी बचाव कार्य करत काही पाच जणांना वाचवलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ४८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ६८ हजार ५१७ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९१५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ५६६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९५ हजार १२१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रम्यान, राज्यात काल आढळलेल्या कोविड रुग्णांपैकी ९ रुग्ण बीए ५ आणि बीए ४ या व्हेरियंटचे आहेत. यामधले चौघे पालघर, तिघं रायगड तर दोन रुग्ण ठाणे इथले आहेत. राज्यात आढळलेल्या या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या आता ६३ झाली आहे.

****

मराठवाड्यात काल ५८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, लातूर १२, उस्मानाबाद दहा, नांदेड सहा, बीड तीन तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेची दोन दिवसीय बैठक काल चंदीगढ इथं सुरु झाली. या बैठकीत काही वस्तु आणि सेवांवरील कर दरांमध्ये बंदलांना मंजुरी देण्यात आली आहे. प्री पॅकेज केलेले आणि लेबल केलेले दही, लस्सी, पफ केलेला तांदूळ आणि गव्हाचं पीठ यावर पाच टक्के कर आकारण्या येणार आहे. राज्यांच्या महसुलामध्ये वाढ करण्याच्या मागणीवर आज या बैठकीत चर्चा होणार आहे.

****

येत्या पाच वर्षात राज्यात ११ हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्यासाठी अदानी उद्योग समुहाशी काल राज्य सरकारनं सामंजस्य करार केला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्र आणि हरित ऊर्जा क्षेत्रात उंच भरारी घेणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया, राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी चार ते पाच वर्षात अदानी समुह सुमारे ६० हजार कोटींची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये करणार आहे.

****

औरंगाबाद शहराच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीनं १९३ कोटी रुपये निधीचा एकत्रित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प अहवाल राज्य शासनाला निधी उपलब्धतेसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. यामध्ये ४० किलोमीटर लांबीची ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलून ती ९०० मिलीमीटर व्यासाची टाकण्यात येणार आहे. तसंच जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती, उच्च पातळीवरील संतुलन जलकुंभ, अस्तित्वातील पंप आणि त्यांची दुरुस्ती आदि कामं करण्यात येणार आहेत.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. मंदाताई देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार अमर हबीब यांना, प्राचार्य डॉ. शैलाताई लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार प्रा. डॉ. अलका सरोदे - वालचाळे यांना, तर प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पुरस्कार, प्राध्यापक देविदास खोडेवाड यांना जाहीर झाला आहे. हे पुरस्कार अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे दिवंगत संमेलनाध्यक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जातात. येत्या ऑगस्ट महिन्यात १० व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरित केले जातील.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आणि सेनेच्या बंडखोर आमदारांचा निषेध करण्यासाठी, काल जालना इथं शिवसेनेच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात मामा चौक ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसैनिक  मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक २०२२ साठी पदवीधर मतदार नोंदणी मोहीम सुरू असून, ३० जून पर्यंत नोंदणी करता येणार आहे. सध्या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परिक्षा सुरू असल्यानं मतदार नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी, विद्यापीठ विकास मंच च्या वतीनं कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्याकडे करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात शाळा व्यवस्थापनांकडून पालकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा आरोप, आम आदमी पक्षानं केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वात, काल औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत एक निवेदन देण्यात आलं. शाळांनी शालेय शुल्कात भरमसाट वाढ केली तसंच शाळेने ठरवलेल्या दुकानातूनच पुस्तकं आणि गणवेश खरेदी करण्याची जबरदस्ती शाळांकडून केली जात असल्याचं, आम आदमी पक्षानं म्हटलं आहे. अशा तक्रारींची दखल घेऊन कठोर उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

****

प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान - पीएम-कुसूम योजनेला राज्यात गती देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. ही योजना राज्यातल्या ३४ ग्रामीण जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. पीएम-कुसूम योजनेअंतर्गत सद्य:स्थितीत ५२ हजार ७५० लाभार्थी निश्चित झाले असून, यापैकी पात्र ३५ हजार ५७८ लाभार्थ्याना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेश पाठवण्यात आले आहेत.

****

 

No comments: