Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 June 2022
Time - 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२२ सायंकाळी
६.१०
****
· देशाची कोविड प्रतिबंधात्मक २०० कोटी मात्रा लसीकरणाकडे वाटचाल; पात्र नागरिकांनी
लसीची तिसरी मात्राही घ्यावी-मन की बातमधून पंतप्रधानांचं आवाहन.
· बंडखोर गट अन्य पक्षात विलीन होईपर्यंत अपात्रतेची कारवाई शक्य-शिवसेनेचा दावा.
· राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
आणि
· महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचा १२ ते १९ जुलै दरम्यान खासगीकरण विरोधी
सप्ताह.
****
देश कोविड प्रतिबंधात्मक २०० कोटी मात्रा देण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो आहे,
पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीची तिसरी मात्रा अवश्य घ्यावी, असं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या
९० व्या भागात ते आज बोलत होते. देशात अंतराळ क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप्सची संख्या
सध्या शंभराहून जास्त झाली असून हे सर्व स्टार्ट-अप्स नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करत
आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. चेन्नई आणि हैद्राबादचे दोन स्टार्ट- अप्स अग्निकुल
आणि स्काय रुटचं उदाहरण पंतप्रधानांनी यावेळी दिलं. जवळपास साडेसातशे शालेय विद्यार्थी,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये ७५ उपग्रहांवर काम करत आहेत, यातील बहुतांश विद्यार्थी
लहान-लहान शहरांतले असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
२८ जुलैपासून भारतात चेन्नईत सुरू होत असलेल्या बुद्धीबळ ऑलिंपियाडसह अनेक क्रीडा
स्पर्धांचा उल्लेख करत, क्रीडा जगतात भारतीय क्रीडापटूंचा दबदबा वाढत असून भारतीय क्रीडा
प्रकारांनाही नवीन ओळख मिळत आहे असं ते म्हणाले. युवा क्रीडापटूंनी या वर्षात मिळवलेल्या
पदकांचा आणि त्यांच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सर्वांचं कौतुक
केलं. भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा, दक्षिण भारतातली भगवान अय्यप्पा यांची शबरीमाला
यात्रा आणि महाराष्ट्रातली वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याची पंढरीची वारी या आध्यात्मिक
पदयात्रांचा ही मोदी यांनी मन की बात मध्ये उल्लेख करत या उत्सवांबद्दल नागरिकांना
शुभेच्छा दिल्या.
****
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान बदलणं आवश्यक असून ते आव्हानात्मक असलं तरी त्याकडे
संधी म्हणून पाहण्याची गरज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त
केली आहे. ते आज पुण्यात सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीनं
घेण्यात आलेल्या “चेंजिंग लँडस्केप ऑफ मीडिया अँड एंटरटेनमेंट-२०२२” या विषयावरच्या
राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. माध्यम क्षेत्रात तंत्रज्ञ म्हणून
काम करणाऱ्या तंत्रज्ञांना चांगलं मानधन मिळालं तर, या क्षेत्रात येण्यास युवकांचा
कल वाढेल असंही ते म्हणाले. माध्यम क्षेत्रात चांगला आशय निर्माण होण्याची गरज आहे,
त्यासाठी प्रेक्षकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे तसंच भारतीय संस्कृतीशी निगडीत
आशय हा समृद्धपणे जगासमोर मांडता येऊ शकतो त्यासाठी सर्जनशीलता वापरण्याची गरज आहे,
यासाठी आपण प्रथम स्वतःवर विश्वास ठेवल्यास जगाचाही त्यावर विश्वास बसेल असंही ते यावेळी
म्हणाले.
****
बंडखोर आमदारांचा गट अन्य पक्षात विलीन होईपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई
होऊ शकते, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. आज पत्रकारांशी बोलताना, शिवसेनेकडून
वकिलांनी या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या प्रकरणांचा दाखला देत, १६ आमदारांना बजावलेली
कारवाईची नोटीस वैध असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात
आलेला अविश्वास प्रस्तावाचा मेल अनोळखी आयडीवरून आल्याने, तो फेटाळून लावण्यात आला
आहे, त्यामुळे उपाध्यक्षांना अशी नोटीस बजावण्याचे पूर्ण अधिकार असल्याचं, शिवसेनेकडून
सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील सुरत मार्गे
गुवाहाटीला गेल्याचं वृत्त आमच्या ठाण्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह होत असलेल्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर
या आमदारांची निवासस्थानं तसंच कार्यालयाबाहेर केंद्र सरकारतर्फे केंद्रीय राखीव पोलीस
दल - सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शिंदे गटातील १६ आमदारांनी सुरक्षेच्या
कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपालांना पत्र लिहिलं होतं, त्यानंतर ही सुरक्षा
पुरवण्यात आली आहे.
****
एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा
प्रस्ताव ठेवला होता, असा गौप्यस्फोट युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेनं
आज पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं त्यावेळी ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करत
होते. २० मे रोजी झालेल्या बैठकीत, स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना,
तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असं विचारले होतं, मात्र या या प्रस्तावावर एकनाथ
शिंदेंनी टाळाटाळ केली होती. यानंतर आता २० जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचं आदित्य
ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन विधानसभेत माझ्यासमोर बसावं, असं
आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. कोरोना संसर्गामुळं
४ दिवसांपासून ते खासगी रुग्णालयात दाखल होते. आता आपण पूर्णपणे स्वस्थ आहोत, परंतु
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल, असं त्यांनी पत्रकाच्या
माध्यमातून कळवलं आहे. यावेळी त्यांनी सर्व डॉक्टर, परिचारिका आणि हितचिंतकांचे आभार
मानले आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. काल १२ लाख ७२ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या
१९७ कोटी ८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी आज मातोश्री निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
या जयंती निमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” आणि त्यातील सर्व उपक्रमांना
मुख्यमंत्र्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. राजर्षी शाहूंनी आपल्याला अनेक गोष्टींचा
धडा घालून दिला आहे. त्यांची उजळणी करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं, ठाकरे यावेळी
म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती शाहूंना अभिवादन करत जनतेला शुभेच्छा
दिल्या आहेत.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची
जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी झाली. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात
कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं.
****
औरंगाबाद इथं मिलकॉर्नर परिसरात असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती
पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनांसह नागरिकांनी
सकाळपासूनच गर्दी केली होती.
****
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांचं स्मृति शताब्दी
कृतज्ञता पर्व आणि जयंतीनिमित्त कौशल्य विकास जनजागृती मेळावा घेण्यात आला. छत्रपती
शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - सारथी, जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीनं घेण्यात आलेल्या या मेळाव्याचं उद्घाटन
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते झालं. आरोग्य, कृषी, विक्री आणि
विपणन या व्यवसाय क्षेत्रात गुणवत्तेला अधिक प्राधान्य अत्यावश्यक असल्याचं जिल्हाधिकारी
चव्हाण यावेळी म्हणाले.
****
बँकांच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे
१२ ते १९ जुलै या कालावधीत खासगीकरण विरोधी सप्ताह पाळला जाणार आहे. यात सभा, परिसंवाद,
पदयात्रा, जनसंवाद, लोकप्रतिनिधींना निवेदन देणं आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकार लोकसभेच्या
पावसाळी अधिवेशनात बँकिंग कंपनी दुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे, हे लक्षात
घेऊन हा विरोधी सप्ताह राबवण्यात येणार आहे.
****
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत आज रिकर्व्ह प्रकाराची
अंतिम फेरी सुरू आहे. भारताची दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि सिमरनजीत कौर यांच्या
संघाचा सामना चिनी तैपेईच्या संघाशी होत आहे. भारतीय संघानं युक्रेन, ब्रिटेन आणि तुर्कस्थानच्या
संघांचा पराभव करून या स्पर्धेतलं आपलं पदक पक्कं केलं आहे. यापूर्वी या स्पर्धेत ज्योती
सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा जोडीने मिश्र कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं.
ज्योतीने या स्पर्धेत वैयक्तिक गटात रौप्यपदकही पटकावलं आहे.
****
शिवसेनेतले बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनात
आज औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात जाहीर
सभा घेण्यात आली. या सभेला सत्तार समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
दरम्यान, औरंगाबाद शहरात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी लावलेल्या विविध
फलकावरील त्यांच्या छायाचित्रांना आज शिवसैनिकांनी काळं फासलं.
****
No comments:
Post a Comment