Monday, 27 June 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.06.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 June 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जून २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      १६ आमदारांविरुद्धची अपात्रतेची कारवाई आणि गटनेता बदल निर्णयाविरोधात, एकनाथ शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, आज सुनावणी होण्याची शक्यता

·      उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत देखील बंडखोर गटात सामील

·      एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता- युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

·      १६ बंडखोर आमदारांची निवासस्थानं तसंच कार्यालयाबाहेर केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा तैनात

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे सहा हजार ४९३ रुग्ण, मराठवाड्यात ५८ बाधित तर औरंगाबाद जिल्ह्यात एकाचा मृत्यू

आणि

·      अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करुन अहवाल राजकीय नेतृत्वासमोर ठेवण्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांचं आवाहन

 

सविस्तर बातम्या

शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटानं १६ आमदारांरुद्ध अपात्रतेची कारवाई आणि गटनेता बदल या दोन्ही निर्णयाविरोधात, सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याविरोधात दिलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या निर्णयालाही शिंदे गटानं न्यायालयात आव्हान दिल्याचं वृत्त आहे.

विधानसभा उपाध्यक्षांनी बंडखोर आमदारांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजता संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात आज होत असलेल्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

****

दरम्यान, बंडखोर आमदारांचा गट अन्य पक्षात विलीन होईपर्यंत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. बंडखोर आमदारांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन होणार असेल, तरच दोन तृतीयांश बहुमताचा आकडा असण्याचा नियम लागू होतो, असं शिवसेनेचे वकील सर्वोच्च न्यायालयातले वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी कामत यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्यासह पत्रकारांशी बोलत होते.

काल या पूर्वीच्या प्रकरणांचा दाखला देत, १६ आमदारांना बजावलेली कारवाईची नोटीस वैध असून, राज्य घटनेच्या दहाव्या अनुच्छेदाच्या परिच्छेद दोन- एक- क अंतर्गत ही कारवाई केली जात असल्याचं, कामत यांनी सांगितलं. या आमदारांनी भाजपशासित राज्यात जाणं, भाजप नेत्यांना भेटणं, राज्यातलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करणं, आणि सरकारच्या विरोधात पत्र लिहिणं, हे कायद्याचा भंग करत असल्याचं, कामत यांनी सांगितलं. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात आलेला अविश्वास प्रस्तावाचा मेल अनोळखी आयडीवरून आल्यानं, तो फेटाळून लावण्यात आला आहे, त्यामुळे उपाध्यक्षांना अशी नोटीस बजावण्याचे पूर्ण अधिकार असल्याचं, शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

****

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडे संख्याबळ आहे, तर ते सिद्ध का करत नाहीत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विचारला आहे. ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. बंडखोरांना राज्यात सत्ता परिवर्तन हवं आहे, त्यांना भाजपची साथ असण्याची शक्यता असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं. आपल्या पक्षाचा उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा आहे, बंडखोरांवर कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना दिल्याचं, त्यांनी नमूद केलं. बंडखोर आमदार राज्यात परतल्यावर त्यातले काही शिवसेनेत परतण्याचा अंदाजही पवार यांनी व्यक्त केलं.

****

राज्याचे उच्‍च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन बंडखोर गटात सामील झाले. सामंत यांनी गुवाहाटीत खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना, आज सकाळी ११ वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. आता मुंबईत राज्य मंत्रिमंडळातले शिवसेनेचे फक्त चार मंत्री आहेत. यामध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा समावेश आहे.

दरम्यान, आणखी एक दोन आमदार आपल्या गटात सहभागी होऊन, आपलं संख्याबळ अपक्ष आमदारांसह ५१ होईल, असं बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. काल खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केसरकर यांनी, पुढच्या तीन ते चार दिवसांत आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ आणि त्यानंतर थेट महाराष्ट्रात परतणार असल्याचं म्हटलं आहे.

****

एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला होता, असा गौप्यस्फोट युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेनं काल पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केलं, त्यावेळी ते बोलत  होते. २० मे रोजी झालेल्या बैठकीत, स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असं विचारलं होतं, मात्र या प्रस्तावावर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होती. यानंतर आता २० जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर आमदारांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरं जावं, बंडखोरांना शिवसेना पुन्हा निवडून येऊ देणार नाही, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे.

****

शिवसेनेतल्या बंडखोरांच्या गटानं अजूनही भाजपाशी संपर्क केलेला नाही. त्यांनी संपर्क केला तर राज्यातले नेते निर्णय घेतील, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बडोद्यात बैठक झाल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिलं होतं. मात्र अशा प्रकारची बैठक झालेली नसून, फडणवीस मुंबईतच असल्याचं दानवे म्हणाले.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोना संसर्गामुळे चार दिवसांपासून राज्यपाल मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल होते. आता आपण पूर्णपणे स्वस्थ आहोत, परंतू डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल, असं त्यांनी पत्रकाच्या माध्यमातून कळवलं आहे.

दरम्यान, सर्व बंडखोर आमदारांना पुरेशी सुरक्षा पुरवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंगह कोश्यारी यांनी काल पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना दिले आहेत. कुटुंबियांची सुरक्षा अवैधरित्या काढून घेतल्याची तक्रार शिवसेनेच्या ३८, प्रहार जनशक्ती पक्षाच्या दोन आणि सात अपक्ष आमदारांनी राज्यपालांकडे केली आहे.त्यापार्श्वभूमीवर तात्काळ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिल्याचं राज्यपालांच्या पत्रात नमूद आहे.

दरम्यान, या आमदारांची निवासस्थानं तसंच कार्यालयाबाहेर केंद्र सरकारतर्फे, केंद्रीय राखीव पोलीस दल - सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. शिंदे गटातील १६ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपालांना पत्र लिहिलं होतं, त्यानंतर ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सीआरपीएफची वाय प्लस श्रेणीची ही सुरक्षा व्यवस्था आहे.

****

शिवसेनेतले बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थनात काल औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड इथं उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला सत्तार समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पैठणला मंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती.

दरम्यान, औरंगाबाद शहरात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी लावलेल्या विविध फलकावरील त्यांच्या छायाचित्रांना काल शिवसैनिकांनी काळं फासलं.

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समर्थनार्थ, नांदेड जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष नारायण कदम, तसंच अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य आणि गावकरी उतरले आहेत. यावेळी सरपंच संघटनेनं अनेक ठिकाणी कल्याणकर यांना पाठींब्याचे फलक लावले आहेत.

****

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिस शेख यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातल्या वक्फ जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत शेख यांना पदावरुन हटवण्यात यावं, असं पत्र अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, राज्याच्या मुख्य अपर सचिवांना पाठवलं होतं. त्यामुळे अनिस शेख यांनी पदावरुन हटवण्याआधीच राजीनामा दिला आहे.

 ****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे सहा हजार ४९३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ६२ हजार ६६६ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९०५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल सहा हजार २१३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ९० हजार १५३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २४ हजार ६०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ५८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

लातूर जिल्ह्यात २५ नव्या रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद १६, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी पाच, नांदेड चार, तर बीड जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले.

****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री या निवासस्थानी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यानिमित्त साजरा करण्यात येत असलेला "सामाजिक न्याय दिन" आणि त्याअंतर्गत सर्व उपक्रमांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. राजर्षी शाहूंनी आपल्याला अनेक गोष्टींचा धडा घालून दिला आहे. त्यांची उजळणी करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती शाहूंना अभिवादन करत जनतेला शुभेच्छा दिल्या.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी झाली. मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं शहरात महात्मा फुले पुतळ्यापासून छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत समता फेरी काढण्यात आली.

****

अनुसूचित जाती वर्गातल्या सर्व समाजाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करुन एक सविस्तर अहवाल राजकीय नेतृत्वासमोर ठेवावा, असं आवाहन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांनी केलं आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विवेक विचार मंचच्या वतीनं काल औरंगाबाद इथं, एकदिवसीय राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद घेण्यात आली. या परिषदेचं उद्धाटन नारायणस्वामी यांच्या हस्ते झालं. शासकीय योजना बऱ्यापैकी यशस्वी होत आहेत, मात्र त्यांच्याविषयी सखोल आणि परिपूर्ण माहिती नसल्यानं त्यांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत पोहोचत नसल्याचं, ते यावेळी म्हणाले. छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराचं यावेळी वितरण करण्यात आलं.

****

आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेली श्रीक्षेत्र पैठण इथली संत एकनाथ महाराज यांची पालखी काल बीड जिल्ह्यातल्या रायमोहा इथून मार्गस्थ झाली. आतापर्यंत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसचं विसाव्याच्या ठिकाणी गावोगावी भव्यदिव्य नाथांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं. मुक्कामात भजन, कीर्तन, नामस्मरण यासारखे कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते.

****

औरंगाबाद इथं मिलकॉर्नर परिसरात असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटनांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

****

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांचं स्मृति शताब्दी कृतज्ञता पर्व, आणि जयंतीनिमित्त, कौशल्य विकास जनजागृती मेळावा घेण्यात आला. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था - सारथी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं घेण्यात आलेल्या या मेळाव्याचं उद्घाटन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते झालं. आरोग्य, कृषी, विक्री आणि विपणन या व्यवसाय क्षेत्रात गुणवत्तेला अधिक प्राधान्य अत्यावश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****


राज्यातलं पहिलं कृषी भवन जालना इथं उभारलं जाणार आहे. या नियोजित इमारतीचं भूमिपूजन काल आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालं. कृषी भवन तसंच अन्न आणि औषध विभागाच्या या इमारतीत जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळणार आहे.

****

बँकांच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनतर्फे १२ ते १९ जुलै या कालावधीत खासगीकरण विरोधी सप्ताह पाळला जाणार आहे. यात सभा, परिसंवाद, पदयात्रा, जनसंवाद यासह लोकप्रतिनिधींना निवेदन देणं, आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. फेडरेशनचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकार लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात बँकिंग कंपनी दुरुस्ती विधेयक मांडण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन हा विरोधी सप्ताह राबवण्यात येत आहे.

****

औरंगाबाद इथं महाराष्ट्र बॅंकेच्या संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची काल सांगता झाली. सरकारी बँकांचं खासगीकरण त्वरीत थांबवावं, सहा वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया राबवावी, असे विविध ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात आले.

****

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात लासूर स्टेशनजवळ समृद्धी महामार्गावर जळगाव फाटा ते हडस पिपंळगाव फाट्यावर मोटार आणि दुचाकीच्या अपघातात एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. सुभद्राबाई बुणगे असं त्यांच नाव असून वैजापूर तालुक्यातल्या जळगावच्या त्या रहिवासी आहेत. महामार्ग अधिकृतरित्या सुरु होईपर्यंत शासनानं या महामार्गावरुन प्रवासास बंदी घातली असली तरीही वाहनांची रहदारी सुरुच आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर तालुक्यात खैरगाव मंगरूळ भागात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदीला पूर आला. कारला शिवारात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नाल्यास आलेल्या पुरात वयोवृद्ध शेतकरी चंदर जुकुंटवाड हे वाहून गेले. त्यांचा मृतदेह काही अंतरावर आढळून आला.

****

औरंगाबाद शहरातल्या हिमायत बागेतल्या जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, मान्यवरांनी आज हिमायत बाग इथं घेण्यात आलेल्या हेरिटेज वॉक दरम्यान केलं. इतिहासतज्ञ डॉ.दुलारी कुरैशी आणि रफत कुरैशी यांनी यावेळी, हिमायत बागेच्या ऐतिहासिक घटना आणि समर पॅलेस, तटबंदी वास्तू संदर्भात माहिती दिली. तर वन्यजीव रक्षक तथा पक्षी अभ्यासक किशोर पाठक यांनी ,इथल्या विविध प्रजातींच्या पक्षांसदर्भात आणि वन्यजीवांसंदर्भात माहिती दिली.

****

No comments: