आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Sunday, 31 July 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार - मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांची घोषणा.
·
मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय
राऊत यांना ईडीनं घेतलं ताब्यात.
·
शिवसेना आणि ठाकरे हे नातं तुटू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचं
प्रतिपादन.
·
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं जिंकली आणखी दोन सुवर्णपदकं.
आणि
·
आयुष उत्पादनांच्या आणि खेळण्यांच्या निर्यातीत विक्रमी वाढ.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
****
औरंगाबाद
इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर
केला. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळ
बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. औरंगाबाद
विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी आज पाऊस, अतिवृष्टी, पीकपाणी आणि विकासकामांचा
विभागीय आढावा घेतला. त्यावेळी अतिवृष्टी बाधित शेतजमिनींचे दोन ते तीन दिवसांत पंचनामे
पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं हे
राज्य शासनाचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज तातडीनं उपलब्ध करुन देण्यात
यावं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशा
सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
औरंगाबाद
शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे
औरंगाबादच्या रहिवाशांना लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा करणं शक्य होणार आहे. १०० कोटी
रुपये खर्चाच्या पडेगाव ते समृद्धी महामार्गासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याचं
शिंदे यांनी यावेळी सांगितलं. सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही
आमच्या गटात किंवा भारतीय जनता पक्षात येऊ नका, असं उपरोधिक विधान मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी यावेळी केलं.
****
मुंबईतल्या
पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीच्या
पथकानं ताब्यात घेतलं आहे. आज सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरी दाखल
होत त्यांची चौकशी सुरू केली होती. मात्र, नऊ तास चौकशी केल्यानंतर पथकानं त्यांना
ताब्यात घेतलं. संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही. केवळ चौकशीसाठीच त्यांना ईडी
कार्यालयात नेलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना
सांगितलं.
‘कोणत्याही
घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. खोटी कारवाई. खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार
नाही. मरेन पण शरण जाणार नाही,’ असं राऊत यांनी सकाळी ट्विटरद्वारे म्हटलं होतं.
दरम्यान,
या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक निदर्शनं करत असून, पोलीस
बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे.
****
संजय
राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. एकेकाळी मित्र असलेल्या पक्षाचा गळा घोटण्याचं
काम सध्या सुरू असून, हे कारस्थान उलथवून टाकण्याची आज गरज आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी
ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानीदेखील मोठी गर्दी केली होती. या शिवसैनिकांना उद्देशून
ठाकरे बोलत होते. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना हे नातं तुटू शकत नाही.
आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाही विरोधात लढत राहू, महाराष्ट्राची माती काय
असते ते अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
****
इंग्लंडमधल्या
बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आज दोन सुवर्णपदकांची
कमाई केली आहे. भारोत्तोलन या क्रीडाप्रकारात ५५ किलो वजनी गटात भारताच्या बिंदिया
राणीनं रौप्य पदक पटकावलं आहे. बिंदियानं स्नॅचमध्ये ८६, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६
किलो, असं एकूण २०२ किलोंचं वजन उचलून स्पर्धेत विक्रम नोंदवला. तर १९ वर्षीय जेरेमी
लालरिनुंगा यानं पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. या यशाबद्दल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह
अनेकांनी बिंदिया राणी आणि जेरेमी लालरिनुंगा यांचं अभिनंदन केलं आहे.
****
देशातील
आयुष उत्पादनांच्या निर्यातीत विक्रमी वाढ होत असून, या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स
उदयास येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषदेत
सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत, असं पंतप्रधानांनी
सांगितलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी
संवाद साधला. या मालिकेचा हा ९१वा भाग होता.
भारताकडे
खेळण्यांच्या निर्यातीचे पॉवर हाऊस होण्याची क्षमता आहे. आता विदेशातून भारतात येणाऱ्या
खेळण्यांची संख्या सतत कमी होत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. पूर्वी तीन हजार कोटी रुपयांहून
अधिक मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत. ही आयात सत्तर टक्क्यांनी कमी झाली आहे.
आजवर तीनशे ते चारशे कोटी रुपयांचीच खेळणी निर्यात करणाऱ्या भारतानं केवळ कोरोना काळातच
तब्बल दोन हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या खेळण्यांची निर्यात केली. हे चित्र
सुखावणारं आहे, असं ते म्हणाले. लहान-लहान उद्योजकांनी तयार केलेली खेळणी जगभरात पोहोचत
आहेत. पर्यावरण-स्नेही, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित खेळणी, अॅक्टिव्हिटी कोड्यांच्या
माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित शिकवणारी पुस्तके भारतात तयार होत आहेत, याबद्दल
त्यांनी समाधान व्यक्त केलं.
यावर्षी
ऑक्टोबरमध्ये १७ वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे यजमानपद भारत भूषविणार
आहे. ही देशातील सुकन्यांचा खेळांप्रती उत्साह वाढविणारी स्पर्धा असेल, असं ते म्हणाले.
यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचंही
त्यांनी अभिनंदन केलं.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात
देशात एकूण ३१ लाख ३६ हजार २९ नागरिकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल नव्या १९
हजार ६७३ कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १९ हजार ३३६ रुग्ण या संसर्गातून
बरे झाले. विविध राज्यांत मिळून सध्या एक लाख ४३ हजार ६७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
व्यापार-उद्योगाचे
वस्तू आणि सेवा कर जीएसटी, प्लास्टिक बंदी आणि बाजार समिती एपीएमसी कायदा हे प्रश्न
प्राधान्याने सोडवले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते
आज औरंगाबाद इथं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, मराठवाडा
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं औरंगाबाद
इथं आयोजित राज्यस्तरीय व्यापार परिषदेत बोलत होते.
चेंबरचे
अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यापार उद्योगात होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. अन्नधान्यावरील
जीएसटी रद्द करावा, एपीएमसी कायद्यात बदल करण्यात यावा आणि जोपर्यंत प्लास्टिकला पर्याय
उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्लास्टिक बंदीचा मिळण्याला स्थगिती देण्याची मागणी केली.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.
****
महसूल
विभागाचा आकृतिबंध आणि पदभरतीसंदर्भात मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं आज मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं. महसूलव्यतिरिक्त अधिकच्या कामांमुळे कर्मचाऱ्यांच्या
तणावात वाढ होत आहे. जुना आकृतिबंध आणि रिक्त पदांमुळे कामं मुदतीत पूर्ण होत नसल्यानं
नवीन आकृतिबंध मंजूर होईपर्यंत सध्या मंजूर असलेली १०० टक्के पदं तात्काळ भरण्याची
मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी सुमारे तीन हजार सहाशे हेक्टरवरच्या सोयाबीन
पिकाचं गोगलगायींनी शेंडे खाऊन नुकसान केलं आहे. गोगलागायींच्या प्रादुर्भावाचा पीक
विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे
आणि दुबार पेरणीसाठी शासनानं विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी
पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी, अंबाजोगाई या तालुक्यात
त्यांनी आज पीक पाहणी केली. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसान, तसंच पेरणीबाबतची
माहिती त्यांनी घेतली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर,
बाळासाहेब आजबे यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात
एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका २८ जिल्ह्यांतल्या ३१३ गावांना बसला
असून, ८३ तात्पुरती निवारा केंद्रं तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना
सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे ११२ नागरिकांनी आजवर जीव गमावला आहे,
तर २२३ जनावरं दगावल्याची नोंद आहे. विविध ठिकाणच्या एकूण ४४ घरांचं पूर्णत:, तर २
हजार ८६ घरांचं अंशत: नुकसान झालं आहे.
दरम्यान,
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, पूर परिस्थितीबाबत उपाययोजना
म्हणून प्रशासनानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल-एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद
दल-एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत, असं राज्य आपत्ती नियंत्रण कक्षानं
कळवलं आहे.
****
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानं आता एका लोकचळवळीचं रूप घेतलं
आहे. विविध क्षेत्रांतले, समाजाच्या प्रत्येक वर्गातले लोक
यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत हे उत्साहवर्धक आहे, अशा शब्दांत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. या मालिकेचा
हा ९१वा भाग होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, १३
ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या “हर घर तिरंगा”
या मोहिमेत देशवासीयांनी भाग घेण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. १३ ते १५ ऑगस्ट या काळात, आपल्या
घरावर तिरंगा ध्वज फडकवावा किंवा आपल्या घरात लावावा. २ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावून मोहिमेत उत्साह भरावा, असं ते म्हणाले.
राष्ट्रध्वजाचं रेखाटन करणारे पिंगली व्यंकय्या आणि क्रांतिकारक मादाम कामा यांचं स्मरण त्यांनी
यावेळी केलं. तसंच हुतात्मा उधम सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त
त्यांच्या स्मृतींना पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
स्वातंत्र्यलढ्यात भारतीय रेल्वेचं
असलेलं योगदान लोकांना कळावं, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन” या उपक्रमाबद्दलही
मोदींनी यावेळी माहिती दिली. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित
असलेली देशातली ७५ रेल्वे स्थानकं शोधून तिथे सुरेख सजावट करण्यात आली आहे. अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले
जात आहेत. नागरिकांनी या ७५ पैकी आपल्या
जवळच्या रेल्वे स्थानकाला भेट देण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. शिक्षकांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या स्थानकांवर घेऊन जावं आणि तिथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम
त्यांना समजावून सांगावा, असंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद
दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाऊस, अतिवृष्टी, पीकपाणी आणि विकासकामांचा विभागीय आढावा घेत आहेत. विभागीय
आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी राजाबाजार इथं संस्थान गणपतीचं दर्शन घेऊन औरंगाबाद दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर खंडेलवाल दिगंबर जैन
पंचायत पार्श्वनाथ मंदिरात आचार्य श्री पुलकसागर यांची भेट घेतली.
****
औरंगाबाद नामांतरासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची भेट घेऊन चर्चा केली. शहराचं
नाव बदलण्यात येऊ नये, अशा आशयाचं निवेदनही
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांना सादर केलं. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याला
आपला विरोध कायम राहील. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचंच असेल, तर नवीन शहर
स्थापन करा. त्याचं आम्ही स्वागत करू, असं खासदार इम्तियाज माध्यमांशी बोलताना म्हणाले.
****
मुंबईतल्या पत्रा चाळ
जमीन घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या घरी सक्तवसुली
संचालनालयाचं पथक दाखल झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून या पथकातले दहा अधिकारी राऊत यांची चौकशी करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या
घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे.
****
जम्मू-काश्मीरमध्ये
सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेत काल
संध्याकाळपर्यंत दोन लाख ९१ हजार ६०२ भाविकांनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं. दरम्यान,
खराब हवामान आणि पाऊस यामुळे आज सकाळी थांबवण्यात आलेली ही यात्रा काही वेळानं पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
****
मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं
औरंगाबाद इथं आयोजित राज्यस्तरीय व्यापार परिषदेला आज सकाळी सुरुवात झाली. खाद्य पदार्थांवर
पाच टक्के वस्तू आणि सेवा कर-जीएसटी लावल्याच्या विरोधात, तसंच प्लास्टिक बंदीला मुदतवाढ देण्यात यावी
आणि एपीएमसी कायदा रद्द करण्यात यावा, तसंच औरंगाबाद महानगरपालिकेनं लावलेलं आस्थापना
शुल्क स्थगित करावं, आदी विषयांसदर्भात
या परिषदेत विचार मंथन होणार आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त उद्या एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विशेष व्याख्यान
आयोजित करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूरच्या महाविद्यालयातले प्राध्यापक राजेश्वर
दुडुकनाळे हे अण्णाभाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर व्याख्यान देतील. विद्यापीठाच्या
महात्मा फुले सभागृहात दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
****
औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाचा एकशे दोनावा
वर्धापन दिन, लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एक ते तीन ऑगस्ट दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितं, लोकमान्य टिळक यांचे चरित्रग्रंथ
आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ ठेवणार असल्याची माहिती बलवंत वाचनालयाचे
अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल यांनी दिली.
//*********//
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 31 July 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· शेतकरी आणि कामगारांसह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी
राज्यसरकार कटीबद्ध; औरंगाबाद जिल्ह्यात
महालगाव इथं साखर कारखाना भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची ग्वाही
· मुंबई आणि मराठी माणसासंदर्भातल्या विधानाबाबत राज्यपालांकडून
स्पष्टीकरण
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ८७ रुग्ण; मराठवाड्यात नवे १४५ बाधित
· शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर
यांची शिंदे गटात जाण्याची घोषणा
· हिंगोली जिल्हा परिषद शाळेच्या कोंढूर इथल्या विद्यार्थिनींना
श्रीहरिकोटा इथं उपग्रह प्रक्षेपणाला उपस्थित राहण्याची संधी
अणि
· राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात भारताला सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक
****
आता सविस्तर बातम्या
****
शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यसरकार
कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल औरंगाबाद
दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी वैजापूर तालुक्यात महालगाव येथे इथं पंचगंगा
उद्योगसमुहाच्या श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचं भूमिपूजन केलं, त्यानंतर
झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सर्व घटकांच्या हितासाठी
शासन गतिमानतेने निर्णय घेत असून, सामान्य जनतेला अपेक्षित न्याय देण्याचा प्रयत्न
राज्य सरकार करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे
तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते
काल नाशिक इथं विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. पावसाळ्यात शासकीय विभागांनी समनव्यय
साधून काम करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मालेगाव इथं २०५ पोलीस निवासस्थानं तसंच नवीन इमारतीचा लोकार्पण
सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. पोलीसांसाठी राज्यात मोठ्या
प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औरंगाबाद इथं काळे झेंडे
दाखवून स्वागत करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद
इथं बातमीदारांशी बोलत होते. राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात
आलं आहे. त्यामुळे याविरोधात काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं
खासदार जलील म्हणाले. राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन होवून एक महिना
उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच असणारे
मंत्रिमंडळ हे देशात कुठेच नसल्याची टीका खासदार जलील यांनी केली. शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे
नुकसान झालं आहे. त्यामुळे किमान कृषी मंत्र्यांची तरी नेमणूक करावी अशी मागणी खासदार
जलील यांनी केली.
****
मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
यासंदर्भात ट्विटरवर दिलेल्या स्पष्टीकरणात, एका समाजाचं कौतुक
हे दुसऱ्या समाजाचा अवमान ठरत नाही, मात्र आजकाल प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून
पाहण्याची पद्धत रूढ झाली आहे, ती बदलायला हवी, असं राज्यपाल
म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या
भूमीत काम करण्याची संधी मिळाली, याचा अभिमान असल्याचं कोश्यारी यांनी नमू्द केलं.
महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच, कारण नसताना
राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यपालांच्या या विधानाचा विविध मान्यवरांनी
निषेध केला आहे.
राज्यपालांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना, राज्यपालांनी या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी
मागावी, असं म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची ओळख
जगाला आहे पण विद्यमान राज्यपालांना नाही याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड इथं महात्मा
फुले पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं
काल दहन करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ८७ रुग्ण
आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४५हजार ६०६ झाली आहे. काल या संसर्गानं चार रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १०१ इतकी
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश
टक्के आहे. काल २ हजार २५९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत,
आतापर्यंत ७८ लाख ८४ हजार ४९५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड
मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार १०
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १४५
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात
१८ नवे रुग्ण आढळले. लातूर ३५, उस्मानाबाद ३३, जालना २९, तर नांदेड जिल्ह्यात ३० नव्या
रुग्णांची नोंद झाली.
****
प्रतिकूल हवामानामुळे गेले दोन दिवस स्थगित असलेली अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांनी काल
सकाळी पुन्हा सुरू झाली. एक हजार ९६ यात्रेकरूंच्या तुकडीनं काल पहाटे, पहलगाममधल्या नुनवान
बेस कॅम्प इथून, तर ५९७ यात्रेकरूंच्या
३०व्या तुकडीनं भगवती नगर यात्री निवास इथून प्रस्थान केलं.
****
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते
अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काल जालना इथं पत्रकार परिषदेत
त्यांनी ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनं, परिवारासाठी हा
निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय,
यांच्याशी माझं सविस्तर यासंदर्भामध्ये बोलणं झालं. मी काय जी माझ्यावर परिस्थिती बितते
त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखांच्या कानावर या सर्व गोष्टी टाकल्या आणि जिल्ह्यातल्या
तमाम सर्व नेत्यांशीही बोललो. माझी ही भूमिका आहे, मी सच्चा शिवसैनिक आहे, गेली ४०
वर्षाचा. आणि घरी आलं की परिवार दिसतो, त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचं आहेत असं
मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या शिवसैनिकांच्या
साक्षीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समर्थन करण्याचा निर्णय या
ठिकाणी घेतलेला आहे. काही परिस्थितीनुसार मला हा निर्णय घ्यावा लागतो म्हणून हा निर्णय
मी घेत आहे असंही मी पक्षाच्या कानावर टाकलं आणि त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे.
****
जालन्यातल्या साखर कारखान्याविरोधात
ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही, मात्र शेतकऱ्यांसाठी,
हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं
असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पूर परिस्थितीमुळं
अतोनात नुकसान झालं असून सरकारनं या शेतकऱ्यांना
७५ हजार रूपये हेक़्टरी मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी
केली आहे. पवार यांनी काल जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरूंदा, कौठा, तसंच कळमनुरी
तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची
पाहणी केली. त्यानंतर हिंगोली इथं ते पत्रकारांशी बोलत होते.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था -इस्त्रोने घेतलेल्या शालेय मुलांच्या ऑनलाइन स्पर्धेत हिंगोली
जिल्हा परिषदेच्या कळमनुरी तालुक्यातल्या कोंढूर इथल्या शाळेच्या विद्यार्थिनींनी केलेली
कोडिंग प्रोग्रामिंग जुळली. त्यामुळे या विद्यार्थिनींना ७ ते १५ ऑगस्ट दरम्यान श्रीहरिकोटा
इथं आझादी सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत
अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर
“अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नीती आयोगाकडून एक वर्षापूर्वी
ऑनलाइन लिंकद्वारे देशभरातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन
केलं होतं. यात कळमनुरी तालुक्यातील कोंढूर जि.प. शाळेनेही सहभाग घेतला.
शिक्षक शंकर लेकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली
निकिता पतंगे, अयोध्या
पतंगे, ऐश्वर्या पतंगे, समृद्धी देशमुख, गायत्री पवार, कोमल पांचाळ, शिवकन्या पोटे,
अंजली पतंगे, संस्कृती लेकुळे, ज्ञानेश्वरी पवार या इयत्ता सातवीत असलेल्या विद्यार्थिनींचा
यात समावेश आहे.
त्यांना कोडींगसाठी पोलार किट प्राप्त झाल्या होत्या. या किटमध्ये
कोडींग प्रोग्राम इन्स्टॉल करायचा होता. हवेतील आर्द्रता, तापमान, उंची, दाब आदी बाबींविषयक
कोडींग प्रोग्राम इन्स्टॉल करून विद्यार्थिनींनी ही किट स्पर्धेसाठी पाठविली. ती जुळली
आणि या मुलांना थेट इस्त्रोतील उपग्रह प्रक्षेपणासाठी हजेरी लावण्याचे निमंत्रण आले
आहे.” रमेश कदम , पीटीसी , हिंगोली.
****
लातूर बाजार समितीचे आधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठेत
रुपांतर होणं ही काळाजी गरज असल्याचं, आमदार अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. बाजार समितीत गेल्या तीन वर्षात उत्कृष्ट कार्य केलेले उद्योजक,
व्यापारी, आडते, गुमास्ते तसंच हमाल-मापाडी यांचा काल सन्मान चिन्ह प्रदान करून सत्कार
करण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. बाजार समितीच्या स्थलांतरामुळे व्यापाऱ्यांना
चांगली जागा मिळेल तसंच लातूर शहरातली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार असल्याचं
देशमुख यांनी नमूद केलं.
****
बर्मिंगघम इथं सुरू
असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलक
मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं.
मीराबाईने स्नॅच मध्ये ८८ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११३ किलो असं एकूण २०१ किलो
वजन उचललं.
त्यापूर्वी सांगलीच्या संकेत सरगरने भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक
पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं. ५५ किलो वजनी गटात त्यानं हे पदक
मिळवलं. प्रतिकूल परिस्थितीत आणि दुखापतग्रस्त असताना सुद्धा त्याने ही चमकदार कामगिरी
केली आहे. दोन महिन्या पूर्वी हरियाणात पंचकुला इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा
स्पर्धेत संकेतची लहान बहीण काजल सरगर हिने सुद्धा भारोत्तोलन प्रकारात महाराष्ट्राला
पहिलं सुवर्णपदक जिंकून दिले होतं. संकेतच्या या कामगिरीबद्दल काजल हिने या शब्दांत
आपल्या भावना व्यक्त केल्या.
“आता इंग्लंडमध्ये
होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला पहिलं सिल्व्हर मेडल घेऊन दिलं.
पूर्ण भारतीय लोकांना यावर गर्व आहे. त्यानं केलेल्या कष्टाचं जे चीज झालं, त्याबद्दल
आम्ही सर्व आनंदी आहोत.”
संकेतच्या कामगिरीनंतर सांगलीत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष
करण्यात आला.
दरम्यान, गुरूराजा पुजारी
याने भारोत्तोलन प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात
कांस्यपदक पटकावलं आहे. पुजारी याने स्नॅचमध्ये ११८ किलो तर क्लीन ॲण्ड जर्क मध्ये
१५१ किलो, असं एकूण २६९ किलो वजन उचललं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय
क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं अभिनंदन
केलं आहे.
****
मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन,
आणि वैचारिक लेखनासाठी औरंगाबादच्या प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठानच्या वतीनं
गेल्या वर्षीपासून निर्मिक साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. २०२१ चा पुरस्कार
डॉ. दिलीप चव्हाण यांच्या समकालीन भारत :जातिअंताची दिशा या वैचारिक ग्रंथाला तर २०२२
चा पुरस्कार डॉ. सुधाकर शेलार यांच्या साहित्यसंशोधन
: वाटा आणि वळणे या संशोधनविषयक ग्रंथाला जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांच वितरण
आज सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद शहरातल्या शिवछत्रपती महाविद्यालय इथं होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एका शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून
मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला शेतमजूर गंभीर जखमी झाला. सेनगाव तालुक्यातल्या
जयपूर शिवारात काल दुपारी ही घटना घडली. नागनाथ दत्तराव पायघन असं या शेतकऱ्याचं नाव
आहे. दरम्यान, काल परभणी शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
****
नांदेड-पनवेल ही रेल्वेगाडी कोकण रेल्वेवरून मडगावपर्यंत वाढवावी,
अशी मागणी शेगाव इथल्या राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे संघटनमंत्री ओमकार माळगावकर
यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, तसंच मध्य आणि दक्षिण मध्य
रेल्वेच्या महाप्रबंधकांना पत्र पाठवलं आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या
एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात दुपारी
साडेबारा वाजता विशेष व्याख्यानाचं अयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूर महाविद्यालयातले
प्राध्यापक दुडुकनाळे राजेश्वर हे अण्णा भाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर
व्याख्यान देतील.
****
Saturday, 30 July 2022
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात सांगलीच्या
संकेत सरगरला रौप्यपदक.
·
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने
पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात
केलेल्या विधानाचा विविध मान्यवरांकडून निषेध.
आणि
·
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांची शिंदे गटात जाण्याची
घोषणा.
****
सांगलीच्या
संकेत सरगरने बर्मिंगघम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात
५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि दुखापतग्रस्त असताना
सुद्धा त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी हरियाणात पंचकुला इथं
झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत संकेतची लहान बहीण काजल सरगर हिने सुद्धा
भारोत्तोलन प्रकारात महाराष्ट्राला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. संकेतच्या या
कामगिरीबद्दल काजल हिने या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या –
आता इंग्लंडमध्ये होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला पहिलं सिल्व्हर
मेडल घेऊन दिलं. पूर्ण भारतीय लोकांना यावर गर्व आहे. त्यानं केलेल्या कष्टाचं जे चीज
झालं, त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत.
संकेतच्या
कामगिरीनंतर सांगलीत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र
मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी संकेतचं अभिनंदन केलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नाशिक इथं आढावा बैठकीत बोलत होते.
राज्य शासन जनतेप्रती संवेदनशील असल्यामुळे थेट विभागस्तरावर जावून विकास कामांचा आढावा
घेण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाळ्यात शासकीय विभागांनी
समनव्यय साधून काम करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मालेगाव
इथं २०५ पोलीस निवासस्थानं तसंच नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते आज झाला. पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात
येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान,
नाशिक इथून मुख्यमंत्री आज औरंगाबाद इथं येत आहेत. आज संध्याकाळी वैजापूर तालुक्यात
महालगाव इथं शिवसेनेची जाहीर सभा, उद्या रविवारी सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात,
अतिवृष्टी आणि पीक आढावा बैठकीनंतर, ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुपारी सिल्लोड
इथं शिवसेनेच्या सभेसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी औरंगाबाद
इथं छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रात्री उशिरा
ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
दरम्यान,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औरंगाबाद इथं काळे झेंडे दाखवून स्वागत करणार असल्याचा
इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत
होते. राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्यामुळे
याविरोधात काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं खासदार जलील म्हणाले.
राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन होवून एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा
विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच असणारे मंत्रिमंडळ हे देशात
कुठेच नसल्याची टीका खासदार जलील यांनी केली. शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं
आहे. त्यामुळे किमान कृषी मंत्र्यांची तरी नेमणूक करावी अशी मागणी खासदार जलील यांनी
केली.
****
ज्या
सामान्य जनतेनं इंग्रजांना घरी पाठवलं, तीच जनता, देशाचे मालक समजणाऱ्यांनाही घरी पाठवल्या
शिवाय राहणार नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुनर्बांधणीच्या निमित्ताने पवार
आज धुळे दौऱ्यावर आले असता, बोलत होते. सत्ताधारी लोक आपण देशाचे मालक आहोत अशा पद्धतीने
वागत आहेत हे योग्य नाही असं ते म्हणाले. सत्तेचा गैरवापर वाढतच चालला आहे. जिल्ह्यातल्या
प्रत्येक तालुक्यात जावून शेवटच्या घटका पर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत
करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात केलेल्या विधानाचा विविध मान्यवरांनी
निषेध केला आहे.
महाराष्ट्राच्या
विकासात आणि आर्थिक वाटचालीत मराठी माणसाचंच योगदान सर्वात मोठं योगदान असून, राज्यपालांच्या
या विधानाशी सहमत नसल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
ते आज दोंडाईचा इथं बोलत होते. राज्यपालांचे वक्तव्य हे तत्कालीन स्थितीवरून असल्याचं
सांगताना, राज्यपालांच्या मनात मराठी माणसाबद्दल आदर असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं
आहे.
माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी,
असं म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची ओळख जगाला
आहे पण विद्यमान राज्यपालांना नाही याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यपालांचं
हे वक्तव्य दुर्दैवी स्वरूपाचं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी केली. ते आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान,
राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड इथं महात्मा फुले पुतळ्यासमोर राष्ट्रवादी
युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
****
शिवसेनेचे
ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज जालना इथं
पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनं,
परिवारासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जालन्यातल्या साखर कारखान्याविरोधात
ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही, मात्र शेतकऱ्यांसाठी,
हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं
आहे. त्यामुळे आपण त्यांना समर्थन जाहीर करत असल्याचं खोतकर यांनी सांगितलं. आजपर्यंत
पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करत आलो असल्याचं सांगून जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचे त्यांनी
आभार मानले. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट झाल्याचं खोतकर
यांनी सांगितलं.
****
विरोधी
पक्ष नेते अजित पवार यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरूंदा, कौठा
तसंच कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानाची पाहणी केली. दुपारनंतर नांदेड जिल्ह्यातही ते नुकसानाची पाहणी करणार
असल्याचं वृत्त आहे.
****
साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परवा एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात दुपारी साडेबारा वाजता विशेष व्याख्यानाचं
अयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूर महाविद्यालयातले प्राध्यापक दुडुकनाळे
राजेश्वर हे अण्णा भाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर व्याख्यान देतील.
दरम्यान,
औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाचा एकशे दोनावा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन
आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एक ते तीन ऑगस्ट
दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते,
लोकमान्य टिळक यांचं चरित्र ग्रंथ आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ ठेवणार
असल्याची माहिती बलवंत वाचनालयाचे अध्यक्ष विपीनकुमार बाकलीवाल यांनी दिली.
****
आत्ताच
हाती आलेल्या बातमीनुसार गुरुराजा पुजारी याने भारोत्तोला प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा
स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 March 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 July 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...