Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 28 July 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय;कृषी पंपांना वीज दरात एक रुपया सवलत;पैठणच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेलाही
मान्यता
· पीएमएलए कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे २ हजार १३८ रुग्ण;मराठवाड्यात १३६ नवे बाधित
· नांदेड जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्था येत्या १५ ऑगस्टपर्यंत तंबाखू मुक्त करण्याचे
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
आणि
· तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव; भारताचा तीन शून्यने
मालिका विजय
****
सविस्तर बातम्या
राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य
मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण
रोहित्रांना देखील स्मार्ट मीटर बसवण्यात येईल. याशिवाय वीज वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी
नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र, नवीन वाहिन्या यांची कामे करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत
मान्यता देण्यात आली.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा
निर्णयही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे १४ लाख शेतकऱ्यांना याचा
लाभ मिळेल. अतिउच्चदाब तसंच उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतल्या शेतकऱ्यांना जून २०२१
पासून, एक रुपया १६ पैसे प्रति युनिट तसंच स्थिर आकारामध्ये २५ रुपये प्रति केव्हीए
इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल. लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांना एक रुपया प्रति युनिट
हा सवलतीचा दर आणि स्थिर आकारामध्ये १५ रुपये प्रति महिना सवलत जून २०२१ पासून नव्याने
देण्यात येईल. यासाठी दोन्ही अनुदानापोटी महावितरण कंपनीस ३५८ कोटी ९७ लाख रुपये अनुदान
म्हणून देण्यात येईल.
****
राज्यात राजकीय तसंच सामाजिक आंदोलनात मार्च २०२२ पर्यंत दाखल खटले मागे घेण्याची
कार्यवाही करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. कोरोना काळात विद्यार्थी
तसंच सुशिक्षित बेरोजगारांवर दाखल खटलेही मागे घेण्याच्या कार्यवाहीला मान्यता देण्यात
आली आहे .
नवीन तीन समाजकार्य महाविद्यालयांना कायम स्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर कालच्या
मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील अश्वमेध बहुउद्देशीय
शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, तसंच जालना इथल्या दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा
समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेला
राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकारांशी
बोलतांना ही माहिती दिली. ही योजनेसाठी ८९० कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, यामुळे
हजारो एकर जमीन सिंचनाखाली येईल, साठ गावातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
मराठवाड्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी
१०० कोटी रूपयाची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
यावेळी दिली. लोणार सरोवर विकासासाठी ३६० कोटी रुपये तरतूद करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत
मान्यता देण्यात आली.
राज्याच्या १५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५० जागा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने
घेतला आहे. पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी
दिले आहेत.
****
प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट - पीएमएलए अर्थात काळा पैसा वैध करण्यास
प्रतिबंध करणाऱ्या कायद्याला आव्हान देणाऱ्या सुमारे अडीचशे याचिका सर्वोच्च न्यायालयाने
फेटाळून लावल्या आहेत. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत, पीएमएलए कायद्यातल्या तरतुदी
योग्य असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. ईडीचा तपास, अटक, तसंच
जप्तीचा अधिकारही न्यायालयानं योग्य ठरवला आहे. इ सी आय आर, हा एक प्रकारचा प्राथमिक
माहिती अहवाल- एफ आय आर आहे. आरोपीला अटक करताना याची प्रत देणं आवश्यक नाही, मात्र
अटकेचं कारण सांगावं लागेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
****
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष
सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयानं कालही चौकशी केली. या चौकशी विरोधात काँग्रेस
पक्षाच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसनं ईडीच्या
विरोधात काल सत्याग्रह आंदोलन केलं. पुढील काळात रस्ता रोको आणि जेल भरो, अशी तीव्र
आंदोलनं करण्यात येतील, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी दिला.
लातूर इथं काँग्रेसच्या वतीनं गंजगोलाई परिसरात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,
कार्यकर्ते मोठया संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८ ते ५९ वयोगटाच्या नागरिकांना
कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस केंद्र सरकारतर्फे मोफत दिला जात आहे. बीड जिल्ह्यातल्या
सर्व पात्र नागरिकांनी ही मात्रा घेण्याचं आवाहन, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे
यांनी केलं आहे.
Byte Dr Suresh Sable…
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २ हजार १३८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ३९ हजार ३१९ झाली आहे. काल या संसर्गानं आठ रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार ८८ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल २ हजार
२७९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ७७ हजार २८८ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
१३ हजार ९४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १३६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
४१, औरंगाबाद ३९, लातूर २७, जालना १३, नांदेड ११, तर बीड जिल्ह्यातल्या पाच रुग्णांचा
समावेश आहे.
****
येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत नांदेड जिल्ह्यातली सगळी कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयं
तंबाखू मुक्त करावीत, असे आदेश, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले आहेत.
अशा सगळ्या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखू संकलन पेटी ठेवण्याचेही आदेश असून,
कार्यालयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ या पेटीत टाकूनच
कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना तसंच उल्लंघन झालेल्या
संस्थेच्या प्रमुखाला दंड आकारला जाणार आहे.
****
लातूर इथल्या एका ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेल्या महिलेचे अवयव दान करण्यात
आल्यानं, तीन रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला घरी चक्कर
येऊन पडल्यानं, त्यांच्या डोक्यावर आघात होऊन मेंदू मृत झाल्याचं लक्षात आल्यावर, त्यांची
दोन्ही मूत्रपिंड, यकृताचं पुण्यातल्या तीन रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात
आलं. त्यासोबतच कॉर्निया अर्थात नेत्रपटलही दान करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात "हर घर तिरंगा" हा उपक्रम
राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक आस्थापना, प्रत्येक
नागरिकाने आपल्या घरावर, आस्थापनेवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारावा,
असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे.
****
हर घर तिरंगा उपक्रमात नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात किमान पाच लाख घरांवर
तिरंगा फडकणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी दिली. यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
करण्याचे निर्देश त्यांनी काल यासंदर्भात घेतलेल्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठकीत
दिले.
****
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आजपासून बर्मिंगहॅम इथं सुरु होत आहेत. ही स्पर्धा
आठ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. चार वर्षांच्या अंतरानं होत असलेल्या या स्पर्धेचं आयोजन
इंग्लंडमधे सोळा ठिकाणी होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात बॅटमिंटनपटू पी
व्ही सिंधू ही भारतीय पथकाचं नेतृत्व करणार आहे.
****
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजचा ११९ धावांनी पराभव
करत, तीन सामन्यांची मालिका तीन शून्य अशी जिंकली आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत,
३६ षटकांत तीन बाद २२५ धावा केल्या, त्यानंतर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. पाऊस
थांबल्यावर पंचांनी डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे वेस्ट इंडीजला ३५ षटकांत २५७ धावांचं
लक्ष्य दिलं. मात्र वेस्ट इंडीजचा संघ २६ व्या षटकांतच सर्वबाद झाला. नाबाद ९८ धावा
करणारा शुभमन गिल सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्कारचा मानकरी ठरला. दरम्यान, दोन्ही
संघात उद्यापासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे.
****
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची
बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या निवडीची अधिकृत घोषणा येत्या एकतीस तारखेला केली
जाणार आहे. आगामी काळात राज्यात ऑलिंपिकच्या दर्जाचे खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीनं
प्रयत्न करणार असल्याचं तडस यांनी या निवडीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं.
****
औरंगाबादच्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सध्या ३० हजार ४३५ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणी साठा सध्या ९१ पूर्णांक ७३
शतांश टक्के ईतका असून, काल सायंकाळी धरणात
१३ हजार ४१५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती .
दरम्यान, गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे गेवराई तालुक्यातल्या पंचाळेश्वर
इथलं भगवान दत्तात्रयांचं भोजनस्थान आत्मतीर्थ तसंच राक्षसभुवन इथलं शनी मंदिर पाण्याखाली
गेलं आहे. त्यामुळे ही दोन्ही मंदिरं सध्या दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत.
****
उस्मानाबाद इथल्या व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाला, डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत, राष्ट्रीय सेवा योजनेचा सन २०१८-१९ चा सर्वोत्कृष्ट एकक
म्हणून, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.मकरंद चौधरी यांचा,
सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून, सन्मान करण्यात आला. काल औरंगाबाद इथं कुलगुरू
प्रमोद येवले, यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
****
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आजपासून तीन दिवस गणितीय विज्ञानावर
आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत सुमारे दोनशेहून अधिक संशोधन
लेखांचं सादरीकरण होणार असल्याची माहिती गणितीयशास्त्र संकुलाचे संचालक आणि परिषदेचे
संयोजक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
वतीनं नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, अर्धापूर आणि कंधार तालुक्यातल्या सगळ्या शाळांच्या
मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. यामध्ये
स्कूल बस नियमावलीची तसंच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाविषयी
माहिती देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment