Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानं आता एका लोकचळवळीचं रूप घेतलं
आहे. विविध क्षेत्रांतले, समाजाच्या प्रत्येक वर्गातले लोक
यानिमित्तानं वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत हे उत्साहवर्धक आहे, अशा शब्दांत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. या मालिकेचा
हा ९१वा भाग होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, १३
ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या “हर घर तिरंगा”
या मोहिमेत देशवासीयांनी भाग घेण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. १३ ते १५ ऑगस्ट या काळात, आपल्या
घरावर तिरंगा ध्वज फडकवावा किंवा आपल्या घरात लावावा. २ ऑगस्ट पासून ते १५ ऑगस्ट पर्यंत आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावून मोहिमेत उत्साह भरावा, असं ते म्हणाले.
राष्ट्रध्वजाचं रेखाटन करणारे पिंगली व्यंकय्या आणि क्रांतिकारक मादाम कामा यांचं स्मरण त्यांनी
यावेळी केलं. तसंच हुतात्मा उधम सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त
त्यांच्या स्मृतींना पंतप्रधानांनी अभिवादन केलं.
स्वातंत्र्यलढ्यात भारतीय रेल्वेचं
असलेलं योगदान लोकांना कळावं, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या “आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन” या उपक्रमाबद्दलही
मोदींनी यावेळी माहिती दिली. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित
असलेली देशातली ७५ रेल्वे स्थानकं शोधून तिथे सुरेख सजावट करण्यात आली आहे. अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले
जात आहेत. नागरिकांनी या ७५ पैकी आपल्या
जवळच्या रेल्वे स्थानकाला भेट देण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. शिक्षकांनी आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना या स्थानकांवर घेऊन जावं आणि तिथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम
त्यांना समजावून सांगावा, असंही ते म्हणाले.
****
औरंगाबाद
दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाऊस, अतिवृष्टी, पीकपाणी आणि विकासकामांचा विभागीय आढावा घेत आहेत. विभागीय
आयुक्त कार्यालयात सुरू असलेल्या या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी राजाबाजार इथं संस्थान गणपतीचं दर्शन घेऊन औरंगाबाद दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर खंडेलवाल दिगंबर जैन
पंचायत पार्श्वनाथ मंदिरात आचार्य श्री पुलकसागर यांची भेट घेतली.
****
औरंगाबाद नामांतरासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची भेट घेऊन चर्चा केली. शहराचं
नाव बदलण्यात येऊ नये, अशा आशयाचं निवेदनही
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांना सादर केलं. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याला
आपला विरोध कायम राहील. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचंच असेल, तर नवीन शहर
स्थापन करा. त्याचं आम्ही स्वागत करू, असं खासदार इम्तियाज माध्यमांशी बोलताना म्हणाले.
****
मुंबईतल्या पत्रा चाळ
जमीन घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतल्या घरी सक्तवसुली
संचालनालयाचं पथक दाखल झाल्याचं वृत्त आहे. आज सकाळी नऊ वाजेपासून या पथकातले दहा अधिकारी राऊत यांची चौकशी करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या
घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात
आला आहे.
****
जम्मू-काश्मीरमध्ये
सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेत काल
संध्याकाळपर्यंत दोन लाख ९१ हजार ६०२ भाविकांनी पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं. दरम्यान,
खराब हवामान आणि पाऊस यामुळे आज सकाळी थांबवण्यात आलेली ही यात्रा काही वेळानं पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
****
मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं
औरंगाबाद इथं आयोजित राज्यस्तरीय व्यापार परिषदेला आज सकाळी सुरुवात झाली. खाद्य पदार्थांवर
पाच टक्के वस्तू आणि सेवा कर-जीएसटी लावल्याच्या विरोधात, तसंच प्लास्टिक बंदीला मुदतवाढ देण्यात यावी
आणि एपीएमसी कायदा रद्द करण्यात यावा, तसंच औरंगाबाद महानगरपालिकेनं लावलेलं आस्थापना
शुल्क स्थगित करावं, आदी विषयांसदर्भात
या परिषदेत विचार मंथन होणार आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या
जयंतीनिमित्त उद्या एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विशेष व्याख्यान
आयोजित करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूरच्या महाविद्यालयातले प्राध्यापक राजेश्वर
दुडुकनाळे हे अण्णाभाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर व्याख्यान देतील. विद्यापीठाच्या
महात्मा फुले सभागृहात दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
****
औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाचा एकशे दोनावा
वर्धापन दिन, लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एक ते तीन ऑगस्ट दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितं, लोकमान्य टिळक यांचे चरित्रग्रंथ
आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ ठेवणार असल्याची माहिती बलवंत वाचनालयाचे
अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल यांनी दिली.
//*********//
No comments:
Post a Comment