Sunday, 31 July 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 July 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      शेतकरी आणि कामगारांसह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यसरकार कटीबद्ध; औरंगाबाद जिल्ह्यात महालगाव इथं साखर कारखाना भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

·      मुंबई आणि मराठी माणसासंदर्भातल्या विधानाबाबत राज्यपालांकडून स्पष्टीकरण

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ८७ रुग्ण; मराठवाड्यात नवे १४५ बाधित

·      शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांची शिंदे गटात जाण्याची घोषणा

·      हिंगोली जिल्हा परिषद शाळेच्या कोंढूर इथल्या विद्यार्थिनींना श्रीहरिकोटा इथं उपग्रह प्रक्षेपणाला उपस्थित राहण्याची संधी

अणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोल प्रकारात भारताला सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक

****

आता सविस्तर बातम्या

****

शेतकरी आणि कामगार यांच्यासह सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यसरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी वैजापूर तालुक्यात महालगाव येथे इथं पंचगंगा उद्योगसमुहाच्या श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचं भूमिपूजन केलं, त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. सर्व घटकांच्या हितासाठी शासन गतिमानतेने निर्णय घेत असून, सामान्य जनतेला अपेक्षित न्याय देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं विभागीय आढावा बैठकीत बोलत होते. पावसाळ्यात शासकीय विभागांनी समनव्यय साधून काम करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मालेगाव इथं २०५ पोलीस निवासस्थानं तसंच नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. पोलीसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औरंगाबाद इथं काळे झेंडे दाखवून स्वागत करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्यामुळे याविरोधात काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं खासदार जलील म्हणाले. राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन होवून एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच असणारे मंत्रिमंडळ हे देशात कुठेच नसल्याची टीका खासदार जलील यांनी केली. शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे किमान कृषी मंत्र्यांची तरी नेमणूक करावी अशी मागणी खासदार जलील यांनी केली.   

                                 ****

मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात आपल्या विधानाचा िपर्यास केला गेल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ट्विटरवर दिलेल्या स्पष्टीकरणात, का समाजाचं कौतुक हे दुसऱ्या समाजाचा अवमान ठरत नाही, मात्र आजकाल प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहण्याची द्धत रूढ झाली आहे, ती बदलायला हवी, असं राज्यपाल म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि राठी मासाच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली, याचा अभिमान असल्याचं कोश्यारी यांनी नमू्द केलं. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच, कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, राज्यपालांच्या या विधानाचा विविध मान्यवरांनी निषेध केला आहे.

राज्यपालांच्या या विधानाशी सहमत नसल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना, राज्यपालांनी या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, असं म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण विद्यमान राज्यपालांना नाही याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड इथं महात्मा फुले पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ८७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४५हजार ६०६ झाली आहे. काल या संसर्गानं चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १०१ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल २ हजार २५९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, आतापर्यंत ७८ लाख ८४ हजार ४९५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १४५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात १८ नवे रुग्ण आढळले. लातूर ३५, उस्मानाबाद ३३, जालना २९, तर नांदेड जिल्ह्यात ३० नव्या रुग्णांची नोंद झाली. 

****

प्रतिकूल हवामानामुळे गेले दोन दिवस स्थगित असलेली अमरनाथ यात्रा बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांनी काल सकाळी पुन्हा सुरू झाली. एक हजार ९६ यात्रेकरूंच्या तुकडीनं काल पहाटे, पहलगाममधल्या नुनवान बेस कॅम्प इथून, तर ५९७ यात्रेकरूंच्या ३०व्या तुकडीनं भगवती नगर यात्री निवास इथून प्रस्थान केलं.

****

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काल जालना इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनं, परिवारासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...

मी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय, यांच्याशी माझं सविस्तर यासंदर्भामध्ये बोलणं झालं. मी काय जी माझ्यावर परिस्थिती बितते त्या संदर्भाने मी पक्षप्रमुखांच्या कानावर या सर्व गोष्टी टाकल्या आणि जिल्ह्यातल्या तमाम सर्व नेत्यांशीही बोललो. माझी ही भूमिका आहे, मी सच्चा शिवसैनिक आहे, गेली ४० वर्षाचा. आणि घरी आलं की परिवार दिसतो, त्यामुळे काही निर्णय करणं गरजेचं आहेत असं मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या शिवसैनिकांच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समर्थन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. काही परिस्थितीनुसार मला हा निर्णय घ्यावा लागतो म्हणून हा निर्णय मी घेत आहे असंही मी पक्षाच्या कानावर टाकलं आणि त्यामुळे त्यांचं समाधान झालेलं आहे.

****

जालन्यातल्या साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही, मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांचं पूर परिस्थितीमुळं अतोनात नुकसान झालं असून सरकारनं या शेतकऱ्यांना  ७५ हजार रूपये हेक़्टरी मदत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. पवार यांनी काल जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरूंदा, कौठा, तसंच कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यानंतर हिंगोली इथं ते पत्रकारांशी बोलत होते.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्त्रोने घेतलेल्या शालेय मुलांच्या ऑनलाइन स्पर्धेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या कळमनुरी तालुक्यातल्या कोंढूर इथल्या शाळेच्या विद्यार्थिनींनी केलेली कोडिंग प्रोग्रामिंग जुळली. त्यामुळे या विद्यार्थिनींना ७ ते १५ ऑगस्ट दरम्यान श्रीहरिकोटा इथं आझादी सॅट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर

“अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नीती आयोगाकडून एक वर्षापूर्वी ऑनलाइन लिंकद्वारे देशभरातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन केलं होतं. यात कळमनुरी तालुक्यातील कोंढूर जि.प. शाळेनेही सहभाग घेतला.

शिक्षक शंकर लेकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली

 निकिता पतंगे, अयोध्या पतंगे, ऐश्वर्या पतंगे, समृद्धी देशमुख, गायत्री पवार, कोमल पांचाळ, शिवकन्या पोटे, अंजली पतंगे, संस्कृती लेकुळे, ज्ञानेश्वरी पवार या इयत्ता सातवीत असलेल्या विद्यार्थिनींचा यात समावेश आहे.

त्यांना कोडींगसाठी पोलार किट प्राप्त झाल्या होत्या. या किटमध्ये कोडींग प्रोग्राम इन्स्टॉल करायचा होता. हवेतील आर्द्रता, तापमान, उंची, दाब आदी बाबींविषयक कोडींग प्रोग्राम इन्स्टॉल करून विद्यार्थिनींनी ही किट स्पर्धेसाठी पाठविली. ती जुळली आणि या मुलांना थेट इस्त्रोतील उपग्रह प्रक्षेपणासाठी हजेरी लावण्याचे निमंत्रण आले आहे.”                                    रमेश कदम , पीटीसी , हिंगोली.

****

 

लातूर बाजार समितीचे आधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजारपेठेत रुपांतर होणं ही काळाजी गरज असल्याचं, आमदार अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. बाजार समितीत  गेल्या तीन वर्षात उत्कृष्ट कार्य केलेले उद्योजक, व्यापारी, आडते, गुमास्ते तसंच हमाल-मापाडी यांचा काल सन्मान चिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. बाजार समितीच्या स्थलांतरामुळे व्यापाऱ्यांना चांगली जागा मिळेल तसंच लातूर शहरातली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार असल्याचं देशमुख यांनी नमूद केलं.

****

बर्मिंगघम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलक मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. मीराबाईने स्नॅच मध्ये ८८ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११३ किलो असं एकूण २०१ किलो वजन उचललं.

त्यापूर्वी सांगलीच्या संकेत सरगरने भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलं पदक ठरलं. ५५ किलो वजनी गटात त्यानं हे पदक मिळवलं. प्रतिकूल परिस्थितीत आणि दुखापतग्रस्त असताना सुद्धा त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे. दोन महिन्या पूर्वी हरियाणात पंचकुला इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत संकेतची लहान बहीण काजल सरगर हिने सुद्धा भारोत्तोलन प्रकारात महाराष्ट्राला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिले होतं. संकेतच्या या कामगिरीबद्दल काजल हिने या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आता इंग्लंडमध्ये होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला पहिलं सिल्व्हर मेडल घेऊन दिलं. पूर्ण भारतीय लोकांना यावर गर्व आहे. त्यानं केलेल्या कष्टाचं जे चीज झालं, त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत.”

संकेतच्या कामगिरीनंतर सांगलीत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

दरम्यान, गुरूराजा पुजारी याने भारोत्तोलन प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात स्नॅच प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे. पुजारी याने स्नॅचमध्ये ११८ किलो तर क्लीन ॲण्ड जर्क मध्ये १५१ किलो, असं एकूण २६९ किलो वजन उचललं.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं अभिनंदन केलं आहे.

****

मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन, आणि वैचारिक लेखनासाठी औरंगाबादच्या प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या वर्षीपासून निर्मिक साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. २०२१ चा पुरस्कार डॉ. दिलीप चव्हाण यांच्या समकालीन भारत :जातिअंताची दिशा या वैचारिक ग्रंथाला तर २०२२ चा पुरस्कार डॉ. सुधाकर  शेलार यांच्या साहित्यसंशोधन : वाटा आणि वळणे या संशोधनविषयक ग्रंथाला जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांच वितरण आज सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद शहरातल्या शिवछत्रपती महाविद्यालय इथं होणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काल एका शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला शेतमजूर गंभीर जखमी झाला. सेनगाव तालुक्यातल्या जयपूर शिवारात काल दुपारी ही घटना घडली. नागनाथ दत्तराव पायघन असं या शेतकऱ्याचं नाव आहे. दरम्यान, काल परभणी शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

****

नांदेड-पनवेल ही रेल्वेगाडी कोकण रेल्वेवरून मडगावपर्यंत वाढवावी, अशी मागणी शेगाव इथल्या राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे संघटनमंत्री ओमकार माळगावकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, तसंच मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना पत्र पाठवलं आहे.

****

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उद्या एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात दुपारी साडेबारा वाजता विशेष व्याख्यानाचं अयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूर महाविद्यालयातले प्राध्यापक दुडुकनाळे राजेश्वर हे अण्णा भाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर व्याख्यान देतील.

****

No comments: