Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विस्कळीत.
·
पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा
- विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची मागणी.
·
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे ३५ तर उस्मानाबादमध्ये ३१ गट महिलांसाठी
राखीव.
आणि
·
चेन्नईमध्ये आजपासून बुद्धीबळ ऑलिंपियाड.
****
संसदेच्या
दोन्ही सभागृहांचं कामकाज आज विस्कळित झालं. काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी
यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भात वापरलेल्या अपशब्दाबद्दल काँग्रेसनं
माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली. त्यांच्या
घोषणाबाजीमुळं लोकसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत
स्थगित झालं. नंतर ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. त्या आधी काँग्रेस पक्षानं या
प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केली. या मुद्याला
वेगळं वळण दिलं जात असल्याचं सांगून, काँग्रेस पक्ष सदस्यांनी मात्र यावर आक्षेप घेत
इतर विरोधी पक्ष सदस्यांसोबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळं सदनाचं कामकाज
दोन वेळा स्थगित करावं लागलं. राज्यसभेत कामकाजादरम्यान गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी
पक्षाचे सुशील गुप्ता, संदीप पाठक यांना या आठवड्यातल्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित
करण्यात आलं.
****
पावसामुळं
नुकसान झालेल्या ठिकाणी तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी,
अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी आज गडचिरोली
जिल्ह्यात पावसामुळं नुकसान झालेल्या भागाला भेट देऊन पहाणी केली, त्यावेळी पत्रकार
परिषदेत पवार बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं
नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजार
रुपयांची मदत शासनानं द्यावी, असं ते म्हणाले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप
झाले नाहीत. केवळ शेतकऱ्यांचं आधारकार्ड आणि अर्ज घेतले जात आहेत. पंचनामे झाल्याशिवाय
मदत कशी मिळणार, असा प्रश्न त्यांनी केला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता तर पालकमंत्र्यांच्या
माध्यमातून पूरग्रस्तांच्या व्यथा सरकारपर्यंत तत्काळ पोहचल्या असत्या. शिवाय त्यांना
मदतही मिळाली असती. मुंबईत बसणं आणि पालकमंत्री नेमून काम करवून घेणं यात फरक आहे,
अशी टीका पवार यांनी केली. परभणी, लातूर तसंच चंद्रपूर, अकोला अशा काही राज्यातल्या
महापालिका आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही. तिथं अस्वच्छतेची समस्या
अतिक्रमणांमुळं वाढत आहे. या समस्या त्यात राजकारण न आणता दूर केल्या जाव्यात, असं
ते म्हणाले.
****
औरंगाबाद
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज ७० गट आणि १४० गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये
जिल्ह्यातील ७० गटांपैकी ३५ गट महिलांसाठी राखीव आहेत. जिल्ह्यातले ९ गट अनुसूचित जातीसाठी,
चार गट अनुसूचीत जमातींसाठी, इतर मागास प्रवर्गासाठी १८ तर सर्वसाधारण गटासाठी ३९ गट
आरक्षित झाले आहेत. उद्या आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसंच आरक्षणाबाबात
जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी
उद्यापासून दोन ऑगस्ट पर्यंत आहे.
उस्मानाबाद
इथं जिल्हा परिषद आरक्षण सोडत आज काढण्यात आली. यात जिल्ह्यातल्या ६१ गटांपैकी ३१ गट
महिलांसाठी राखीव आहेत. दहा गट अनुसूचित जातीसाठी, १६ गट इतर मागास प्रवर्गासाठी, एक
गट अनुसूचित जमातीसाठी, तर सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिला आणि पुरुषांसाठी ३४ गट असणार
आहेत.
जालना
जिल्हा परिषदेसाठी सोडतही आज टाकण्यात आली. यात ६३ गटांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी
३६ जागा, विशेष मागास प्रवर्गासाठी १७, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ आणि अनुसूचित
जमाती प्रवर्गासाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात महिला
प्रवर्गासाठी एकूण ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं आतापर्यंत २०३ कोटी ४२ लाख मात्रांचा टप्पा पार केला
आहे. १५ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा, तर ८ कोटी १७ लाखापेक्षा
जास्त नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून एक लाख १२ हजारापेक्षा
जास्त लाभार्थ्यांचं लसीकरण झालं त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या
मात्रांची एकूण संख्या १७ कोटी २७ लाखाच्या वर गेली आहे.
****
राज्यात
अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या
अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे आणि ३०९ गावं प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र
तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यातं आलं असल्याची
माहिती आपत्ती नियंत्रण कक्षानं दिली आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळं ११० नागरिकांनी
आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचं पूर्णत: तर २ हजार ८६ घरांचं
अंशत: नुकसान झालं आहे.
****
पैठण
इथल्या नाथ सागरातून सांडव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आज दुपारी साडे
चार वाजेपासून कपात करण्यात आली आहे. इथली अठरा दारं दीड फूट उघडण्यात आली होती. ती
आता एका फुटांवर स्थिर करण्यात आली आहेत. सध्या धरणातून १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे, तर जलविद्युत केंद्रातून एक हजार पाचशे
८९ घनफूट प्रतिसेकंद असं एकूण २० हजार ४५३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात
आहे. धरणाची पाणीपातळी सध्या ९१ टक्के असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
नाथ सागरात पाणी येण्याचं प्रमाण पाहून यामध्ये कमी, अधिक बदल होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर
नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची सूचनाही पाटबंधारे विभागानं केली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात काल सरासरी दोन पूर्णाक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत
सातशे ३० पूर्णांक ६० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हरघर तिरंगा’ उपक्रमाबाबत नांदेड जिल्हयातल्या
ग्रामीण भागातून पाच लाख घरांवर तिरंगा फडकणार आहे. यात किमान पंच्च्याहत्तर हजार महिला
आपल्या घरावर स्वतः राष्ट्रध्वज लावून राष्ट्राला अनोखी सलामी देणार असल्याचं नांदेड
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे. केंद्र
सरकारतर्फे येत्या तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
****
चेन्नईमध्ये
आजपासून चव्वेचाळीसावं बुद्धिबळ ऑलिंपियाड सुरू होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते एका भव्य सोहळ्यात याचं उद्घाटन होत आहे. येत्या नऊ तारखेपर्यंत ही स्पर्धा
चालेल. यात १८७ देश सहभागी होत असून कुठल्याही बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतला आतापर्यंतचा
हा सर्वात मोठा सहभाग आहे. भारत देखील ६ संघांमधल्या ३० खेळाडुंसह आपला आतापर्यंतचा
सर्वात मोठा संघ या स्पर्धेत उतरवत आहे.
****
No comments:
Post a Comment