Saturday, 30 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पहिल्या अखिल भारतीय जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या संमेलनाचं आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. देशभरातल्या सर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीमध्ये समानता आणि सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीनं या परिषदेत विचार विनिमय केला जाणार आहे. 

****

ऊर्जा मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी पुननिर्मित वितरण क्षेत्र योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त उज्वल भारत उज्वल भविष्य पॉवर @2047 या पाच दिवसांच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान या योजनेचं उद्घाटन करणार आहेत. या योजनेअंतर्गत २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षात तीन लाख कोटींपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

****

सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कोठडीत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कोठडीत दिल्लीतल्या न्यायालयानं दोन ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीररीत्या टॅप केल्याप्रकरणी पांडे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.

****

परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना आता पाच ऑगस्टच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

****

सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक किशोर चंडक यांना जाहीर झाला आहे. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप असून, एक ऑगस्ट या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.

****

 

No comments: