Sunday, 31 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  31 July  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जुलै २०२   सायंकाळी ६.१०

****

·      औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

·      मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं घेतलं ताब्यात.

·      शिवसेना आणि ठाकरे हे नातं तुटू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन.

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं जिंकली आणखी दोन सुवर्णपदकं.

आणि

·      आयुष उत्पादनांच्या आणि खेळण्यांच्या निर्यातीत विक्रमी वाढ. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन.

****

औरंगाबाद इथं क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी आज पाऊस, अतिवृष्टी, पीकपाणी आणि विकासकामांचा विभागीय आढावा घेतला. त्यावेळी अतिवृष्टी बाधित शेतजमिनींचे दोन ते तीन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं हे राज्य शासनाचं उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज तातडीनं उपलब्ध करुन देण्यात यावं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबादच्या रहिवाशांना लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा करणं शक्य होणार आहे. १०० कोटी रुपये खर्चाच्या पडेगाव ते समृद्धी महामार्गासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्या गटात किंवा भारतीय जनता पक्षात येऊ नका, असं उपरोधिक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.

****

मुंबईतल्या पत्रा चाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय-ईडीच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. आज सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांच्या घरी दाखल होत त्यांची चौकशी सुरू केली होती. मात्र, नऊ तास चौकशी केल्यानंतर पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही. केवळ चौकशीसाठीच त्यांना ईडी कार्यालयात नेलं आहे, असं स्पष्टीकरण त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. खोटी कारवाई. खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही,’ असं राऊत यांनी सकाळी ट्विटरद्वारे म्हटलं होतं.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक निदर्शनं करत असून, पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला आहे.

****

संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. एकेकाळी मित्र असलेल्या पक्षाचा गळा घोटण्याचं काम सध्या सुरू असून, हे कारस्थान उलथवून टाकण्याची आज गरज आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानीदेखील मोठी गर्दी केली होती. या शिवसैनिकांना उद्देशून ठाकरे बोलत होते. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेंपासून शिवसेना हे नातं तुटू शकत नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाही विरोधात लढत राहू, महाराष्ट्राची माती काय असते ते अन्याय करणाऱ्यांना दाखवून देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

****

इंग्लंडमधल्या बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आज दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. भारोत्तोलन या क्रीडाप्रकारात ५५ किलो वजनी गटात भारताच्या बिंदिया राणीनं रौप्य पदक पटकावलं आहे. बिंदियानं स्नॅचमध्ये ८६, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११६ किलो, असं एकूण २०२ किलोंचं वजन उचलून स्पर्धेत विक्रम नोंदवला. तर १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा यानं पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेकांनी बिंदिया राणी आणि जेरेमी लालरिनुंगा यांचं अभिनंदन केलं आहे.

****

देशातील आयुष उत्पादनांच्या निर्यातीत विक्रमी वाढ होत असून, या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स उदयास येत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषदेत सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. या मालिकेचा हा ९१वा भाग होता.

भारताकडे खेळण्यांच्या निर्यातीचे पॉवर हाऊस होण्याची क्षमता आहे. आता विदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांची संख्या सतत कमी होत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. पूर्वी तीन हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत. ही आयात सत्तर टक्क्यांनी कमी झाली आहे. आजवर तीनशे ते चारशे कोटी रुपयांचीच खेळणी निर्यात करणाऱ्या भारतानं केवळ कोरोना काळातच तब्बल दोन हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या खेळण्यांची निर्यात केली. हे चित्र सुखावणारं आहे, असं ते म्हणाले. लहान-लहान उद्योजकांनी तयार केलेली खेळणी जगभरात पोहोचत आहेत. पर्यावरण-स्नेही, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित खेळणी, अॅक्टिव्हिटी कोड्यांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित शिकवणारी पुस्तके भारतात तयार होत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

यावर्षी ऑक्टोबरमध्ये १७ वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे यजमानपद भारत भूषविणार आहे. ही देशातील सुकन्यांचा खेळांप्रती उत्साह वाढविणारी स्पर्धा असेल, असं ते म्हणाले. यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचंही त्यांनी अभिनंदन केलं.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशात एकूण ३१ लाख ३६ हजार २९ नागरिकांचं लसीकरण झालं. दरम्यान, देशात काल नव्या १९ हजार ६७३ कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली. तर १९ हजार ३३६ रुग्ण या संसर्गातून बरे झाले. विविध राज्यांत मिळून सध्या एक लाख ४३ हजार ६७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

व्यापार-उद्योगाचे वस्तू आणि सेवा कर जीएसटी, प्लास्टिक बंदी आणि बाजार समिती एपीएमसी कायदा हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. ते आज औरंगाबाद इथं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज आणि औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं औरंगाबाद इथं आयोजित राज्यस्तरीय व्यापार परिषदेत बोलत होते.

चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यापार उद्योगात होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा, एपीएमसी कायद्यात बदल करण्यात यावा आणि जोपर्यंत प्लास्टिकला पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्लास्टिक बंदीचा मिळण्याला स्थगिती देण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते.

****

महसूल विभागाचा आकृतिबंध आणि पदभरतीसंदर्भात मराठवाडा महसूल कर्मचारी संघटनेनं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं. महसूलव्यतिरिक्त अधिकच्या कामांमुळे कर्मचाऱ्यांच्या तणावात वाढ होत आहे. जुना आकृतिबंध आणि रिक्त पदांमुळे कामं मुदतीत पूर्ण होत नसल्यानं नवीन आकृतिबंध मंजूर होईपर्यंत सध्या मंजूर असलेली १०० टक्के पदं तात्काळ भरण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी सुमारे तीन हजार सहाशे हेक्टरवरच्या सोयाबीन पिकाचं गोगलगायींनी शेंडे खाऊन नुकसान केलं आहे. गोगलागायींच्या प्रादुर्भावाचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे आणि दुबार पेरणीसाठी शासनानं विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या परळी, अंबाजोगाई या तालुक्यात त्यांनी आज पीक पाहणी केली. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसान, तसंच पेरणीबाबतची माहिती त्यांनी घेतली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यावेळी उपस्थित होते.

****

राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका २८ जिल्ह्यांतल्या ३१३ गावांना बसला असून, ८३ तात्पुरती निवारा केंद्रं तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे ११२ नागरिकांनी आजवर जीव गमावला आहे, तर २२३ जनावरं दगावल्याची नोंद आहे. विविध ठिकाणच्या एकूण ४४ घरांचं पूर्णत:, तर २ हजार ८६ घरांचं अंशत: नुकसान झालं आहे.

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून, पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल-एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल-एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत, असं राज्य आपत्ती नियंत्रण कक्षानं कळवलं आहे.

                                         ****

No comments: