Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
आर्थिक गैरव्यवहार
प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळाली असून, सक्तवसुली
संचालनालय - ईडीकडून होत असलेल्या अटक, संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईसही रोखण्यास
नकार दिला आहे. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठानं पीएमएलए कायद्याविरोधात करण्यात
आलेल्या २०० हून अधिक याचिका एकत्रित करत आज त्यावर सुनावणी घेऊन, ईडीच्या कारवाईच्या
अधिकारांवर शिक्कामोर्तब केलं. या याचिकांमध्ये अटक आणि जप्तीसंबंधी कारवाईवर आक्षेप
घेण्यात आला होता. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई केली
आहे.
****
संसदेच्या
पावसाळी अधिवेशनाचा आज आठवा दिवस असून, विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे
आजही कामकाज बाधित झालं.
राज्यसभेत
कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या
सदस्यांनी महागाई, जीएसटी दरवाढ यासह इतर मुद्यांवर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती एम
व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला. त्यामुळे सदस्यांनी सभागृहाच्या मधोमध येऊन घोषणाबाजी
करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाज एका तासासाठी स्थगित
करण्यात आलं होतं.
लोकसभेतही
कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जी एस टी आणि अन्य मुद्द्यांवरून
सदनात घोषणाबाजी सुरु केली.
****
भविष्यात
बदलणाऱ्या परिस्थितीत आधुनिक शस्त्रास्त्रांची भूमिका महत्वाची असल्याचं, संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज 'सैन्यासाठी दारुगोळा उत्पादन - आत्मनिर्भरतेमधील
संधी आणि आव्हानं' या विषयावर दुसर्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते
झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाकडे असलेली शस्त्रसामग्री
आणि दारुगोळा यावरूनच मोजला जातो. आगामी काळात विविध आव्हानांना सामोरं जाण्यासाठी
दारुगोळा निर्मिती क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय
राखीव पोलीस बल - सीआरपीएफचा आज ८३ वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र
मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी
जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत
****
काश्मीर
खोर्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली
आहे. जम्मूच्या भगवती यात्रा भवनातून निघालेल्या एक हजार १४७ भाविकांच्या गटाला चंदरकोट
इथं थांबवण्यात आलं आहे. काश्मीर खोर्याला देशाच्या अन्य भागाशी जोडणार्या जम्मू-श्रीनगर
राष्ट्रीय महामार्ग देखील मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला आहे.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २७ लाख ३७ हजार
२३५ नागरीकांचं लसीकरण झालं.
दरम्यान,
देशात काल नव्या १८ हजार ३१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ५७ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २० हजार ७४२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ४५
हजार २६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नागरिकांच्या
सोयीसाठी केंद्र सरकारनं परदेशी योगदान नियम २०२२ मध्ये सुधारणा केली आहे. आर्थिक मर्यादा
आणि मुदत दोन्हींमध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती गृह मंत्रालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे
दिली आहे.
****
३१ जुलैच्या
आत सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असं आवाहन, औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी केलं आहे. काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कृषी
चित्ररथांना जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यावेळी
ते बोलत होते. खरीप पिकांच्या विमा उतरवण्याबाबत कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून तीन
चित्ररथांच्या माध्यमातून जिल्हाभरात जागृती करण्यात येत आहे. पीक विम्याच्याबाबतीत
अधिक माहिती हवी असल्यास, नजिकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,
असंही चव्हाण यांनी सांगितलं.
****
भारत आणि
वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज
खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत
पहिले दोन सामने जिंकून भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्याच्या वर पोहोचला आहे.
धरणात सध्या २९ हजार ४८१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, धरणाच्या
१८ दरवाजातून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या
उजव्या कालव्यातून ५५० आणि जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाणी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
No comments:
Post a Comment