Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राज्यसभेतील १९ खासदार अधिवेशनाच्या चालू आठवड्याच्या उर्वरित
काळासाठी निलंबित.
·
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेसची
निदर्शनं.
·
प्लास्टिक कोटेड किंवा लॅमिनेटेड उत्पादनांच्या निर्मिती आणि
वापरावर राज्यसरकारची बंदी.
·
औरंगाबाद, लातूर, परभणी, आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसह राज्यातल्या
नऊ महानगरपालिकांसाठी येत्या पाच ऑगस्टला आरक्षण सोडत.
आणि
·
भालाफेकपटू नीरज चोप्राची मांडीच्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल
क्रीडा स्पर्धेतून माघार.
****
राज्यसभेतील
१९ खासदारांना चालू आठवड्याच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये
तृणमूल काँग्रेसचे सात, द्रमुकचे सहा, टीआरएसचे तीन, कम्युनिस्ट पक्षाचे तीन, यांच्यासह
१९ जणांचा समावेश आहे. महागाई तसंच वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या मुद्यावरून विरोधी
बाकांवरच्या सदस्यांनी आक्रमक होत हौद्यात उतरून गदारोळ केल्यानं, सदनाचं काम आज वारंवार
बाधित झालं. उपसभापतींनी कठोरपणे इशारा देऊनही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं,
ही कारवाई करण्यात आली.
****
दरम्यान,
महागाई आणि जीएसटीच्या मुद्यावरून विरोधकांनी दोन वेळा सभात्याग केला. प्रश्नोत्तराच्या
काळात याच मुद्यावरून सदनाबाहेर गेलेले द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि डाव्या पक्षांसह
विरोधी पक्षाचे सदस्य भोजनावकाशानंतरही याच मुद्यावरून आक्रमक होत अध्यक्षांच्या आसनासमोरच्या
हौद्यात गोळा झाले. काँग्रेसच्या चार खासदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी, जीवनावश्यक
वस्तूंवरचा जीएसटी मागे घेण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
या गदारोळातच अध्यक्षांनी नियम ३७७ अंतर्गत लोकहिताच्या तातडीच्या मुद्यांचा पुकारा
केला, त्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला.
****
काँग्रेस
अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालय - ईडी कडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या
विरोधात दिल्लीत विजय चौक परिसरात आंदोलन करणारे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या
इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काळा पैसा वैध केल्या प्रकरणी ईडीने आज, मंगळवारी
दुसऱ्यांदा सोनिया गांधी यांची चौकशी केली. या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी संसद भवन
परिसर ते विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. त्यानंतर राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी
राष्ट्रपती भवनाकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानं, राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांनी
विजय चौकात ठिय्या आंदोलन केलं. यामुळे राहुल गांधीसह काँग्रेसच्या अनेक खासदारांना
पोलिसांनी ताब्यात घेतलं.
मुंबईतही
मंत्रालय परिसरात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वात
सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. औरंगाबाद इथं क्रांती चौकात माजी आमदार डॉ.कल्याण काळे
यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
****
शिवसेना
आणि धनुष्यबाण यावर ठाकरे तसंच शिंदे गटाच्या दाव्यावर आता सर्वोच्च न्यायालयात येत्या
एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं, यासाठी
केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत आपल्याकडे असलेल्या बहुमताच्या
दाव्यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने
न्यायालयात धाव घेत, अशाप्रकारे कागदपत्रांची मागणी करणं, हा न्यायालयाच्या ‘जैसे थे
आदेशाचा भंग होत असल्याचं म्हटलं आहे. त्यावर न्यायालयाने १ ऑगस्टला अन्य प्रकरणांवरील
सुनावणींसोबत या विषयावरही सुनावणी घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे.
****
केंद्र
सरकारनं १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटातल्या लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीची खबरदारीची
मात्रा मोफत द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या १० दिवसांत राज्यातल्या सुमारे १२ लाख
पात्र लाभार्थ्यांनी ही मात्रा घेतली आहे. मराठवाड्यातील हिंगोली, जालना, लातूर, नांदेड,
उस्मानाबाद, परभणीसह राज्यात अनेक जिल्ह्यांत नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद
मिळत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
दरम्यान,
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल
३० लाख ४२ हजार ४७६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०२ कोटी ५०
लाख ५७ हजार ७१७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
प्लॅस्टिक
लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर चिकटवलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये
सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाने
१ जुलै २०२२ पासून एकल वापराच्या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घातली आहे. प्रतिबंधित वस्तूंमध्ये
प्लास्टिक कोटेड किंवा प्लास्टिक लॅमिनेटेड कागदी किंवा अॅल्युमिनियमपासून बनवलेल्या
डिश, कप, ग्लासेस, काटे, वाडगा, कंटेनर इत्यादीच्या वापरावर तसंच उत्पादनावर आता राज्यात
बंदी असणार आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी
हे बंदीचे पाऊलं उचलण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद,
लातूर, परभणी आणि नांदेड-वाघाळा महानगरपालिकेसह राज्यातल्या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक
निवडणुकांसाठी येत्या पाच ऑगस्टला आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं
आज दिले. यानुसार अनुसूचित जाती-महिला, अनुसूचित जमाती-महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग
आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला यांच्या आरक्षित जागांसाठी ही सोडत काढली जाईल.
त्यावर सहा ते १२ ऑगस्ट या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय
अंतिम आरक्षण २० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलं जाणार आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या दहा नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं
आज जाहीर केला. देगलूर, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, भोकर, मुदखेड, हदगाव,
कंधार, उमरी या सर्व नगर परिषदांच्या आरक्षण सोडत परवा गुरुवारी काढल्या जाणार आहेत.
****
औरंगाबादच्या
पैठण इथल्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आज दुपारी वाढ करण्यात
आली. धरणाचे अठरा दरवाजे आता दीड फुटावर उचलून २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाणी सोडण्यात येत असून उजव्या कालव्यातून आता ५५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाणी सोडण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त केला
जाणार असल्याचं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे.
****
भारताचा
भालाफेकपटू नीरज चोप्राने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडमध्ये
बर्मिंगहॅम इथं येत्या २८ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या नीरजने नुकत्याच झालेल्या १८ व्या जागतिक
एथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत रौप्य पदक पटकावलं. मात्र या स्पर्धेदरम्यान
मांडीला दुखापत झाल्यानं, त्याला महिनाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय
ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी ही माहिती दिली.
****
नांदेड
जिल्ह्यात उमरी पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख तळेगावकर यांचं आज ह्रदयविकाराच्या
तीव्र झटक्यानं निधन झालं. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी तळेगाव इथं अंत्यसंस्कार
होणार आहेत.
****
आजादी
का अमृत महोत्सवांतर्गत औरंगाबाद इथं ‘उज्ज्वल भारत - उज्ज्वल भविष्य - पॉवर @२०४७’
या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी १० वाजता औरंगाबाद-जालना मार्गावर
लाडगाव इथं आदिती लॉन्स इथं तर दुपारी ४ वाजता सिल्लोड तालुक्यात भराडी इथं या कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment