Saturday, 30 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.07.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारा अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द

·      राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज कालही बाधित;अधिररंजन चौधरींकडून लेखी क्षमायाचना

·      तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरच्या आरोग्यविषयक इशाऱ्यात बदल;सुधारित नियमावली १ डिसेंबर पासून लागू होणार

·      कोविडच्या बीए. टू पॉईंट सेव्हन फाईव्ह या व्हेरियंटचा मराठवाड्यात शिरकाव-लातूर तसंच जालन्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद

·      अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीऐवजी सरकार सत्कार समारंभात मग्न-खासदार शरद पवार यांची टीका

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर

अणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची संमिश्र कामगिरी;वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ६८ धावांनी विजय

****

सविस्तर बातम्या

मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारी राज्यसरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. यासंदर्भात एप्रिल महिन्यात सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणी न्यायालयानं काल निर्णय देत, राज्य सरकारने डिसेंबर २०२० मध्ये काढलेला हा अध्यादेश रद्द केला. राज्य सरकारने या अध्यादेशाद्वारे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणात सामावून घेतलं होतं, मात्र आर्थिक दुर्बल घटकातल्या लाभार्थींनी या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देत, हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयानं ती मान्य करत, काल हा अध्यादेश रद्द केला.

****

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाद्वारे गावातल्या पात्र मतदारांकडून पंचायतीच्या सरपंच पदाची थेट निवडणूक करण्याबाबतचा अध्यादेश, ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीकरता सरपंच पदासाठी नामनिर्देशन करणाऱ्या व्यक्तीचं नाव, मतदार यादीत असणं आवश्यक असून, त्याचं वय २१ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी नसावं, असं या अध्यादेशात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, थेट निवडून आलेल्या सरपंचाविरूद्धच्या अविश्वास प्रस्तावास, ग्रामसभेद्वारे शिरगणना करण्याच्या पद्धतीनं अनुसमर्थन देण्यात येईल, अशी तरतूदही करण्यात आली आहे.

****

माजी सैनिकांच्या अनाथ मुलांना दिली जाणारी आर्थिक मदत दरमहा एक हजार रुपयांवरुन तीन हजार रुपये करण्याची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. संरक्षण मंत्री माजी सैनिक कल्याण निधीच्या अनाथ अनुदान योजनेअंतर्गत ही मदत दिली जाते. त्यात वाढ करण्याच्या निर्णयाचा अनेक माजी सैनिकांच्या कुटुंबांना लाभ होईल, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

****

काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधिररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच, सत्ता पक्षाच्या सदस्यांनी चौधरी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याला विरोधकांनी सभापतींसमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिलं. त्यावर उपसभापतींनी सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

लोकसभेतही असंच चित्र पहायला मिळालं. याच मुद्यांवर सुरू झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.

दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची काल लेखी माफी मागितली. बोलताना आपली जीभ घसरल्याचं, सांगत त्यांनी या पत्रातून क्षमायाचना केली आहे.

****

सर्व तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनावरच्या आरोग्यविषयक इशाऱ्यात बदल करून याबद्दलची सुधारित नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केली आहे. ही सुधारित नियमावली एक डिसेंबर पासून लागू होणार आहे. त्यानुसार एक डिसेंबर २०२२ रोजी अथवा त्यानंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या सर्व तंबाखू उत्पादनांवर, ‘तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो, हा आरोग्यविषयक इशारा, संबंधित प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असेल. तसंच, पुढील वर्षी १ डिसेंबर नंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या उत्पादनांवर, ‘तंबाखू सेवन करणारे तरुणपणी मरतात, हा आरोग्य विषयक इशारा, प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असल्याचं यात म्हटलं आहे.

****


पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ९९७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४३ हजार ५१९ झाली आहे. काल या संसर्गानं सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ९७ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल २ हजार ४७० रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, आतापर्यंत ७८ लाख ८२ हजार २३६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार १८६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

कोविडच्या बीए. टू पॉईंट सेव्हन फाईव्ह या व्हेरियंटचा मराठवाड्यात शिरकाव झाला आहे. लातूर तसंच जालन्यात या व्हेरियंटचा प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.

राज्यात बी ए. फाईव्ह व्हेरीयंटचे काल चार रुग्ण तर बी ए. टू पॉईंट सेव्हन फाईव्ह प्रकारचे ३२ रुग्ण आढळले. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.फोर तसंच बीए. फाईव्ह रुग्णांची संख्या १९६ तर बीए. टू पॉईंट सेव्हन फाईव्ह प्रकारच्या रुग्णांची संख्या १२० झाली आहे.

****

मराठवाड्यात काल १६० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात ३५ नवे रुग्ण आढळले. लातूर ४१, उस्मानाबाद ३३, जालना २५, नांदेड ११, परभणी नऊ, तर बीड जिल्ह्यात सहा नव्या रुग्णांची नोंद झाली. 

****

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याची गरज असताना, राज्यात सरकार मात्र भेटीगाठी आणि सत्कार समारंभात मग्न आहे, अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अलीकडे दिलेल्या निर्णयाचा संदर्भ घेऊन, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास समाजातला मोठा वर्ग निवडणुकीपासून वंचित राहील, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आणि उद्या दोन दिवस औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज संध्याकाळी वैजापूर तालुक्यात महालगाव इथं शिवसेनेची जाहीर सभा, उद्या रविवारी सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात, अतिवृष्टी आणि पीक आढावा बैठकीनंतर, ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुपारी सिल्लोड इथं शिवसेनेच्या सभेसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रात्री उशीरा ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.

****

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा इथं तसंच वसमत तालुक्यात जिंतूर फाटा, कौठा, कुरुंदा इथे तर नांदेड जिल्ह्यात माहूर, हदगाव आणि नांदेड तालुक्यात पूरस्थितीची पाहणी ते करणार आहेत. नांदेड तसंच वसमत इथं ते आढावा बैठकही घेणार आहेत.

****

हर घर तिरंगा हा उपक्रमासाठी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचं काल उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमासाठी लागणारे पावणे चार लाख ध्वज हे ग्रामपंचायती तसंच बचत गटांनी खरेदी करून ३० रुपये दराने प्रति ध्वज या दरात विक्री करण्याबाबत शासनानं सूचना दिल्या आहेत.

****

जालना शहरातल्या वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ४७ शालेय बसवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या पथकानं काल अचानक शालेय बसची तपासणी केली. पालकांनी परवानाधारक बसमधूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं बस चालकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन काठोळे यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे करण्यात येणाऱ्या विसर्गात काल कपात करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता धरणाची १८ दारं एक फूट उंचीवरुन अर्ध्या फुटावर स्थिर करण्यात आली. गोदावरी नदी पात्रात आता नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. सध्या जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्याद्वारे ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण मंत्रालय यांच्यावतीनं काल चंद्रपूर इथं व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री यादव यांनी जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगल सफारी केली, तसंच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांशी संवाद साधला. उपजीविकेच्या निमित्तानं या व्याघ्र प्रकल्पात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं यादव यांनी यावेळी सांगितलं.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची काल पहिल्या दिवसाची कामगिरी संमिश्र राहिली. मनिका बत्राने टेबल टेनिसच्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत, दक्षिण आफ्रिकेच्या मुशफिकुह कलामचा ११-५ असा पराभव केला. तर महिला दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत, रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुला या जोडीने, दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिशा पटेलला पराभूत केलं.

पुरुष दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या हरमीत देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन बार्बाडोसच्या केव्हिन फार्ले आणि टायरेस नाइट यांचा, ११-९, ११-९, ११-४ असा पराभव करत, हा सामना ३-० असा जिंकला.

हॉकीमधे भारतीय महिला संघानं घानावर ५-० असा विजय मिळवला. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पी व्ही सिंधू, पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, तर पुरुष दुहेरित बी सुमित रेड्डी आणि मच्चीमंड पोनप्पा या जोडीनं विजयी सलामी दिली.

भारताच्या श्रीहरी नटराजने पुरुषांच्या शंभर मीटर बॅकस्ट्रोक स्विमिंगच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाला काल ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

****

त्रिनिदाद इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिज वर ६८ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात सहा बाद १९० धावा केल्या. रोहीत शर्माने ६४, दिनेश कार्तिकने ४१, सूर्यकुमार यादवनं २४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित षटकात आठ बाद १२२ धावाच करु शकला. दिनेश कार्तिक सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पाच सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना एक ऑगस्टला होणार आहे. मालिकेत भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.

****

राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. कशीष भराड आणि श्रेयस जाधव अशी या खेळाडूंची नावं असून, कटक इथं झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी तलवारबाजी स्पर्धेत, दोघांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची निवड झाली आहे.

****

जलजीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ‘हर घर जल उत्सव विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत १२ ऑगस्टपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखान्याच्या तोंडार इथल्या युनीट क्रमांक २ कडून शेतकऱ्यांच्या ऊसाला आजपर्यंतचा सर्वाधिक प्रति टन २ हजार ७८२ रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. त्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे काल जळकोट तालुक्यातल्या विविध गावचे शेतकरी, सरपंच, तसंच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी स्वागत करून आभार मानले.

****

No comments: