Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
पीएमएलए कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने
फेटाळल्या.
·
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित.
·
ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी;
१५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५० जागा वाढवणार.
आणि
·
नांदेड जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्था येत्या १५ ऑगस्टपर्यंत
तंबाखू मुक्त करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.
****
काळा
पैसा वैध करण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याला आव्हान देणाऱ्या सुमारे अडीचशे याचिका
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट’-
पीएमएलए कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत या कायद्यातील अटक
आणि जप्ती संदर्भातील तरतुदींवर आक्षेप घेणाऱ्या सुमारे अडीचशे याचिका फेटाळून लावत,
पीएमएलए कायद्यातल्या तरतुदी योग्य असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदचलं
आहे. ईडीचा तपास, अटक, तसंच जप्तीचा अधिकारही न्यायालयानं योग्य ठरवला आहे.
मनी
लाँड्रिंग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार एखाद्या आरोपीच्या अटकेची कारवाई चुकीची ठरू
शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. इसीआयआर हा एक प्रकारचा प्राथमिक माहिती
अहवाल- एफआयआर आहे. आरोपीला अटक करताना याची प्रत देणं आवश्यक नाही, मात्र अटकेचं कारण
सांगावं लागेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
****
नॅशनल
हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी
यांची सक्त वसुली संचालनालयानं आजही चौकशी केली. काँग्रेस पुरस्कृत यंग इंडिया प्रायव्हेट
लिमिटेड या कंपनीतल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची तपासणी सक्त वसुली संचालनालय करत
आहे. या आधी, या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पाच दिवस चौकशी करण्यात
आली होती.
या
चौकशी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद
जिल्हा काँग्रेसनं ईडीच्या विरोधात आज सत्याग्रह आंदोलन केलं. पुढील काळात रस्ता रोको
आणि जेल भरो, अशी तीव्र आंदोलनं करण्यात येतील, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज
पाटील यांनी दिला.
****
लोकसभेत
द्रविड मुनेत्र कळघम आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आजही सभात्याग केला. सकाळच्या
सत्रातल्या तहकुबीनंतर दुपारी दोन वाजता सदनाची कारवाई सुरू झाल्यावर विरोधकांनी काँग्रेस
पक्षाच्या चार खासदांचं निलंबन मागे घेण्याची मागणी लावून धरली. मात्र अध्यक्षांनी
जनहिताच्या तातडीच्या मुद्यांचा पुकारा केल्यानं द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी
सभात्याग केला.
****
दरम्यान,
खाद्य पदार्थांच्या तसंच वस्तू आणि सेवा कराच्या दरातली वाढ, या मुद्यावर सरकारनं चर्चा
करावी, अशी मागणी करत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी आज संसद परिसरात
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर वेगवेगळं आंदोलन केलं. सरकार या मुद्यावर चर्चा
करणं टाळत आहे, असा आरोप या सदस्यांनी केला.
संसदीय
कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत सदनात बोलताना, विरोधकांच्या सर्व मागण्यांवर
चर्चा करण्यास सरकार तयार आहे, विरोधक मात्र चर्चेऐवजी सदनाचा अमूल्य वेळ वाया घालवत
असल्याची टीका केली.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८ ते ५९ वयोगटाच्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा
बूस्टर डोस केंद्र सरकारतर्फे मोफत दिला जात आहे. बीड जिल्ह्यातल्या सर्व पात्र नागरिकांनी
ही मात्रा घेण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांनी केलं आहे.
बुस्टर डोस चालू केल्यामुळे सुरूवातीला लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. परंतू
मी या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त
लोकांनी लसीकरण करून घ्यावं. आपल्या कुटुंबातील व्यक्ती असतील, आपला मित्र परिवार असेल,
या सर्वांचच लसीकरण करून घेऊन संभाव्य या कोविडविषयी जनजागृती होणं पण अपेक्षित आहे.
दरम्यान,
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल
२७ लाख ३७ हजार २३५ नागरीकांचं लसीकरण झालं.
****
माजी
राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सातव्या
पुण्यतिथी निमित्तानं त्यांना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. कलाम यांचा साधेपणा,
अपार ज्ञान, इतरांबद्दल सहानुभूती आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची
तीव्र इच्छा प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणा देत आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या
नायडू यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली. गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या अभिवादन
संदेशात कलाम यांचं पूर्ण आयुष्य भारताला एक मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी समर्पित होतं,
असं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने
मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना ही माहिती
दिली. या योजनेसाठी ८९० कोटी रुपये निधी मंजूर झाला असून, यामुळे हजारो एकर जमीन सिंचनाखाली
येईल, साठ गावातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मराठवाड्यात हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी १०० कोटी तरतूद केल्याची माहिती
मुख्यमंत्र्यांनी दिली. लोणार सरोवर विकासासाठी ३६० कोटी रुपये तरतूद करण्यालाही मंत्रिमंडळ
बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्याच्या
१५ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ५० जागा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला,
यासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. पोलिसांच्या घरांसाठी
सर्वंकष आराखडा तयार करण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
येत्या
पंधरा ऑगस्टपर्यंत नांदेड जिल्ह्यातली सगळी कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयं तंबाखू
मुक्त करावीत, असे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिले आहेत.
अशा सगळ्या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर तंबाखू संकलन पेटी ठेवण्याचेही आदेश असून,
कार्यालयामध्ये प्रवेश करण्याच्या आधी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ या पेटीत टाकूनच
कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. जिल्ह्यात तंबाखू धाड पथक स्थापन करण्यात आलेलं
असून, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना तसंच उल्लंघन झालेल्या संस्थेच्या प्रमुखाला दंड
आकारला जाणार आहे.
****
१३
ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील प्रत्येक आस्थापना, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर,
आस्थापनेवर १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारावा, असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी
राधाबिनोद शर्मा यांनी केलं आहे.
****
औरंगाबादच्या
पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सध्या ३० हजार ४३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी
पात्रात सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणी साठा सध्या ९१ पूर्णांक ७३ शतांश टक्के एवढा
असून, सध्या १३ हजार ४१५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवाच्या निमित्तानं प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यातल्या
भोकर, अर्धापूर आणि कंधार तालुक्यातल्या सगळ्या शाळांच्या मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांसाठी
रस्ता सुरक्षा मार्गदर्शन शिबिर घेण्यात आलं. यामध्ये स्कूल बस नियमावलीची तसंच स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना
रस्ता वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले.
****
रेल्वेच्या
सोलापूर विभागातल्या दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधल्या भिगवण-वाशिंबे रेल्वे स्थानकांदरम्यान
दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नांदेड ते पनवेल ही गाडी येत्या चार ते आठ ऑगस्ट
या काळात नांदेडपासून कुर्डूवाडीपर्यंतच धावणार आहे. कुर्डूवाडी ते पनवेल हा टप्पा
सध्या रद्द करण्यात आला आहे. तर, पनवेल ते नांदेड ही गाडी येत्या पाच ते नऊ ऑगस्ट या
काळात पनवेलऐवजी कुर्डूवाडीपासून नांदेडसाठी निघेल.
****
No comments:
Post a Comment