Friday, 29 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  29 July  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जुलै २०२   सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपतींबाबत अधीररंजन चौधरी यांच्या आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज आजही बाधित.

·      तंबाखू उत्पादनांच्या वेष्टणावरच्या आरोग्यविषयक इशाऱ्यात बदल; सुधारित नियमावली १ डिसेंबर पासून लागू होणार.

·      जालना इथं वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ४७ शालेय बसवर दंडात्मक कारवाई.

·      जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठी कपात; सध्या सुमारे साडे नऊ हजार घनफुट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू.

आणि

·      राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या तलवारबाजी संघात औरंगाबादच्या दोन खेळाडूंची निवड

****

काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच, सत्ता पक्षाच्या सदस्यांनी चौधरी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याला विरोधकांनी सभापतींसमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिलं. त्यावर उपसभापतींनी सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच, सत्ताधारी सदस्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, यासाठी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस सदस्यांनी पुन्हा हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे उपसभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.

लोकसभेतही असंच चित्र पहायला मिळालं. याच मुद्यांवर सुरू झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.

****

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जून २०२२ अखेरपर्यंत देशभरात एक लाख २० हजार आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशभरात दीड लाख आरोग्य उपकेंद्रं तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करत असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.

****

सर्व तंबाखू उत्पादनांच्या वेष्टणावरच्या आरोग्यविषयक इशाऱ्यात बदल करून याबद्दलची सुधारित नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केली आहे. ही सुधारित नियमावली १ डिसेंबर पासून लागू होणार आहे. त्यानुसार १ डिसेंबर २०२२ रोजी अथवा त्यानंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या सर्व तंबाखू उत्पादनांवर ‘तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो’ हा आरोग्यविषयक इशारा संबंधित प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असेल, असं आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तसंच, पुढील वर्षी १ डिसेंबर नंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या उत्पादनांवर ‘तंबाखू सेवन करणारे तरुणपणी मरतात’ हा आरोग्य विषयक इशारा प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असल्याचं यात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान मोदी परवा आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आणि परवा दोन दिवस औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी वैजापूर तालुक्यात महालगाव इथं शिवसेनेची जाहीर सभा, परवा रविवारी सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी आणि पीक आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुपारी सिल्लोड इथं शिवसेनेच्या सभेसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रात्री उशिरा ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.

****

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी राज्यात पीकस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. खरीप हंगामातल्या भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल, मूग आणि उडीद या ११ पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ३०० रुपये प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क भरून एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख मूग आणि उडीद पिकासाठी ३१ जुलै तर इतर पिकांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत असून यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

                                       ****

जालना शहरातल्या वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ४७ शालेय बसवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या पथकानं आज अचानक शालेय बसची तपासणी केली त्यात ही कारवाई करण्यात आली. पालकांनी परवानाधारक बसमधूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं बस चालकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन परिवहन अधिकारी काठोळे यांनी यावेळी केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे करण्यात येणाऱ्या विसर्गात आज कपात करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता धरणाची १८ दारं एक फुट उंचीवरुन अर्ध्या फुटावर स्थिर करुन गोदावरी नदी पात्रात आता नऊ हजार ४३२ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्या जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्याद्वारे ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

येत्या ९ ते २० ऑगस्ट दरम्यान लंडन इथं होणाऱ्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत कॅडेट ज्युनिअर आणि सिनिअर गटातील स्पर्धेसाठी औरंगाबादच्या दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. कशीश भराड आणि श्रेयस जाधव अशी या खेळाडूंची नावं असून कटक इथं झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी तलवारबाजी स्पर्धेत या दोघांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघात त्यांची निवड करण्यात आली आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजवर तीन - शून्य असा विजय मिळवला आहे.

****

राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या वतीनं आज चंद्रपूर इथं व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री यादव यांनी जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगल सफारी केली तसंच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांशी संवाद साधला. उपजीविकेच्या निमित्तानं या व्याघ्र प्रकल्पात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं.

****

सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक किशोर चंडक यांना जाहीर झाला आहे अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. एक ऑगस्ट ला मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.

****

No comments: