Friday, 29 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

आज जागतिक व्याघ्र दिन आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचं रक्षण करण्यासाठी जागतिक प्रणालीला प्रोत्साहन देणं आणि व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृती आणि समर्थन करणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे.

यानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण तसंच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीनं चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या विशेष व्याघ्र संरक्षण दलाचं संचलन होणार आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगानं काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. चौधरी यांनी आयोगापुढे येऊन आपल्या वक्तव्याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावं, असं या नोटिसीत म्हटलं आहे. याबाबत तीन ऑगस्टला सुनावणी होणार आहे. आयोगानं काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही याबाबत पत्र लिहिलं असून, चौधरी यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे.

****

उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी भारत हा झपाट्याने पसंतीचा देश म्हणून उदयाला येत असल्याचं, केंद्र सरकारनं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्रातल्या परदेशी गुंतवणुकीत २०२०-२१ या वर्षाच्या तुलनेत ७६ टक्के वृद्धी झाली असून, ३७ टक्क्याहून जास्त परदेशी गुंतवणुकीसह कर्नाटक तर २६ टक्क्यापेक्षा जास्त गुंतवणुकीसह महाराष्ट्र ही दोन राज्य देशातली सर्वाधिक परदेशी गुंतवणूक मिळवणारी राज्य ठरल्याचं, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

भारतीय हवाई दलाच्या मिग 21 या शिकाऊ लढाऊ विमानाला काल रात्री अपघात झाला असून, त्यातील दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. राजस्थान मधल्या बारमेर जिल्ह्यातल्या भिमदा गावाजवळ ही दुर्घटना घडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या संदर्भात भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याशी चर्चा करून, अपघातात मृत झालेल्या वैमानिकांना श्रद्धांजली वाहिली आहे.

//**********//

 

No comments: