Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० जुलै २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात सांगलीच्या
संकेत सरगरला रौप्यपदक.
·
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने
पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात
केलेल्या विधानाचा विविध मान्यवरांकडून निषेध.
आणि
·
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांची शिंदे गटात जाण्याची
घोषणा.
****
सांगलीच्या
संकेत सरगरने बर्मिंगघम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात
५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि दुखापतग्रस्त असताना
सुद्धा त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी हरियाणात पंचकुला इथं
झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत संकेतची लहान बहीण काजल सरगर हिने सुद्धा
भारोत्तोलन प्रकारात महाराष्ट्राला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. संकेतच्या या
कामगिरीबद्दल काजल हिने या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या –
आता इंग्लंडमध्ये होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला पहिलं सिल्व्हर
मेडल घेऊन दिलं. पूर्ण भारतीय लोकांना यावर गर्व आहे. त्यानं केलेल्या कष्टाचं जे चीज
झालं, त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत.
संकेतच्या
कामगिरीनंतर सांगलीत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र
मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी संकेतचं अभिनंदन केलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नाशिक इथं आढावा बैठकीत बोलत होते.
राज्य शासन जनतेप्रती संवेदनशील असल्यामुळे थेट विभागस्तरावर जावून विकास कामांचा आढावा
घेण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाळ्यात शासकीय विभागांनी
समनव्यय साधून काम करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मालेगाव
इथं २०५ पोलीस निवासस्थानं तसंच नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्या हस्ते आज झाला. पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात
येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान,
नाशिक इथून मुख्यमंत्री आज औरंगाबाद इथं येत आहेत. आज संध्याकाळी वैजापूर तालुक्यात
महालगाव इथं शिवसेनेची जाहीर सभा, उद्या रविवारी सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात,
अतिवृष्टी आणि पीक आढावा बैठकीनंतर, ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुपारी सिल्लोड
इथं शिवसेनेच्या सभेसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी औरंगाबाद
इथं छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रात्री उशिरा
ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
दरम्यान,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औरंगाबाद इथं काळे झेंडे दाखवून स्वागत करणार असल्याचा
इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत
होते. राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्यामुळे
याविरोधात काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं खासदार जलील म्हणाले.
राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन होवून एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा
विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच असणारे मंत्रिमंडळ हे देशात
कुठेच नसल्याची टीका खासदार जलील यांनी केली. शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं
आहे. त्यामुळे किमान कृषी मंत्र्यांची तरी नेमणूक करावी अशी मागणी खासदार जलील यांनी
केली.
****
ज्या
सामान्य जनतेनं इंग्रजांना घरी पाठवलं, तीच जनता, देशाचे मालक समजणाऱ्यांनाही घरी पाठवल्या
शिवाय राहणार नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुनर्बांधणीच्या निमित्ताने पवार
आज धुळे दौऱ्यावर आले असता, बोलत होते. सत्ताधारी लोक आपण देशाचे मालक आहोत अशा पद्धतीने
वागत आहेत हे योग्य नाही असं ते म्हणाले. सत्तेचा गैरवापर वाढतच चालला आहे. जिल्ह्यातल्या
प्रत्येक तालुक्यात जावून शेवटच्या घटका पर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत
करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात केलेल्या विधानाचा विविध मान्यवरांनी
निषेध केला आहे.
महाराष्ट्राच्या
विकासात आणि आर्थिक वाटचालीत मराठी माणसाचंच योगदान सर्वात मोठं योगदान असून, राज्यपालांच्या
या विधानाशी सहमत नसल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
ते आज दोंडाईचा इथं बोलत होते. राज्यपालांचे वक्तव्य हे तत्कालीन स्थितीवरून असल्याचं
सांगताना, राज्यपालांच्या मनात मराठी माणसाबद्दल आदर असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं
आहे.
माजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी,
असं म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची ओळख जगाला
आहे पण विद्यमान राज्यपालांना नाही याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यपालांचं
हे वक्तव्य दुर्दैवी स्वरूपाचं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी केली. ते आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान,
राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड इथं महात्मा फुले पुतळ्यासमोर राष्ट्रवादी
युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
****
शिवसेनेचे
ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज जालना इथं
पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनं,
परिवारासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जालन्यातल्या साखर कारखान्याविरोधात
ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही, मात्र शेतकऱ्यांसाठी,
हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं
आहे. त्यामुळे आपण त्यांना समर्थन जाहीर करत असल्याचं खोतकर यांनी सांगितलं. आजपर्यंत
पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करत आलो असल्याचं सांगून जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचे त्यांनी
आभार मानले. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट झाल्याचं खोतकर
यांनी सांगितलं.
****
विरोधी
पक्ष नेते अजित पवार यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरूंदा, कौठा
तसंच कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे
झालेल्या नुकसानाची पाहणी केली. दुपारनंतर नांदेड जिल्ह्यातही ते नुकसानाची पाहणी करणार
असल्याचं वृत्त आहे.
****
साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परवा एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात दुपारी साडेबारा वाजता विशेष व्याख्यानाचं
अयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूर महाविद्यालयातले प्राध्यापक दुडुकनाळे
राजेश्वर हे अण्णा भाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर व्याख्यान देतील.
दरम्यान,
औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाचा एकशे दोनावा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन
आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एक ते तीन ऑगस्ट
दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते,
लोकमान्य टिळक यांचं चरित्र ग्रंथ आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ ठेवणार
असल्याची माहिती बलवंत वाचनालयाचे अध्यक्ष विपीनकुमार बाकलीवाल यांनी दिली.
****
आत्ताच
हाती आलेल्या बातमीनुसार गुरुराजा पुजारी याने भारोत्तोला प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा
स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
****
No comments:
Post a Comment