Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 29 July 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक अधिसूचनेत ओबीसी आरक्षणाबाबत बदल केल्याबद्दल
सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
· तरुणांना १७ व्या वर्षी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येणार
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे २ हजार २०३ रुग्ण;मराठवाड्यात १२७ बाधित
· औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना तसंच बीड जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर
अणि
· चेन्नईत बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेला तर इंग्लंडमध्ये राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेला
प्रारंभ
****
सविस्तर बातम्या
राज्यातल्या ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्ग - ओबीसी आरक्षणाबाबत
आधी जारी केलेल्या अधिसूचनेत बदल केल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक
आयोगावर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाद्वारे ओबीसी आरक्षणाला परवानगी मिळण्यापूर्वीच,
३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यावेळी
या जागांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होतील, असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं
होतं. त्यामुळे, या आदेशाचं पालन झालं नाही तर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल संबंधित
अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
****
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा सर्वोच्च न्यायलयानं फेरविचार करावा,
अशी याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा
करुन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करु, असंही त्यांनी सांगितलं.
****
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि पंचायतीच्या निवडणुकाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या
निर्णयाबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ
यांनी दिली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्य सरकार आणि निवडणूक
आयोगानं फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणीही भुजबळ यांनी केली.
****
तरुणांना आता वयाच्या १७ व्या वर्षी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता
येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक
अधिकारी तसंच इतरांना, अशा नोंदणीसाठी आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले. या निर्णयानुसार
आता मतदार याद्या दर तिमाहीला अद्ययावत केली जाणार आहे. त्यामुळे वयाची १८ वर्ष पूर्ण
करणाऱ्या तरुणांना नावनोंदणीसाठी पुढच्या एक जानेवारीपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता
नाही. जे तरुण पुढच्या वर्षी एक एप्रिल, एक जुलै किंवा एक ऑक्टोबरला वयाची १८ वर्ष
पूर्ण करत असतील, ते या वर्षी नऊ नोव्हेंबरपासून मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आगाऊ
अर्ज करू शकतील. या बदलामुळे तरुणांना वयाची १८ वर्ष पूर्ण होताच, आपला मतदानाचा हक्क
बजावता येणार आहे.
****
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेत काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काल लोकसभेत प्रचंड
गदारोळ झाला. या तसंच इतर मुद्द्यांवरून सतत गोंधळ होत राहिल्यानं संसदेच्या दोन्ही
सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या मुद्द्यावर माफी मागावी अशी
मागणी सत्ताधारी पक्षानं संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली. काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी
यावर आक्षेप घेत, या मुद्याला वेगळं वळण दिलं जात असल्याचं सांगत घोषणाबाजी केली.
दरम्यान, राज्यसभेत कामकाजादरम्यान गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे सुशील
गुप्ता, संदीप पाठक यांना या आठवड्यातल्या उर्वरित दिवसांसाठी म्हणजे आजच्या दिवसापुरतं
निलंबित करण्यात आलं आहे.
****
पावसामुळे नुकसान झालेल्या
ठिकाणी तत्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेतले
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. त्यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त
भागाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
परभणी, लातूर तसंच चंद्रपूर, अकोला अशा काही राज्यातल्या महापालिका आहेत ज्यांची
आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही. तिथं अतिक्रमणांमुळे अस्वच्छतेची समस्या वाढत
आहे. राजकारण न आणता या समस्या दूर केल्या जाव्यात, असंही पवार यावेळी म्हणाले.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८ ते ५९ वयोगटाच्या नागरिकांना
कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस केंद्र सरकारतर्फे मोफत दिला जात आहे. बीड जिल्ह्यातल्या
वडवणी इथले शिक्षक कमलाकर भोसले यांनी नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं,
ते म्हणाले...
Byte Kamlakar Bhosle…
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २ हजार २०३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ४१ हजार ५२२ झाली आहे. काल या संसर्गानं तीन रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार ०९१ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल २ हजार
४७८ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, आतापर्यंत ७८ लाख ७९ हजार ७६६ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात
सध्या १३ हजार ६६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १२७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
५२, औरंगाबाद २२, लातूर २१, तर बीड आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी १६ रुग्णांचा
समावेश आहे.
****
औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना तसंच बीड जिल्हा परिषदेसाठी काल आरक्षण सोडत काढण्यात
आली.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ७० गटांपैकी ३५ गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. जिल्ह्यातले
नऊ गट अनुसूचित जातीसाठी, चार गट अनुसूचीत जमातींसाठी, इतर मागास प्रवर्गासाठी १८ तर
सर्वसाधारण गटासाठी ३९ गट आरक्षित झाले आहेत. आरक्षणाचे प्रारुप आज प्रसिद्ध करण्यात
येणार आहे. तसंच आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी आजपासून दोन ऑगस्ट
पर्यंत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ६१ गटांपैकी ३१ गट महिलांसाठी राखीव आहेत. दहा गट
अनुसूचित जातीसाठी, १६ गट इतर मागास प्रवर्गासाठी, एक गट अनुसूचित जमातीसाठी, तर सर्वसाधारण
प्रवर्गातल्या महिला आणि पुरुषांसाठी ३४ गट असतील.
जालना जिल्ह्यात ६३ गटांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३६ जागा, विशेष मागास
प्रवर्गासाठी १७, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आठ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन
जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात महिला प्रवर्गासाठी एकूण ५०
टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या ६९ गटांपैकी ९ गट अनुसूचीत जातीसाठी, १८ इतर मागास प्रवर्गासाठी,
२१ गट सर्वसाधारण महिला तर सर्वसाधारण पुरूषासाठी २० गट राखीव ठेवण्यात आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या आरक्षण निश्चितीबाबतच्या हरकती आणि सूचना
संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्याकडे आजपासून १ ऑगस्टला दुपारी ३ वाजेपर्यंत
लेखी सादर करता येणार आहेत. मुदतीनंतर आलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार
नसल्याचं जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी कळवलं आहे.
****
'घरोघरी तिरंगा' उपक्रमांतर्गत नागरिकांना योग्य दरामध्ये झेंडा विकत घेता यावा
यादृष्टीने जालना जिल्ह्यात झेंडा विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या तिरंगा झेंडा विक्री केंद्राचा शुभारंभ
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आला. या केंद्रात नागरिकांना
३० रुपयांत एक झेंडा मिळणार आहे.
****
खेळांमध्ये सामाजिक एकता आणि समरसता साधण्याची प्रचंड आंतरिक शक्ती असते, म्हणूनच
खेळांना प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. काल चेन्नईत, चव्वेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचं उद्घाटन केल्यानंतर
पंतप्रधान बोलत होते. युवावर्गाची उर्जा आणि त्यांना सक्षम करणारं वातावरण यांचा योग्य
मिलाफ साधल्यानं भारतातली क्रीडा संस्कृती अधिकाधिक सशक्त होत असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यासह
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील बुद्धिबळपटू यावेळी उपस्थित होते.
अनुराग ठाकूर यांनी यावेळी बोलतांना, गेल्या काही महिन्यांच्या काळात खेलो इंडिया
युवा स्पर्धा आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांचं अत्यंत यशस्वी आयोजन केल्याचं नमूद
केलं.
****
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा काल बर्मिंगहॅम इथं पार पडला.
पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यांनी
उद्घाटन सोहळ्यातल्या पथसंचलनात भारतीय संघाचं नेतृत्व केलं. भारताच्या २१५ खेळाडूंचा
संघ या स्पर्धेच्या १५ प्रकारांमध्ये सहभागी झाला आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सुरू
होत आहे. भारतानं नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजवर
तीन शून्य असा विजय मिळवला आहे.
****
इंडोनेशिया इथं होणाऱ्या आशियाई रग्बी सेव्हन एस २०२२ या स्पर्धेसाठी, कोल्हापूरच्या
वैष्णवी दत्तात्रय पाटील हिची भारतीय वरिष्ठ गट महिला संघामध्ये निवड झाली आहे. जकार्ता
इथं ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये काल दुपारपासून
कपात करण्यात आली. धरणाची अठरा दारं दीड फुटावरून आता एका फुटावर स्थिर करण्यात आली
आहेत. सध्या धरणातून १८ हजार ८६४, तर जलविद्युत केंद्रातून एक हजार पाचशे ८९, असं एकूण
२० हजार ४५३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
No comments:
Post a Comment