Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६
जुलै २०२२ दुपारी १.०० वा.
****
विविध मुद्यांवरुन
विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आजही बाधित झालं.
राज्यसभेत
कामकाज सुरु होताच महागाई आणि इतर मुद्यावरुन विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती
एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या
सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं
कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं. लोकसभेतही विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे
कामकाज सुरवातीला काही वेळसाठी आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
****
शिंदे गटाच्या
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगानं स्वतःहून कारवाई करू नये,
अशी मागणी करणारी उद्धव ठाकरे गटाची याचिका, सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे.
यासंदर्भातल्या इतर याचिकांसोबत या याचिकेवर एक ऑगस्टला सुनावणी होणार असल्याचं, वृत्तसंस्थेच्या
बातमीत म्हटलं आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी शिंदे
गटानं निवडणूक आयोगाकडे केली आहे, त्यावर उद्धव ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे.
****
फाईव्ह जी
स्पेक्ट्रम लिलावाला आजपासून सुरुवात झाली. रिलायन्स जिओ, अदानी ग्रूप, भारती एअरटेल,
आणि वोडाफोन आयडिया या चार मोठ्या कंपन्या या लिलावात सहभागी झाल्या आहेत. २० वर्षांच्या
मुदतीसाठी ७२ हजार मेगा हर्ट्झ क्षमतेचा स्पेक्ट्रम लीलावासाठी ठेवण्यात आला असून,
विविध कमी, मध्यम आणि उच्च फ्रीक्वेन्सीच्या स्पेक्ट्रमसाठी हा लीलाव होईल.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३० लाख ४२ हजार
४७६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०२ कोटी ५० लाख ५७ हजार ७१७
मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या १४ हजार ८३० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३६ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १८ हजार १५९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ४७
हजार ५१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
करगिल विजय
दिवस आज साजरा होत आहे. १९९९ मध्ये ६० दिवसांपेक्षा अधिक चाललेल्या करगील युद्धात भारतीय
सैन्यानं मिळवलेल्या विजयाचं स्मरण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त उस्मानाबाद
इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. युवा मोर्चाचे
जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ चौकापासून काढण्यात
आलेल्या या पदयात्रेत विद्यार्थी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी
झाले होते. हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्प हार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात
आला.
****
औरंगाबाद,
लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, आणि नांदेड-वाघाळा
या महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या येत्या
१३ ऑगस्टला प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर २२ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता
येतील, असं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
****
आझादी का
अमृत महोत्सवाअंतर्गत जालना जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट १५ ऑगस्टपर्यंत
पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. काल या संदर्भात झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. यावर्षात जिल्ह्याला ८२ लक्ष ५५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
देण्यात आले असून, ८९ लक्ष वृक्ष लागवडीचं नियोजन करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारत आणि
वेस्ट इंडीज यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना उद्या
खेळला जाणार आहे. मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी
घेतली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका होणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे
१८ दरवाजे एका फुटाने उघडून नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत
आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ५०० आणि जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा ९१ टक्क्याच्या वर गेला असून, धरणात
सध्या ३१ हजार ८५१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे. सोडण्यात आलेला विसर्ग
मोठ्या प्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील नागरिकांनी
सतर्क रहावे, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हवामान
राज्यात
येत्या आठवडाभर कोकण आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
तर येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार
पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment