Friday, 29 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.07.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 July 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे, संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवार एक ऑगस्ट सकाळी अकरा वाजे पर्यंत स्थगित झालं.

लोकसभेत कामकाज सुरु होताच अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध करत सत्ताधारी पक्षानं घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर विरोधी पक्षांनी सुद्धा विविध मुद्दे उपस्थित करत, फलक झळकावत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. राज्यसभेतही काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी फलक झळकावत घोषणाबाजी केल्यानं कामकाज स्थगित झालं.

****

आज जागतिक व्याघ्र दिन आहे. वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचं रक्षण करण्यासाठी जागतिक प्रणालीला प्रोत्साहन देणं आणि व्याघ्र संवर्धनाबाबत जनजागृती आणि समर्थन करणं हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे २०१४ पासून २०१९ पर्यंत देशात वाघांची संख्या दुप्पट झाली असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. व्याघ्र अभयारण्यांची संख्या ५२ झाली असून, सध्या देशात दोन हजार ९६७ वाघ आहेत, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. 

दरम्यान, व्याघ्र दिनानिमित्त राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण तसंच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीनं चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीमध्ये कार्यक्रम होत असून, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, यांच्यासह लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित आहेत. तत्पूर्वी यादव यांनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३८ लाख ६३ हजार ९६० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०३ कोटी ६० लाख ४६ हजार ३०७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २० हजार ४०९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २२ हजार ६९७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ४३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरु म्हणून डॉ. अपूर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं ही नियुक्ती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोवेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस विभागाच्या संचालक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पालकर यांच्या कारकीर्दीत  विद्यापीठाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था तसंच विद्यापीठांशी संशोधन आणि स्टार्टअप या विषयावर सामंजस्य करार केले आहेत.

****

बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत आज दुपारी साडे तीन वाजता भारतीय महिला क्रिकेट संघाचा साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. साडे सहा वाजता महिला हॉकी संघाची घाना विरुद्ध लढत होणार असून, बॅडमिंटन मिश्र दुहेरीत भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. याशिवाय मुष्टीयुद्ध, टेबल टेनिस, जलतरण, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, ट्रायथलॉन आणि स्कॅश या खेळांमध्ये देखील भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजवर तीन शून्य असा विजय मिळवला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे करण्यात येणाऱ्या विसर्गात आज कपात करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता धरणाची १८ दारं एक फुट उंचीवरुन अर्ध्याफुटावर स्थिर करुन गोदावरी नदी पात्रात आता नऊ हजार ४३२ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. सध्या जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्याद्वारे ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातलं ईसापूर धरण ९० टक्के भरलं आहे. काल सायंकाळी धरणाची दोन दारं सुमारे पाऊण फूट उघडून, एक हजार २९५ घनफूट प्रतिसेंकद वेगानं पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातल्या उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पात ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कुंडलिका नदीपात्रात केव्हाही पाणी सोडलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवर वडवणी आणि धारूर तालुक्यातल्या नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा, बीड पाटबंधारे विभागानं दिला आहे.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

****

No comments: