Sunday, 24 July 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जुलै २०२२ दुपारी १.०० वा.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 July 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

अमेरिकेत ओरेगॉन इथं सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज रौप्यपदक पटकावलं. नीरज चोप्रानं ८८ पूर्णांक १३ मीटर भालाफेक करत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं.  अंजू बॉबी जॉर्जनं २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडी कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०पूर्णांक ५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल नीरजचं अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नीरजचा हा ऐतिहासिक विजय असून भारतीय क्रीडा विश्वाचा हा मोठा गौरव असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. त्यांनी आगामी स्पर्धांसाठी नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

केंद्र सरकारनं भारतीय ध्वज संहितेत दुरुस्ती केली असून मोकळ्या जागा आणि घरांवर रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी दिली आहे. या आधी मोकळ्या जागेत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावण्यामान्यता होती.

मात्र आता कुठलाही भारतीय नागरिक राष्ट्रध्वजाचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी तिरंगा फडकवू शकतो. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं त्या आधीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा या मोहिमेद्वारे राष्ट्रध्वजासोबत आपलं नातं अधिक दृढ होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे.

****

जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्स संक्रमणाला जागतिक आरोग्य आपत्ती म्हणून घोषित केलं आहे. मंकीपॉक्स या विषयावर संघटनेच्या आपत्ती समितीच्या दुसऱ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ७५ देशांमधले १६ हजारांहून अधिक लोक मंकीपॉक्स संक्रमणाला बळी पडले असून आतापर्यंत ५ जणांचा यामुळे मृत्यु झाला आहे अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक डॉक्टर टेड्रोस एडानॉम गैब्रेयासिस यांनी या बैठकीत दिली. मंकीपॉक्स व्यतिरिक्त जगभरात सध्या कोविड महामारी आणि पोलिओ हे २ आपत्तीजन्य रोग असून  त्यांच्या उच्चाटनासाठी संघटनेचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २८ लाख ८३ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ९९ लाखांहून अधिक नागरिकांना मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या २० हजारांहून अधिक कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३६  रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १८ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ५२ हजार २०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारनं आतापर्यंत १९४ कोटी १७ लाखांहून अधिक नि;शुल्क मात्रा उपलब्ध करुन दिल्या असून यापैकी ७ कोटी १ लाखांहून अधिक मात्रा राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागानं २०२१ आणि २०२२ या वर्षाच्या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांसाठी २८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. www.awards.gov.in या पुरस्कार पोर्टलवर हे अर्ज पाठवायचे आहेत. यासंबंधीची जाहिरात विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****

आज आयकर दिन आहे. भारतात आयकर प्रणालीला १५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर २०१० पासून आयकर दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. १८६० मध्ये पहिल्यांदा एका शुल्काच्या रुपात आयकर लावण्यात आला आणि त्याच वर्षी २४ जुलै ला आयकर प्राधिकरण स्थापण्यात आलं.  आयकर भरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आजच्या दिवशी अनेक जनसंपर्क कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं.

****

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरु आहे. सलग तीन दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे  अंतरमशागतीची कामे रखडली आहेत.

****

No comments: