Sunday, 24 July 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.07.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  24 July  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जुलै २०२   सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण; संध्याकाळी देशाला उद्देशून निरोपाचं भाषण.

·      पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळे फेरी विक्रेत्यांना मोठा आधार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      उदयपूर तसंच अमरावती हत्या प्रकरणांच्या निषेधात सकल हिंदू समाजाचा औरंगाबाद इथं मूक मोर्चा.

·      लातूर जिल्ह्यात नागरी सहभागातून मांजरा नदीच्या दहा किलोमीटर काठालगत वृक्ष लागवड.

आणि

·      जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्यपदक.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं आकाशवाणीवरुन थेट प्रसारण केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू या उद्या सकाळी दिल्लीत संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतिपदाची शपथ घेतील. त्यानंतर नवनिवार्चित राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.

****

कोरोना काळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यांना पंतप्रधान स्वनिधी योजनेमुळं मोठा आधार मिळाला. अनेक लोकांचे संसार वाचले आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत झाली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं डोंबिवली इथं पथ विक्रेत्यांसाठी स्वनिधी महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवात एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. यावेळी बोलताना, राज्य शासन लवकरच पुढील शंभर दिवसाचा कार्यक्रम तयार करणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध आठ योजनेमुळे अनेक लोकांना लाभ झाला असून सर्वसामान्यांचं जीवन सुरक्षित करण्याचं काम विमा योजनेमुळं झालं असल्याचं नमूद केलं.

****

खासदार प्रतापराव जाधव यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केल्याचं, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तसं पत्रही लोकसभा अध्यक्षांना देण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या विविध तालुकाप्रमुखांचीही शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २८ लाख ८३ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ९९ लाखांहून अधिक नागरिकांना मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

ई -विवरणपत्र सादर करण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ, सोपी आणि अद्ययावत झाली आहे. ई-विवरणपत्र सादर करण्यासाठी 'इन्कम टॅक्स डॉट जीओव्ही डॉट इन' या नव्या पोर्टलची सुरूवात करण्यात आली असून त्यात करदात्यांच्या सोयीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यावर भर देण्यात आला आहे.

****

उदयपूर, अमरावती तसंच देशातील विविध भागात झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथं सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. पैठण गेट इथून निघालेला हा मोर्चा टिळकपथ, गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक परिसरात विसर्जित झाला. भर पावसाताही हिंदू समाज बांधव, विशेषत: महिला आणि युवक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. विविध संस्था, संघटना, समाज, पंथ, राजकीय पक्ष, तसंच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दंडावर काळ्या फीती बांधून उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभाग घेतला. औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर नामंतराचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने पारीत केल्याबद्दल मोर्चात सहभागी संत महंतांनी आनंद व्यक्त केला. शासन स्तरावर उर्वरीत प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.

****

लातूर जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून आज मांजरा नदीच्या दहा किलो मीटर काठालगत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्ष लागवड मोहिमेचं औपचारिक उदघाटन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या चौदा गावात १० किलोमीटरची मानवी साखळी, करून २८ हजार वृक्षाची लागवड यावेळी करण्यात आली. यानिमित्ताने वृक्षदिंडीही काढण्यात आली. कार्यक्रमात शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

****

अमेरिकेत ओरेगॉन इथं सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज रौप्यपदक पटकावलं. नीरज चोप्रानं ८८ पूर्णांक १३ मीटर भालाफेक करत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. अंजू बॉबी जॉर्जनं २००३ मध्ये जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत लांब उडीत कांस्यपदक जिंकल्यानंतर या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज हा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या यशाबद्दल नीरजने सर्वांनी दिलेल्या सहकार्याने ही कामगिरी करू शकल्याची भावना व्यक्त केली. यापुढे अधिक चांगली कामगिरी करण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. तो म्हणाला –

 

बहोत अच्छा लग रहा है आज सिल्व्हर जीता है देश के लिये। और अभी अगले साल फिर हमारी वर्ल्ड चॅम्पियनशिप मे कोशिश करेंगे की वहां पर इससे बेहतर करें। और बहोत बहोत थँक यू करता हूं साई का, फेडरेशन का और हमारी गव्हर्नमेंट का, जिन्होंने मुझे इतना सपोर्ट किया और बाहर ट्रेनिंग के लिए भेजा है और जिससे मै हर कॉम्पिटीशन खेल सकता हूं बाहर के जो इंटरनॅशनल कॉम्पिटीशन होते है। और आशा करता हूं की ऐसे ही हर स्पोर्ट मे हमको सपोर्ट मिलता रहेगा। और हमारा देश तरक्की करेगा स्पोर्ट्‌स मे।

 

या स्पर्धेत ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९० पूर्णांक ५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं. भारताचा अन्य एक भालाफेकपटू रोहित यादव ७८ पूर्णांक ७२ मीटर अंतरावर भाला फेकून दहाव्या स्थानावर राहिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल नीरजचं अभिनंदन करत आगामी स्पर्धांसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. नीरजचा हा ऐतिहासिक विजय असून भारतीय क्रीडा विश्वाचा हा मोठा गौरव असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनीही नीरजचं अभिनंदन केलं आहे.

****

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज त्रिनिदादमध्ये खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे.

****

भागवत धर्माची पताका देशभर पोहोचवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं आज कामिका एकादशी अर्थात परतवारी निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटे चार वाजता शासकीय महापूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. कोरोना विषाणूच्या संकटानंतर प्रथमच परतवारी निर्बंधमुक्त झाल्यानं भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

पंढरपूरच्या आषाढी वारीहून परतीच्या मार्गावर असलेल्या शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं आज जालना शहरात आगमन झालं. आज आणि उद्या पालखीचा शहरात मुक्काम असून परवा पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ होणार आहे.

दरम्यान, आज कामिका एकादशी पर्वावर संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरहून पैठणला पोहचणार असल्यानं हजारो भाविकांनी पैठणला नाथ पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

****

राज्य परिवहन महामंडळ -एसटीची सोलापूर -गाणगापूर बस आज अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर एका शेतालगत उलटली. या अपघातात १५ ते २० प्रवासी जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दुखापतग्रस्त किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. शासकीय खर्चानं जखमी रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी केल्या आहेत.

****

राज्यात शिक्षक भरती तत्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज औरंगाबाद इथं या संदर्भात पत्रकार परिषदत घेतली. शासनानं शिक्षकांच्या जागा राज्य सेवा आयोग -एमपीएसीसी द्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एमपीएससीद्वारे ही भरती प्रक्रिया राबवण्याला विलंब होणार असल्यानं शासनानं तातडीनं शिक्षक भरती करण्याची मागणी माजी आमदार विजय गव्हाणे यांनी यावेळी केली.

****

No comments: