Sunday, 24 July 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.07.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जुलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

अमेरिकेत ओरेगॉन इथं सुरू असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज रौप्यपदक पटकावलं. नीरजनं चौथ्या प्रयत्नात, ८८ मीटर १३ सेंटीमीटर अंतरावर भाला फेकला. ९० मीटर ५४ सेंटीमीटर अंतरावर भालाफेक करुन ग्रेनाडाच्या एंडर्सन पीटर्सनं या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं तर चेक गणराज्यच्या याकुब वालेचनं ८८ मीटर ९ सेंटीमीटर अंतरावर भालाफेक करत कांस्य पदक पटकावलं.

****

भारतीय ध्वज संहितेत संशोधन करत मोकळ्या जागा आणि घरांवर राष्ट्रध्वज फडकावण्यास केंद्रसरकारनं परवानगी दिली आहे. या आधी मोकळ्या जागेत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावण्यासाठी मान्यता होती. मात्र, आता कुठलाही भारतीय नागरिक राष्ट्रध्वजाचा गौरव आणि सन्मान करण्यासाठी तिरंगा फडकवू शकतो. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं त्या आधीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

****

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरूद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या दोनशे ५९ कोटी रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं.आंदोलनावेळी रेल्वेच्या सेवांमध्ये बाधा आल्यामुळं गेल्या जून महिन्यात रद्द झालेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांच्या तिकिटांचे एकशे तीन कोटी रूपये नागरिकांना परत केले असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या शिवसेनेच्या सध्याच्या दुरावस्थेला केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना आणि भाजप दरम्यान सत्तेसाठी कधीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं सूत्र बनलं नव्हतं असं राज ठाकरे म्हणाले. काल ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपण ही केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळेच शिवसेनेपासून वेगळे झालो असं ही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

 

//*********//

 

 

No comments: