Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 July 2022
Time
7.10 AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· देशानं पुढच्या २५ वर्षात 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' मार्गांवर वाटचाल करणं
आवश्यक- नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
· लोकसभेत गदारोळ करणारे काँग्रेसचे चार खासदार निलंबित
· आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगानं कारवाई करण्यास मनाई
करण्याची मागणी करणारी याचिका उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे ७८५ रुग्ण, मराठवाड्यात ५७ बाधित, औरंगाबाद जिल्ह्यातल्या
दोन रुग्णांचा मृत्यू
· पैठणच्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले, साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग
आणि
· शैक्षणिक सुविधांचा अभाव असणाऱ्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील पाच महाविद्यालयांवर
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यावर विद्यापीठ प्रशासनाची
बंदी
सविस्तर बातम्या
पुढच्या २५ वर्षात 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या मार्गांवर वाटचाल करणं आवश्यक
असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. देशाच्या १५व्या राष्ट्रपती
म्हणून संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल सकाळी शपथ घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमणा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. आपल्या सारख्या
आदिवासी महिलेला नगरसेवकापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली, ही लोकशाहीची
ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारतातली गरीब व्यक्ती स्वप्न पाहू शकते आणि ते पूर्णही
करु शकते, हाच याचा अर्थ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. आजच्या कारगील विजय दिनानिमित्त
सैन्य दलांना आणि सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
६४ व्या वर्षी राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आतापर्यंतच्या
सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या पहिल्याच
राष्ट्रपती आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना २१ तोफांची सलामी
देण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनातल्या आपल्या कार्यालयात जाऊन माजी राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्याकडून पदभार स्वीकारला.
****
लोकसभेत गदारोळ करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात
आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी ही कारवाई आहे.
काल सकाळी कामकाजाला सुरुवात होताच, हातात फलक घेऊन या सदस्यांनी महागाई आणि
इतर मुद्यांवरून घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी तीन वाजेनंतर
या विषयावर चर्चा घेण्यास तयार असल्याचं सांगूनही गदारोळ थांबला नाही, संसदीय कामकाज
मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या सदस्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार मणिकम टागोर,
जोतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन या चौघांना अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी
निलंबित करण्यात आलं आहे .
****
महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण विभागानं घेतलेल्या निर्णयांचं आणि
कामकाजाचं केंद्र सरकारकडून लेखापरीक्षण केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई मुख्यालयाबरोबर
औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, ठाणे, आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय
लेखापरीक्षण सुरू करण्यात आलं आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचंही
लेखापरीक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे या
खात्याचे मंत्री होते.
****
शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगानं स्वतःहून
कारवाई करू नये, अशी याचिका उद्धव ठाकरे गटाने काल सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.
शिंदे गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी याचिकेत
करण्यात आली आहे. शिंदे गट हीच खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी शिंदे गटानं
निवडणूक आयोगाकडे केली आहे.
****
केंद्रातल्या महत्त्वपूर्ण खात्यांत आणि संस्थांमधे महत्त्वाची पदं देण्याचा
बनाव रचून अनेक जणांना आर्थिक गंडा घालणाऱ्या चार जणांना केंद्रीय अन्वेषण विभाग -
सीबीआयनं अटक केली आहे. या चार आरोपींपैकी एक जण लातूरचा असून, कमलाकर प्रमकुमार बंडगर
असं त्याचं नाव आहे. तर इतर तीन जण दिल्ली, गाझियाबाद आणि बेळगावचे आहेत. लातूरच्या
या इसमानं, आपण सीबीआयमधले उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा बनाव रचून अनेक व्यक्तींना राज्यसभेची
उमेदवारी, विविध केंद्रीय संस्थांमध्ये लाभाची पदं मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांची
फसवणूक केली, असं सीबीआयच्या प्रसिद्धी पत्रकात
म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं, कोविड
प्रतिबंधक खबरदारीची लस मात्रा ७५ दिवस मोफत देण्याची मोहिम १५ जुलैपासून सुरु केली
आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मुकुंदवाडी आरोग्य केंद्रात कार्यरत आशा कार्यकर्त्यांनी
नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे.
Byte’s
मी मधुमती जगताप, आशा वर्कर बोलते. मी दोन डोस घेतलेले आहेत. तिसरा पण आज घेत आहे. कोविडपासून
बचावासाठी तिसरा डोस घेणे
जरूरी आहे.
मी मीना केदारे, मुकुंदवाडी
आरोग्य केंद्र, आशा वर्कर. अमृत
महोत्सव वर्षानिमित्त
आपल्याला बुस्टर डोस हा १५ जुलैपासून ७५ दिवस १८ वर्षावरील सर्वांना हा डोस मोफत आहे. मी पण
घेतलेला आहे. प्रिकॉशन डोस सगळ्यांनी घ्यावा, एवढी मी विनंती करते.
माझं नाव सुनिता प्रदीप नवगिरे. मी आशा सुपरवायजर आहे. आणि मी आगोदरचे दोन
डोस घेतलेले आहेत, त्याच्यानंतर प्रिकॉशन म्हणून तिसरा बुस्टर पण घेतलेला आहे. आणि
तुम्ही पण सर्वांनी डोस घ्यावा, आणि आपलं स्वत:चं रक्षण करावं, असं मी सर्वांना
आवाहन करते.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७८५ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ३५ हजार ४६ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात
सहा रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, एक लाख ४८ हजार ६८ एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल
९३७ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ७२ हजार ४४४ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
१४ हजार ५३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या
दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यात २० रुग्ण आढळले. उस्मानाबाद
१९, औरंगाबाद १४, तर बीड जिल्ह्यात चार नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याची विशेष मोहीम एक ऑगस्ट पासून
सुरू होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी काल पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना अर्ज क्रमांक
सहा ब भरायचा आहे. हा अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये, भारत निवडणूक आयोगाच्या
संकेतस्थळांवर तसंच ॲपवरही उपलब्ध असणार आहे.
आधार क्रमांक सादर करता आला नाही, तरीही कोणत्याही मतदाराचं नाव मतदार यादीतून वगळण्यात
येणार नाही, असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं
आहे .
****
विदर्भ तसंच मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची
मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना आपण या मागणीचं पत्र लिहीलं असल्याचं, पवार यांनी काल पत्रकार
परिषदेत सांगितलं. ते म्हणाले...
Byte….
मी मुख्यमंत्र्यांना विरोधी
पक्षनेता या नात्याने आमच्याकडनं पत्र दिलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या
इतर भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करा. सततच्या पावसामुळे पंचनामे
अजूनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत आहे. आणि
त्याच्यातनं शेतकऱ्यांना कुठलाही प्रकारचा दिलासा मिळत नाही. त्याच्यामुळे तातडीनं
दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. त्याला तिथं मदत दिली
गेली पाहिजे. आणि नेहमीच्या एस डी आर एफच्या नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे मदत करून चालणार
नाही.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तातडीनं विधीमंडळाचं अधिवेशन बोलवण्याची मागणीही
अजित पवार यांनी केली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना विधानसभेत लोकप्रतिनिधींच्या चर्चेतून
योग्य ती मदत तत्काळ करता येईल असंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या नाथसागरातला पाणीसाठा
९० पूर्णांक ५६ शतांश टक्क्यांवर पोहोचल्यामुळे, काल सायंकाळपासून धरणाचे १८ दरवाजे
अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू करण्यात आला. धरणाचा उजवा कालवा, तसंच जलविद्युत प्रकल्पातून अनुक्रमे ५०० घनफूट
आणि एक हजार ५२९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी याआधीच सोडलेलं आहे. त्यामुळे सध्या धरणातून ११ हजार ५२१ घनफूट
प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विर्सग सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल सायंकाळपर्यंत धरणात २८ हजार ३२० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गंगापूर
धरणातून गोदावरी नदी पात्रात गेल्या चौदा दिवसांपासून सुरु असलेला पाण्याचा विसर्ग
काल थांबवण्यात आला.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेसाठी उस्मानाबाद
तालुक्यातल्या कनगरा इथल्या एनपीके महिला उत्पादक गटानं, शिवण यंत्रावर तिरंगा ध्वज
तयार करण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने एक लाख
तिरंगा ध्वज निर्मितीचा गटाचा प्रयत्न आहे.
****
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनानं पायाभूत,
भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव असणाऱ्या पाच महाविद्यालयांवर कारवाई केली आहे.
आवश्यक पायाभूत सुविधा नसल्यानं विनाअनुदानित पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अनेक तुकड्यांना २०२२-२३ या शैक्षणिक
वर्षात प्रवेश देऊ नये, असे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. याशिवाय
प्रत्येक महाविद्यालयाला दोन लाख रुपयांचा दंडही केला आहे. थेट कारवाई करण्यात आलेल्या
या महाविद्यालयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्याच्या खुलताबाद इथल्या चिश्तिया कला महाविद्यालय,
सोयगाव तालुक्यातल्या फर्दापूर धनवट इथल्या राजकुंवर महाविद्यालय, जालना जिल्ह्याच्या
बदनापूर इथल्या कला, वाणिज्य आणि विद्यान महाविद्यालय, भोकरदन इथलं संगणक आणि व्यवस्थापन
महाविद्यालय आणि धावडा इथल्या राजकुंवर महाविद्यालयाचा समावेश आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा आणि वाङ्गमय विभागाच्या
वतीनं शब्दोत्सव हा कार्यक्रम काल घेण्यात आला. प्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या हस्ते
या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. भाषा ही प्रवाही असते, मराठी भाषेने इतर भाषेतले असंख्य
शब्द सामावून घेतले आहेत, त्यामुळे मराठी भाषा ही समृद्धच झाली असल्याचं मत, पुरी यांनी
यावेळी व्यक्त केलं.
****
No comments:
Post a Comment