Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 01 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०१ जानेवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
****
·
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या
वर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत
·
नवी एकीकृत खाद्य सुरक्षा योजना
आजपासून देशभरात लागू
·
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे
औषध खर्चात १८ हजार कोटी रुपयांची बचत
·
टपाल कार्यालयातल्या विविध अल्पबचत
योजनांवरच्या व्याज दरात वाढ
·
औरंगाबाद पासपोर्ट सेवा केंद्र
ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड होणार
आणि
·
सिल्लोड इथे आजपासून दहा दिवसीय
कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन
****
सविस्तर
बातम्या
****
२०२२ या सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२३ या नव्या वर्षाचं सर्वत्र
जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे, पर्यटन स्थळं,
विविध देवस्थानं, तसंच आवडीच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. काल सूर्यास्तासोबतच
सर्वांना नववर्षाच्या स्वागताचे वेध लागले. मध्यरात्री बाराच्या ठोक्यावर नागरिकांनी
आप्तजनांसह मित्रपरिवाराला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ठिकठिकाणची हॉटेल्स, फूड पॉईंट्स, ढाबे तसंच शहराची मध्यवर्ती ठिकाणं तरुणाईनं फुलून गेली होती. गृहनिर्माण संस्था तसंच नागरी
वसाहत्यांमधून अनेक कुटूंबांनी आपापल्या शेजाऱ्यांसह मेजवानी करून नववर्षाचं स्वागत
केलं. सामाजिक माध्यमांवरूनही काल सायंकाळनंतर
नववर्ष शुभेच्छा संदेशांचा पाऊस सुरू आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे नवीन वर्ष प्रगती आणि भरभराटीचे ठरो, असं
राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशाची एकता, अखंडता आणि सर्वसमावेशक विकासासाठी
स्वत:ला समर्पित करण्याच आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. देशाला
प्रगती आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करून नवीन वर्षाची सुरुवात करण्याचं
आवाहन उपराष्ट्रपतींनी जनतेला केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, हे नववर्ष आशा-आकांक्षा
सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या वर्षात आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध
करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, असं मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
****
नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी
नागरिकांनी राज्यातल्या देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. पंढरपूरचं
विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी
भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
शिर्डीत राज्यासह देशभरातून
भाविक दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी काल रात्रभर साई
मंदिर खुलं ठेवण्यात आलं. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री
शिवराजसिंह चौहान यांनी काल आपल्या कुटुंबीयांसह शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेतलं.
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथंही
भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांचं दर्शन घेण्याकरता भाविकांनी काल सकाळपासूनच
रांग लावल्याचं पाहायला मिळालं.
औरंगाबाद इथं नागरिकांनी जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. शहरातली उपाहारगृहं,
बार आणि हॉटेल्स आज पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.
****
नाशिक इथं शिवनेरी मित्र मंडळ आणि स्वामी सखा मित्र मंडळाच्या वतीने काल रामकुंडावर
मध्यरात्री १२ वाजता सहस्त्र दीप प्रज्वलित करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
मंडळाच्या या उपक्रमाचं हे २१ वं वर्ष आहे.
****
नवी मुंबईत खारघर इथं काल पोलिसांनी छापा मारून सुमारे एक कोटी रुपयांचे अंमली
पदार्थ आणि १६ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला
एका इमारतीत ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे
शाखेनं ही कावाई केली.
****
भीमा - कोरेगाव इथं आज एक जानेवारी रोजी होणाऱ्या
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतूक, आज रात्री १२
वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या
काळात वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश, पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त
विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत. वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत
जाण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
****
केंद्र सरकारची नवी एकीकृत खाद्य सुरक्षा योजना आजपासून देशभरात लागू होणार आहे.
या नव्या योजनेनुसार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियमांतर्गत वर्षभरात ८१ कोटी पेक्षा
अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या योजनेतूनच एक राष्ट्र
एक शिधापत्रिका या योजनेच्या अंमलबजावणीची सुनिश्चिती होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे गेल्या आठ वर्षांत नागरिकांच्या औषधांच्या खर्चात
सुमारे १८ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्रीय खतं आणि रसायन मंत्रालयाकडून
माहिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत नागरिकांनी ७५८ कोटी रुपयांची
औषधं खरेदी केली, त्यातही नागरिकांची सुमारे साडे चार हजार कोटी रुपये बचत झाल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशभरातल्या ७४३ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत नऊ हजारांहून
अधिक जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले असून, २०२५ पर्यंत ही संख्या साडे दहा हजारावर
नेण्याचं उद्दीष्ट असल्याचं केंद्रीय आरोग्य
मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
कॅथलिक चर्चचे माजी पोप बेनेडिक्ट
१६ वे यांचं काल दीर्घ आजारपणामुळे निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. २००५ मध्ये तत्कालीन
पोप जॉन पॉल यांच्या निधनानंतर बेनेडिक्ट यांची पोप पदी निवड झाली होती. आठ वर्षे या
पदावर राहिल्यानंतर त्यांनी आजारपणामुळे पदाचा राजीनामा दिला होता. ६०० वर्षांच्या
इतिहासात पदाचा राजीनामा देणारे ते पहिलेच पोप ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
पोप बेनेडिक्ट यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
चालू आर्थिक वर्षात आजपासून
सुरू होत असलेल्या अखेरच्या तिमाहीपासून केंद्र सरकारने टपाल कार्यालयातल्या विविध
अल्पबचत योजनांवरच्या व्याज दरात वाढ केली आहे. पाच वर्ष मुदतीच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील
व्याजदर ६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांवरून ७ टक्के तर, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील
व्याजदरही ७ पूर्णांक ६ दशांश टक्क्यावरून ८ टक्के इतका झाला आहे. मासिक उत्पन्न बचत
खात्यावरील व्याजदार आता ७ पूर्णांक १ दशांश टक्के इतका करण्यात आला आहे. यासोबतच किसान
विकास पत्रासाठीही आता १२० महिन्यांच्या मुदतीसह ७ पूर्णांक २ दशांश टक्के असा वाढीव
दर लागू करण्यात आला आहे. याचप्रमाणे एक वर्ष मुदतीच्या अल्पबचत ठेवींसाठीचा व्याजदरही
५ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांवरून ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यापर्यंत वाढवला आहे. दरम्यान,
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी खाते आणि बचत ठेवींवरच्या व्याजदरात
मात्र कोणतेही बदल केले नसल्याचं टपाल विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
नागरिकांनी आपला आधार कार्ड
क्रमांक कोणालाही सांगू अथवा देऊ नये, तसंच सार्वजनिकरीत्या तो जाहीर करू नये, आणि
कोणत्याही समाज माध्यमावर त्याबाबत माहिती देऊ नये, असा सल्ला, विशिष्ट ओळख
प्राधिकरणानं दिला आहे. आधार कार्ड धारकांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेला आपला ओ टी
पी देऊ नये, त्याचप्रमाणे एम आधार पिन कोणालाही देण टाळावं, असं आवाहन, इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केलं आहे.
****
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला यांनी अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष
म्हणून काल कार्यभार स्वीकारला. शुक्ला यांची या पदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात
आली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९८० मध्ये पदवी
घेतल्यानंतर शुक्ला यांनी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात काम सुरू केलं. २०१५ मध्ये
ते अणुऊर्जा नियामक मंडळात दाखल झाले. फेब्रुवारी २०२१ मध्ये, शुक्ला सेवानिवृत्त झाले
आहेत.
****
औरंगाबाद इथलं पासपोर्ट सेवा केंद्र आता कॅम्प मोडमधून ऑनलाइन मोडमध्ये अपग्रेड
होणार आहे. प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ.राजेश गवांडे यांनी खासदार इम्तियाज जलील
यांच्या पत्राला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. या प्रक्रियेला आणखी गती देण्यात
येणार असल्याचं डॉ गवांडे यांनी या पत्रातून कळवलं आहे. हा बदल झाल्यानंतर औरंगाबाद
इथून दररोज ८० ऐवजी किमान २०० नागरिकांचे पासपोर्ट अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती
खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
****
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. पुढच्या
वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते उद्या होणार
असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी काल पत्रकार परिषदेत
दिली. मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, परभणी, तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून
निवडणूक लढवण्यासाठी भाजपची संघटनात्मक तयारी सुरू असल्याचं डॉ कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड इथे आजपासून येत्या १० जानेवारी पर्यंत राज्यस्तरीय
कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टीक
तृणधान्य वर्षाचा शुभारंभही आजपासून होत आहे. १० दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात
सिल्लोड नगर परिषद आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं सर्वरोग निदान, उपचार आणि महारक्तदान
शिबीर तसंच मोफत कृत्रीम भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. तसंच संगीत
रजनी, लावणी, कीर्तन, कव्वाली, मुशायरा, तसंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवात
होणार असून मराठी आणि हिंदी कलाकार, यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात क्रिकेट स्पर्धांसह
फुटबॉल, कुस्ती, शुटींग बॉल, कबड्डी आणि राज्यस्तरीत शंकरपट स्पर्धा देखील आयोजित करण्यात
आल्या आहेत.
****
आपल्याच पक्षातले असंतुष्ट लोक आपल्या विरोधात कट कारस्थान करत असल्याची तक्रार
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ही
बाब पक्षासाठी घातक असल्याचं, सत्तार यांनी म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती करण्यासाठी कार्यक्रम जाहीर
करण्यात आला आहे. या साठी २९ मार्च रोजी लेखी परीक्षा, १५ एप्रिल रोजी मुलाखती आणि
२६ एप्रिल रोजी नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. ६ फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची
जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानुसार २१ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान इच्छुकांचे
अर्ज स्वीकारले जाणार आहे.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात दिव्यांग
व्यक्तींच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, एक लाख चाळीस हजार घरांच्या सर्वेक्षणातून
सव्वीस हजारांवर दिव्यांग व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापैकी सहाशे दिव्यांग व्यक्तींकडे
आधारकार्ड नसल्याचं स्पष्ट झालं. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम
घेण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यात लम्पी आजारामुळे आतापर्यंत १६३ जनावरं दगावली आहेत. यामध्ये
३३ गायी, ३७ बैल आणि ९३ वासरांचा समावेश आहे. यापैकी १४५ जनावरांसाठी नुकसाना भरपाईचे
प्रस्ताव मंजूर झाले असून, ७७ जनावरांच्या पालकांना अर्थसहाय्य देण्यात आलं आहे.
****
जालना इथं काल उघडकीस आलेल्या
महिलेच्या हत्या प्रकरणी मयत महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. किशोर हिंमतराव
आटोळे असं या इसमाचं नाव असून, त्याला जालना शहरातील जुने तहसील भागातून काल ताब्यात
घेण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी ४० हजार
रुपये लाच घेतल्याप्रकरणी दोन तलाठ्यांसह खाजगी मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
काल अटक केली. ज्ञानेश्वर महालकर आणि देविदास बानाईत अशी या तलाठ्यांची नावं असून,
शिवाजी इथापे असं तिसऱ्या इसमाचं नाव आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठाच्या औषध निर्माणशास्त्र संकुलातर्फे उद्यापासून दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय
परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेस एकूण ३०५ संशोधकांनी सहभाग नोंदवला असून,
१८० संशोधनावर मौखिक तसंच भीतीपत्रिकाच्या माध्यमातून संशोधक सादरीकरण करणार आहेत.
****
No comments:
Post a Comment