Monday, 23 January 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.01.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  23 January  2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जानेवारी २०२३    सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ११ बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान.

·      राज्यात एक एप्रिल २०२३ पासून ई-ऑफिस कार्यपद्धती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

·      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून युतीची घोषणा.

आणि

·      मराठी भाषा ही मुळातच अभिजात असल्याने वेगळा दर्जा देण्याची गरज नाही - मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचं मत.

****

राष्ट्रीय बाल पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात ११ बालकांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, शैक्षणिक, सामाजिक कार्य आणि क्रीडा अशा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बालकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी संवाद साधणार आहेत.

****

नागरिकांना तत्परतेनं सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, राज्यात एक एप्रिल २०२३ पासून ई-ऑफिस कार्यपद्धती सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग अर्थात डीएआरपीजी आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं, मुंबई इथं आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरातून २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले पाचशेहून अधिक प्रतिनिधी, या परिषदेत प्रत्यक्ष तसंच आभासी पद्धतीनं उपस्थित आहेत. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण, यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईत आज झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आपण एकत्र येत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले –

एक वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्या अबाधित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. ठीक आहे पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा पुढे जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच.

 

सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचे अन्य घटकपक्षही सोबत येतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –

निगेटीव्ह राजकारण जे आहे सध्या आर एस एस चं आणि बीजेपी चं द्वेशाचं जे आहे की आम्ही मुस्लिमांच्या विरोधात, आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे, याच्या पेक्षा समाज व्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, आणि कोणत्या मुद्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्‌धतीने येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत. अपेक्षा एवढीच आहे, की मी शरद पवारांची रिॲक्शन आज वाचली, नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे. नेतृत्वातलं भांडणं आहे, दिशेचं भांडण आहे. आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी बाळगतो.

 

प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते. समाजातील रूढी परंपरावर त्यांनी काम केलं आहे. आज राजकारणामध्ये ज्या काही चाली, परंपरा सुरू आहेत, त्या मोडून टाकण्यासाठी आपण एकत्र आल्याचं, ठाकरे तसंच आंबेडकर यांनी सांगितलं.

****

भारतीय नौदलाच्या पाचव्या कलवरी प्रकारातली वागीर पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या माझगाव गोदीत फ्रान्सच्या मेसर्स नेवल ग्रुप या खासगी कंपनीच्या सहकार्याने ही पाणबुडी तयार झाली आहे. या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात गस्त घालत लक्ष ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे.

****

बिजनेस २० अर्थात बी २० ची पहिली बैठक आज गुजरातमधल्या गांधीनगर इथे घेण्यात आली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, जी २० साठीचे भारताचे शेरपा अमिताभ कांत, टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि अनेक राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रमुखांनी या बैठकीत सहभाग नोंदवला. बी २० च्या या स्थापना बैठकीचा रेझ म्हणजेच- वृद्धी हा विषय आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील २१ सर्वात मोठ्या बेटांना पंतप्रधानांनी परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावर बांधल्या जाणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचंही पंतप्रधानांनी अनावरण केलं.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती निमित्त आज आदरांजली वाहिली. बुद्धी आणि ज्ञानाने समृद्ध असलेले बाळासाहेब ठाकरे यांनी लोककल्याणासाठी आपलं जीवन वाहून घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांच्या सहवासात घालवलेले क्षण आपल्या कायम स्मरणात राहतील असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत राजभवनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यपालांनी त्यांच्या प्रतिमेलाही पुष्पांजली अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यादरम्यान कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केल्याचं समजतं. महाराष्ट्राचं राज्यपालपद भुषवणं आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचं, कोश्यारी यांनी म्हटलं आहे. आयुष्यात पुढचा काळ चिंतन मनन करण्यात घालवणार असल्याचं, कोश्यारी यांनी म्हटल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नसल्याचं मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिककराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मराठी भाषा पंधरवाडा निमित्त ‘जागर मराठीचा’ या अभिनव कार्यक्रमाचं उद्घाटन ठाले पाटील यांच्या हस्ते आज झालं. यावेळी ‘औरंगाबाद जिल्ह्याची साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. मराठी विभाग प्रमुख डॉ.दासू वैद्य यावेळी उपस्थित होते. आपल्या साहित्य आणि संस्कृतीची स्व-जाणीव आजच्या काळात महत्वाची असल्याचं वैद्य यांनी नमूद केलं. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार मिळाल्याच्या औचित्याने कवी हबीब भंडारे यांचा ठाले पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

****

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीनं चावडी हा एक नवा सार्वजनिक मंच सुरु करण्यात येत आहे. येत्या २८ तारखेला लोकशाहीर कडुबाई खरात यांच्या हस्ते मुंबईत या मंचचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी आज सांगितलं. यावेळी चावडीमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार आणि युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची  व्याख्यानं, कवी-संमेलन तसंच शाहिरी गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे अशी माहितीही डॉक्टर प्रज्ञा पवार यांनी यावेळी दिली.

****

बीड इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रीती पोहेकर आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांना औरंगाबाद इथल्या सावरकर प्रेमी मित्र मंडळच्या वतीनं “स्वातंत्र्यवीर सावरकर कार्य गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी औरंगाबाद इथे या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

शुद्ध आणि सुरक्षित पाण्याचं पुरेसं पाणी घरोघरी नळ जोडणी देण्यासाठी जल जीवन मिशन अभियानांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान जिल्‍हयात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्यातील पाण्याचे नमुने तसंच सर्व ग्रामपंचायतमधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची फिल्ड किट टेस्टव्‍दारे तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात परवा २५ तारखेला एक दिवसीय मोहीम राबवण्यात येणार आहे.

****

No comments: