Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४
जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
इजिप्तचे
अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्ली इथं दाखल
होणार आहेत. नवी दिल्लीत होणार्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान,
प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत, स्वदेशी अर्जुन टॅंक,
नाग क्षेपणास्त्र, के 9 वज्र आणि आकाश क्षेपणास्त्रांचं संचलन, कर्तव्य पथावर सादर
करणार आहेत. या संचलनात भारतीय सेनेचे सहा वायु आणि नौदल सेनेचे एक-एक असे आठ दल सहभागी
होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं,
मुंबई इथं आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या प्रादेशिक परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज मार्गदर्शन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुशासनासाठी सातत्यानं प्रयत्न
करत असून, ई-गव्हर्नन्स ही सुशासनाची गुरुकिल्ली असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज या
परिषदेचा समारोप होणार आहे.
****
भारताला
आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून आयआयटी मद्रासने, भरोस ही स्वदेशी
मोबाईल ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली आहे. केंद्रीय इलेकट्रॉनिक्स आणि माहिती आणि प्रसारण
मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत या प्रणालीचा
आरंभ केला. भरोस ही प्रणाली गोपनीयतेवर केंद्रीत ऑपरेटिंग प्रणाली असून, ती अत्यंत
गोपनीयता बाळगावी लागणाऱ्या तसंच कठोर सुरक्षा मानके असलेल्या संस्थाना उपलब्ध करून
दिली जाईल.
****
राष्ट्रीय
बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशात मुलींना प्रोत्साहन आणि संधी देण्याच्या उद्देशाने
हा दिवस पाळला जातो. मुलींच्या अधिकारांचं आणि शिक्षणाचं महत्व तसंच त्यांच्या आरोग्य
आणि पोषणाबाबत जागरुकता वाढवणं हा देखील या दिनामागचा उद्देश आहे. देशात मुलींच्या
स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यामध्ये बेटी बचाओ,
बेटी पढाओ, आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २७ तारखेला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या सहाव्या पुष्पात विद्यार्थी,
पालक तसच शिक्षक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तर २९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की
बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ९७ वा भाग असेल.
****
आजादी का
अमृत महोत्सवाअंतर्गत नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि हिंगोलीतल्या
आखाडा बाळापूरमधल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालय यांच्या वतीनं, हिंगोली जिल्ह्यात
आजादी मशाल यात्रेला काल प्रारंभ झाला. आखाडा बाळापूर मधल्या हुतात्मा स्मारक इथं स्वातंत्र्य
सैनिकांच्या प्रतिमांना अभिवादन करून या आजादी मशाल यात्रेला सुरवात झाली असून, ती
कळमनुरीकडे रवाना झाली.
****
मतपत्रिकेद्वारे
होणाऱ्या मतदान पद्धतीच्या अभिरूप मतदानाच्यावेळी तयार केलेली चित्रफित इतर जिल्ह्यास
देखील उपयोगी ठरेल, असं, औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने
यांनी म्हटलं आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक यंत्रणेतल्या प्रमुख अधिकाऱ्यांमार्फत
निवडणूक पूर्वतयारीचा आढावा काल चन्ने यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक
प्रशिक्षणप्रसंगी करण्यात आलेलं प्रात्यक्षिक, मतदान यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं
त्यांनी नमूद केलं.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात जिल्हा एड्स प्रतिबंध आणि निमंत्रण
पथक यांच्या सहकार्याने काल एड्स जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात अनेक
विद्यार्थी कलावंतांनी एड्स संदर्भात जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले.
****
वाशिम जिल्हा
परिषदेच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाच्या वतीने आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबण्यात
आली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व विभाग
प्रमुख, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
****
दक्षिण आफ्रिकेत
सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी तिरंगी मालिकेत काल भारतीय संघानं वेस्ट इंडिजवर
५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं स्मृती मानधनाच्या नाबाद
७४ धावा आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर वीस षटकात १६७ धावा
केल्या. मात्र, वेस्ट इंडिजचा संघ १११ धावातच सर्वबाद झाला.
****
भारत आणि
न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज इंदूर
इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले याआधीचे
दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
No comments:
Post a Comment