Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 January
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ जानेवारी २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
· राज्यात
एक एप्रिलपासून ई-ऑफिस कार्यपद्धती सुरू करण्यात येणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
· बीड
जिल्ह्यातल्या राजुरी नवगण इथल्या रोहन बहीरला राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान
· शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची युतीची घोषणा
· शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात अनावरण
· राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांची पदमुक्त होण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे
व्यक्त
· गर्भधारणा
किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा
· नांदेड
- वाघाळा महानगरपालिकेला विकास कामासाठी मिळालेल्या निधीला स्थगिती देणारा राज्य सरकारचा
निर्णय औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द
· महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. सतीश देशपांडे आणि डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती
आणि
· भारत
- न्यूझीलंडदरम्यान आज तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना
सविस्तर बातम्या
नागरिकांना तत्परतेनं सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन
कटिबद्ध असून, राज्यात एक एप्रिल २०२३ पासून ई-ऑफिस कार्यपद्धती सुरू करण्यात येणार
असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या प्रशासकीय सुधारणा
आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं, मुंबई इथं आयोजित
ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या दोन दिवसीय प्रादेशिक परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रणालीमुळे कामकाजाची गती वाढेल तसंच पारदर्शकता
येईल, असं ते म्हणाले. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल
सक्षमीकरण, यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या
उपस्थितीत चर्चा होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस हे आज या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
****
राष्ट्रीय बाल पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात
११ बालकांना हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार विजेत्यांमध्ये बीड जिल्ह्यातल्या
राजुरी नवगण इथल्या रोहन बहीर याचा समावेश आहे. रोहननं गावातल्या डोंगरी नदीला आलेल्या
पुरात पाय घसरून पडलेल्या महिलेला स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मोठ्या साहसाने वाचवलं,
त्याच्या या शौर्यासाठी त्याला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
दरम्यान, पुरस्कार विजेत्या बालकांशी पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज संवाद साधणार आहेत.
****
वागीर, ही कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी काल भारतीय नौदलाच्या
ताफ्यात दाखल झाली. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या
समारंभात वागीर पाणबुडी कार्यान्वित झाली.
मेसर्स नेव्हल ग्रुप, फ्रान्सच्या सहयोगानं, मुंबईतल्या माझगाव डॉक गोदीमध्ये
या बोटीची बांधणी झाली आहे. भारताच्या सागरी हितसंबंधांना पुढे नेण्यामध्ये भारतीय
नौदलाच्या क्षमता वाढवण्यामध्ये वागीर महत्वाची भूमिका बजावणार आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे
आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली आहे.
मुंबईत काल झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी
ही माहिती दिली. देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी
आपण एकत्र येत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
एक वैचारिक प्रदुषणातून देशाला
मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व संविधान
हे त्याचं महत्व आणि पावित्र्या अबाधित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत.
ठीक आहे पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा
पुढे जेव्हा जशी वेळ येईल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच.
सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचे
अन्य घटकपक्षही सोबत येतील, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले....
निगेटीव्ह राजकारण जे आहे
सध्या आर एस एस चं आणि बीजेपी चं द्वेशाचं जे आहे की आम्ही मुस्लिमांच्या विरोधात,
आम्ही मुसलमानांच्या विरोधात आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र या असं जे आहे, याच्या पेक्षा
समाज व्यवस्था एकत्र कशी आली पाहिजे, आणि कोणत्या मुद्यांवरती आली पाहिजे, ती कशा पद्धतीने
येईल याची असणारी मांडणी आम्ही करत जाणार आहोत. अपेक्षा एवढीच आहे, की मी शरद पवारांची
रिॲक्शन आज वाचली, नवीन नाही. आमच्या दोघांचं भांडण फार जुनं भांडण आहे. नेतृत्वातलं
भांडणं आहे, दिशेचं भांडण आहे. आमच्या बरोबर येतील अशी अपेक्षा मी बाळगतो.
प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन
होते. समाजातल्या रूढी परंपरावर त्यांनी काम केलं आहे. आज राजकारणामध्ये ज्या काही
चाली, परंपरा सुरू आहेत, त्या मोडून टाकण्यासाठी आपण एकत्र आल्याचं, ठाकरे तसंच आंबेडकर
यांनी सांगितलं.
****
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती काल पराक्रम दिवस म्हणून
साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना अभिवादन केलं. यानिमित्त अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातल्या २१ द्वीपांना,
२१ परमवीर चक्र विजेत्यांची नावं पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नेताजी
सुभाषचंद्र बोस बेटावर बांधल्या जाणाऱ्या नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या
मॉडेलचंही पंतप्रधानांनी अनावरण केलं.
****
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या
जयंती निमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
केलं. बुद्धी आणि ज्ञानाने समृद्ध असलेले बाळासाहेब ठाकरे यांनी लोककल्याणासाठी आपलं
जीवन वाहून घेतलं होतं, ठाकरे यांच्या सहवासात घालवलेले क्षण आपल्या कायम स्मरणात राहतील
असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
दक्षिण मुंबईतल्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौकात असणाऱ्या
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांनी
आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात शिवसेना प्रमुख
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण
करुन अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं काल विधानभवनाच्या मध्यवर्ती
सभागृहात अनावरण झालं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधी मंडळाच्या दोन्ही सदनांचे
पदाधिकारी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न
पुरस्कारांचं वितरणही काल मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यात
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला, उत्कृष्ट स्वयंसेवी
संस्थेसाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोविड काळात आरोग्य यंत्रणेनं केलेलं कार्य वाखाणण्याजोगं
असून, त्यांचं कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या
मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. राज्य सरकार तसंच बाळासाहेबांची
शिवसेना गटाच्या नेत्यांवर तसंच केंद्र सरकारच्या धोरणांवर त्यांनी यावेळी टीका केली.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुंबईत राजभवनात नेताजी
सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली
अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा
व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यादरम्यान
त्यांनी, राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केल्याचं समजतं. महाराष्ट्राचं
राज्यपालपद भुषवणं आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचं, राज्यपालानी म्हटलं आहे.
****
गर्भधारणा किंवा गर्भपात हा पूर्णपणे संबंधित महिलेचा निर्णय
असून, गर्भपाताची परवानगी मागणारी याचिका फेटाळणं, हा संबंधित महिलेचा सन्मानाने जगण्याचा
अधिकार नाकारणं आहे, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. एका विवाहितेला ३२ व्या
आठवड्यात गर्भपाताची परवानगी देताना न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती शिवकुमार
डिगे यांच्या पीठानं काल हे मत नोंदवलं. गर्भपाताचा निर्णय हा पूर्णपणे त्या महिलेचा
निर्णय आहे, एखाद्या घटनादत्त अधिकाराचा संकोच करण्याचा अधिकार स्वतः न्यायालयालाही
नाही, वैद्यकीय मंडळही याबाबत निर्णय देऊ शकत नाही. गर्भपाताचा निर्णय घेण्यास उशीर
झाला, फक्त या एका कारणास्तव गर्भपाताचा अधिकार नाकारणं योग्य नसल्याचं, न्यायालयाने
म्हटलं आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकेतल्या लॉकरसाठीच्या कराराचं
नूतनीकरण करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. लॉकरच्या सुधारित करारावर
स्वाक्षरी न करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे, हे लक्षात घेऊन, ही मुदत वाढवल्याचं
रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सुधारित करारावर स्वाक्षरी करण्याची
आवश्यकता असल्याचं अनेक बँकांनी अद्याप आपल्या ग्राहकांना कळवलं नसल्याचं निदर्शनास
आल्याचं देखील यात म्हटलं आहे. त्यानुसार, बँकांनी आपल्या ग्राहकांना येत्या ३० एप्रिल
२०२३ पर्यंत सुधारित कराराबाबतची माहिती द्यावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले
आहेत. बँकांनी ग्राहकांबरोबरच्या लॉकर कराराची नोंदणी येत्या ३० जूनपर्यंत कमीतकमी
५० टक्के, तर सप्टेंबर अखेरीपर्यंत ७५ पूर्ण करावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले
आहेत.
****
नांदेड - वाघाळा महानगरपालिकेला विकासकामासाठी मिळालेल्या
निधीला स्थगिती देणारा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने
चुकीचा ठरवून रद्द केला आहे. महानगरपालिकेला शहराअंतर्गत कामांसाठी दीडशे कोटी रुपयांचा
निधी मागच्या महाविकास आघाडी सरकारने मान्य केला होता, मात्र विद्यमान सरकारने २९ जून
२०२२ रोजी या निधीला स्थगिती दिली. या निर्णयाला नांदेडच्या तत्कालिन महापौर जयश्री
पावडे यांनी खंडपीठात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात सरकार कडून दाखल करण्यात आलेल्या
शपथपत्रात सर्व कामांचा आढावा घेण्यात येईल, असं सांगितलं होतं. ही कामं प्रगतीपथावर
असल्यानं त्यांना स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी राज्य शासनानं डॉ.
सतीश देशपांडे आणि डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती केली आहे. सतीश देशपांडे हे औरंगाबाद
विभागात उच्च शिक्षण सहसंचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहे. या सदस्यांच्या नियुक्तीमुळे
आयोगाचं एकूण कामकाज गतीमान होण्यास मदत होणार आहे. मात्र एका सदस्याची जागा रिक्त
ठेवण्यात आली आहे.
****
मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा
देण्याची गरज नसल्याचं मत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील
यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
वतीनं मराठी भाषा पंधरवाडा निमित्त, ’जागर मराठीचा’या अभिनव कार्यक्रमाचं उद्घाटन,
ठाले पाटील यांच्या हस्ते काल झालं. यावेळी ’औरंगाबाद जिल्हयाची साहित्य आणि सांस्कृतिक
परंपरा’या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. मराठी विभाग
प्रमुख डॉ.दासू वैद्य यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार मिळाल्याच्या
औचित्याने, कवी हबीब भंडारे यांचा ठाले पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमात सत्कार
करण्यात आला.
****
पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीनं चावडी हा एक नवा
सार्वजनिक मंच सुरु करण्यात येत आहे. येत्या २८ तारखेला लोकशाहीर कडुबाई खरात यांच्या
हस्ते मुंबईत या मंचाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं, प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष
डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी काल सांगितलं. यावेळी चावडीमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक
प्राध्यापक सुरेश द्वादशीवार आणि युवा अभ्यासक, लेखक डॉ. सूरज एंगडे यांची व्याख्यानं,
कवी-संमेलन तसंच शाहिरी गायन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेचा चौथा वर्धापन दिन काल
साजरा झाला. यानिमित्त महानगरपालिका प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ अभिजित चौधरी यांनी, महीलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली. आतापर्यंत
स्मार्ट सटी बस सेवेचा लाभ जवळपास दिड कोटी प्रवाशांनी घेतला आहे. या काळात १५० बस
स्थानक, ई- तिकीट, स्मार्ट कार्ड आणि अन्य सेवांचा लाभ नागरिकांना मिळाला. शहर बस सेवेचा
एक महत्वाचा भाग म्हणून जाधववाडी मंडी इथं नवीन बस डेपो बांधण्यात येत आहे. तसंच औरंगाबाद
स्मार्ट सिटी तर्फे ३५ इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार असल्याचंही चौधरी यांनी
सांगितलं.
****
मोर्चा, धरणे, उपोषण, आमरण उपोषण हे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य
दिन यासारख्या राष्ट्रीय सणांच्या अनुषंगाने अपेक्षित नाहीत. एकप्रकारे या राष्ट्रीय
सणांचा अवमान केल्याचं हे द्योतक आहे, असं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी
म्हटलं आहे. काल नांदेड इथे तत्काळ तक्रार निवारण सभेत ते बोलत होते. जिल्ह्यात लागू
असलेली आचारसंहिता, जमावबंदी लक्षात घेता तक्रारदारांनी कोणत्याही प्रकारचे असंविधानिक
मार्ग अवलंबिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी
दिला आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला शेवटचा सामना आज इंदूर इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला
सुरुवात होईल. मालिकेतले याआधीचे दोन्ही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
पिक विमा मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं
हिंगोली जिल्ह्यात सुरु असलेल्या आंदोलनाचा काल सहावा दिवस होता. या मागणीसाठी गोरेगाव
इथं शेतकऱ्यांचं उपोषण सुरु असून, प्रशासनानं अपेक्षित दखल घेतली नसल्यानं, काल शेतकऱ्यांनी
गोरेगाव इथल्या अपर तहसिल कार्यालयासमोरच्या रस्त्यावर दूध सांडून निषेध व्यक्त केला.
****
जल जीवन मिशन अभियानांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं
स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या सर्व शाळा, अंगणवाड्यातील
पाण्याचे नमुने तसंच सर्व ग्रामपंचायतमधील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची फिल्ड
किट टेस्टव्दारे तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात उद्या एक दिवसीय मोहीम राबवण्यात येणार
आहे.
****
No comments:
Post a Comment